एकोणतिसावा सप्ताह
बुधवार
२१ ऑक्टोबर २०२०
"आपल्या प्रत्येकाचा जन्म काही विशिष्ट हेतूसाठी आहे.परमेश्वराची योजना आहे की आपण त्याच्या प्रेमाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवावी. ही सुवार्ता आपण प्रार्थना, सहभागीता, गरिबास किंवा आजाऱ्यास भेट देऊन आपल्या वर्तनाद्वारे आपण पसरवू शकतो."
पहिले वाचन : इफिस ३: २-१२
वाचक : पोलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल असे मी पौल गृहीत धरून चालतो. म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल . ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्टयांना प्रगट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांस कळवण्यात आले नव्हते . ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्यावरोवर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत .
देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी खिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वाना प्रकाशित करून दाखवावे . जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हास भूषणावह आहेत .
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
यशया १२:२-६
प्रतिसाद : तुम्ही तारणकृपेतून उल्हासाने पाणी काढाल.
१)पाहा, देव माझे तारण आहे,
मी विश्वास ठेवतो, भीत नाही कारण
प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे,
तो मला तारण झाला आहे .
तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल.
२)परमेश्वराला धन्यवाद द्या,
त्याच्या नामाचा जयघोष करा .
राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा
त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा,
परमेश्वरापुढे गायन करा .
३)कारण त्याच्या कृती प्रतापमय आहेत,
हे साऱ्या जगभर जाहीर होवो .
अहो सियोननिवासी लोकहो, जयघोष करा, गजर करा,
कारण इसरायलचा पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे .
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ
जीवनाचा प्रकाश राहील .
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १२: ३९ - ४८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .
"ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल ."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते . तुम्हीही सिद्ध असा कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल . ” तेव्हा पेत्राने म्हटले, “प्रभो, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की सर्वांना?” तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य . मी तुम्हास खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील . परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात ठरवून जो दास चाकरांस आणि चाकरिणीस मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल, तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याची जागा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील परंतु ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील . ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्या जवळून पुष्कळच अपेक्षिले जाईल . ”

0 टिप्पण्या