सामान्यकाळातील ३० वा सप्ताह
गुरुवार दि.३०ऑक्टोबर २०२५
'संत जेरार्ड माझेला-
दक्षिण इटलीतील एका अत्यंत गरीब घराण्यात परंतु भक्तिमान वातावरणात जेरार्डचा जन्म झाला. त्याला मनन-चिंतन, एकांताची खूप आवड होती. अतिपवित्र साक्रामेंताविषयी तर त्याच्या मनात नितांत प्रेम होते. बराच वेळ तो भाकरीच्यारूपात हजर असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताशी मनमोकळेपणाने हितगूज करताना अनेकांना दिसलेला आहे.
तो म्हणत असे, केवळ देवासाठी छळ सहन करा म्हणजे पृथ्वीवरच स्वर्ग अवतरण्याचा परमानंद तुम्ही आपल्या जीवनात अनुभवल्याशिवाय राहणार नाहीत.
वयाच्या २३ व्या वर्षी त्याने रेडेम्प्टोरिस्ट संस्थेमध्ये प्रवेश केला. एक बंधू म्हणून काही काळ त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला आपल्या संस्थेत ठेवून घेतले गेले होते. परंतु त्या काळात त्याने शुद्धता, नम्रता आणि आज्ञाधारकपणा याचे आदर्श जीवनच सर्वांपुढे सादर केले.
आतापर्यंत संस्थेमध्ये दारिद्र्य, ब्रह्मचर्य आणि आज्ञाधारकपणा अशी तीन व्रते स्वीकारली जात होती. जेरार्डने आपल्या वागणुकीने आणखी चौथ्या व्रताची भर घातली. ती म्हणजे जे काही आपण देवासाठी करतो ती आपली प्रार्थनाच असते. ह्याचे भान ठेवून सतत प्रार्थनेची जाणीव ठेवणे.
देवाने त्याला असामान्य आध्यात्मिक कृपादाने दिली होती. त्याला साक्षात्कार होत. अधूनमधून प्रार्थनेच्या वेळी त्याचे शरीर जमिनीपासून उंचावले जाई. एकाच वेळी तो दोन-दोन ठिकाणी उपस्थित राहू शके. संदेश देणे, आत्मे ओळखणे, अलौकिक ज्ञान इ. कलादाने त्याला प्राप्त झालेली होती. सैतान आणि निसर्गाच्या शक्तीवरही मात करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी आलेले होते.
आपले शरीर त्याने फार मोठ्या प्रायश्चित्त आणि खडतर तपश्चर्येने व उपास तापासाने कह्यात आणलेले होते. उरल्यासुरल्या फावल्या वेळेत तो अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करीत असे. कधीकधी साक्रामेंताच्या पेटीसमोरून जाताना येशू आपल्याला बोलावीत आहे. असा आभास होई. तेव्हा तो गुडघे टेकून डोळ्यांत आसवे आणीत म्हणत असे, “हे प्रभो, तुझी परवानगी असेल तर मला माझ्या कामाला जाऊ दे. हे प्रभो, मला क्षमा कर.”त्याच्याहून वयाने मोठे असलेले धर्मगुरू प्रवचन देण्यासाठी मिशनकार्यावर जात असत, तेव्हा त्यांच्या प्रभावी प्रवचनापेक्षा आपल्या कळकळीच्या प्रार्थनेद्वारे आणि आग्रही मध्यस्थीने त्याने कठोर अंतःकरणाच्या पापी लोकांचे परिवर्तन करून दाखविलेले आहे. संत जेरार्ड वयाच्या २९ व्या वर्षी मरण पावले. त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर पुढील हृदयस्पर्शी शब्द लिहिलेले आढळतात, “इथे देवाच्या इच्छेप्रमाणे केले जाते. जोपर्यंत देवाची इच्छा आहे तोपर्यंत त्याच्याच इच्छेप्रमाणे केले जाईल.”
चिंतन : आपण सर्वदा अगदी आनंदाने देवाच्या इच्छेनुसार जीवन जगायला हवे. - संत जेरार्ड माझेला
देव सर्वदा मानवाच्या बाजूने त्याचे तारण करण्यासाठी उभा राहिला मात्र अहंकार व दुष्टपणामुळे माणूस देवापासून विभक्त झाला. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच मानवाचा देवाबरोबर समेट झाला आहे, म्हणूनच सर्वांसाठी पुनरुत्थित प्रभूने सार्वकालिक जीवनाचा दरवाजा खुला केला. आपण सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत व ख्रिस्ताठायी आपण नवी उत्पत्ती बनलो आहोत. ख्रिस्ताठायी आपल्यावर शिक्का मारण्यात आला आहे. संत पौलाने आजच्या पहिल्या वाचनात आशेचा दीप प्रज्वलित केला आहे. संत पौल म्हणतो, 'ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करील ?'देव आपला पिता, प्रभू येशू आपला तारणारा व पवित्र आत्मा आपला सांत्वनकर्ता ह्या त्रैक्याच्या आशीर्वादाने आपणा सर्वांना चिन्हांकित करण्यात आले आहे. संत पौल म्हणतो, 'देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण ?