(Margaret Mary Alacoque)16th October 2020

"भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यापेक्षा मूल्यवान आहात"

संत मार्गरेट अलाकोक हिचा सण

"प्रभू येशू ख्रिस्ताने तिला असे ठामपणे सांगितले की महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी श्रद्धावंतानी ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारावा तसेच त्या दिवशी संध्याकाळी अतिपवित्र साक्रामेंत आराधनेसाठी वेदीवर खुले ठेवावे."

इफिसकरांस  १:११-१४ 

ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो.यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी. ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हांवर शिक्का मारला जोपर्यंत देव, आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्शाचा विसार आहे. आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुति होईल.

हा प्रभूचा शब्द आहे... 


स्तोत्र ३३:१,२,४,५,१२,१३

प्रतिसाद : ज्या लोकांना त्याने प्रजा म्हणून निवडले ते धन्य! 

१)अहो नीतिमानांनो परमेश्वराचा जयजयकार करा, सरळ मनाच्या माणसांना स्तुतीगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा, दशतंतू वादयावर त्याचे गुणगान गा .  

२)कारण परमेश्वराचे वचन विश्वसनीय आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत, परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.  

३)ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वतना करिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य ! परमेश्वर आकाशातून पहातो, सर्व मानव जातीला तो निरखतो. 


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या

मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १२:१-७


आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की, ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: “परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा. उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही.  यास्तव जे काही तुम्ही अंधारत बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल.” “परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सांगतो. तुम्हांला ठार मारल्यांनतर तुम्हांस नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीती  धरा. होय, मी तुम्हांस सांगतो त्यालाच भ्या. “पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही? आणि त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही मूल्यवान आहात.”

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा तुझ्या अस्तित्वाची जाण ठेवून धैर्याने तुझी सुवार्ता घोषविण्यास मला प्रेरणा दे ,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या