सामान्य काळातील ३रा सप्ताह
शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५
संत जॉन बॉस्कोवर्तनसाक्षी (१८१५- १८८८)✝️अगदी बालपणापासून आपल्या प्रभूने आणि पवित्र मरियेने जॉन ह्याला तरुण युवकांना वाईट मार्गापासून दूर ठेवण्यास आणि प्रामाणिक जीवन जगण्यासप्रवृत्त करण्याची प्रेरणा दिली होती. उत्तर इटलीतील एका गरीब शेतमजूराच्या घरी जन्मलेला जॉन पिएडमोंट ह्या खेड्यात आणि आपल्या गुरूदीक्षेनंतर तुरीन शहरात वेगवेगळ्या मार्गाने परंतु अतिशय प्रेमाने व दयाळूपणे तरूण मुलांशी मैत्री करीत असे व त्यांचा विश्वास संपादन करीत असे. हात चलाखीपणा, जादूचे प्रयोग, दोरीवरून चालणे, व्हायोलिन वाजविणे, गाणी गाणे, गोष्टी सांगणे, छोटे छोटे नाट्यगृह उभारणे, नाटके बसविणे, विविध खेळ इ. द्वारे त्याने बऱ्याच युवकांचा विश्वास संपादन केला.मात्र हे सर्व करीत असताना आपली ख्रिस्ती शिकवणही तो त्या जमावाच्या गळी उतरवित असे. एखादया खेळाची सुरूवात प्रार्थनेने करणे, एखादा प्रयोग संपल्यावर रोझरीची प्रार्थना करणे, मध्येच सकाळी फादरांनी दिलेल्या प्रवचनाचा अर्थ सांगणे अशा रितीने तो युवकांमध्ये आध्यात्मिक गोष्टींची गोडी निर्माण करी.अशा प्रकारे १८४५ सालापर्यंत त्याच्याभोवती जगणाऱ्या युवकांची संख्या ८०० च्याही पुढे गेली होती. अशा मुलांना हिवाळ्यात एकत्र करण्यासाठी त्याच्याकडे जागासुद्धा नव्हती. हातपाय गारठून टाकणाऱ्या त्या थंडीत फ्रा. जॉन ह्यांची काय गडबडघाई होत असे त्याची कल्पनाच न केलेली बरी. त्यावेळी त्याच्या आईने त्याला केलेली मदत खूप मोलाची होती. परंतु पुढे पुढे तीही अपूरी पडू लागली.हळूहळू फा. जॉनच्या कार्याला प्रसिद्धी मिळत गेली. त्याला बरेच सहकारीवा सहाय्यक येऊन मिळाले. त्यांच्या मदतीने त्याने नियमितपणे रात्र शाळेचे आयोजन केले आणि संत फ्रान्सिस डि सेल्स व पवित्र मरिया, ख्रिस्तीजनांची सहाय्या ह्या दोघांच्या आश्रयाखाली तुरीन येथे त्याने सलेशिअन (डॉन बॉस्को) संघाची स्थापना केली.आपल्या संघामध्ये तांत्रिक कार्यशाळा, वसतिगृह इ. इमारती त्याने उभ्या केल्या. त्याचे युवक आता तिथेच राहून आपल्या धर्माविषयी वाचन करीत, लेखनही करीत. दररोजची मिस्सा आणि वारंवार कुमसार/ पापनिवेदन ह्यांची आध्यात्मिक बैठक त्यांच्या युवकांच्या जीवनाला लाभलेली होती. शारीरिक आत्मक्लेश आपल्या आध्यात्मिकतेतून त्याने पूर्णपणे वगळलेले होते. देवाने दिलेल्या शरीराचा व शक्तीचा पूर्ण वापर त्याचे राज्य या भूतलावर आणण्यासाठी करायचा एवढा एकच ध्यास फा. जॉन ह्यांना लागलेला होता.दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखण्याची एक देणगी फा. जॉन ह्यांना लाभलेली होती. तसेच फा. जॉन ह्यांच्या रुपाने आपल्यामध्ये एक संत राहात आहे ह्याची जाणीव त्याच्या युवकांना झालेली होती. लोकांचा त्याच्यावर एवढा जबरदस्त विश्वास होता की, एकदा त्याने त्यांना शहरातील तुरूंगामधून ३०० कैद्यांना एक दिवसाच्या सहलीसाठी नेले होते. एखादा कैदी पळून जाईल की काय अशी भीतीही अधिकाऱ्यांना वाटली नाही म्हणूनच त्यांना ह्या कैदयांबरोबर सुरक्षा पोलीस यंत्रणा दिलेली नव्हती. फा. जॉननी त्यांना सुरक्षितपणे परत आणले.आपल्या कार्याचा फायदा तरूणींना देखील व्हावा यासाठी त्यांनी “डॉटर्स ऑफ अवर लेडी हेल्पर्स ऑफ ख्रिश्चन्स” ही संस्था स्थापन केली. सलेशिअन संस्थेचा विस्तार होतच राहिला. संस्थापक फा. जॉन ह्यांच्या मृत्यूवेळी २००० संस्था आणि २,५०० धर्मगुरू सलेशियन संघामध्ये कार्यरत होते.संत जॉन बॉस्को ३१ जानेवारी १८८८ साली मरण पावले आणि १९३४ साली संत पदाला पोहोचले.चिंतन : तुमच्याने होईल तेवढे करा, उरलेले देवावर व पवित्र मरियेवर सोपवा. -संत जॉन बॉस्कोआपले जीवन हे आपले असे नाहींच ते परमेश्वराने त्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दिलेले जणू उसने दान आहे. म्हणूनच दु:खी, कष्टी, असहाय्य व संकटग्रस्त अशा सर्वांच्या मदतीला धावून जाणे आपले परमकर्तव्य आहे. ख्रिस्तसभा आज संत जॉन बॉस्कोचा सन्मान करीत आहेत. आपल्या मधूर वाणीने आणि कर्तव्य बुध्दीने संत जॉन ह्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेची साक्ष जगाला दिली. त्याची आदर्शमय जीवन विशेषत: तरुणांना प्रेरणादायी आहे.✝️
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
पूर्वीचे दिवस आठवा. त्यावेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झगडलात. कधी विटंबना आणि संकटे सोसल्याने लोकांत तुमची अवहेलना झाली; तर कधी इतरांना अशी वागणूक मिळाली तेव्हा त्यात तुम्हांलाही सहभागी व्हावे लागले. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वत:ची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे आणि ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. ह्यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करुन घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे.
"कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही; माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही."
परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत.
✝️
0 टिप्पण्या