(St. John of Capistrano)23rd October 2020


संत जॉन कॅपिस्ट्रॉन ह्यांच्या सण

सामान्य काळातील

एकोणतिसावा सप्ताह

शुक्रवार   

२३ ऑक्टोबर २०२०

"जे यथार्थ आहे ते तुम्ही का ठरवत नाही?"

"मरणापर्यंत विश्वासू राहा मी तुला जीवनाचा मुकुट देईन."

(प्रकटीकरण २:१०)

पहिले वाचन : इफिस ४: १-६

वाचक :  पौलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. पूर्ण नमता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा . तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच आहे, आत्माही एकच आहे, प्रभू एकच, विश्‍वास एकच; स्नानसंस्कार एकच, सर्वाच्यावर आणि सर्वामधून आणि सर्वाच्या ठायी असलेला देव जो सर्वाचा पिता तोही एकच आहे.

हा प्रभूचा शब्द आहे.


सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र २३:१-६

प्रतिसाद : हे प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतूर झाले आहेत .


१)पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्‍वराचे आहे,

जग आणि त्यात राहाणारे सारे लोकही परमेश्‍वराचे आहेत .

कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला,

त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले .


२)परमेश्‍वराच्या डोंगरावर कोण चढेल?

त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील?

ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे,

जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.


३) त्याला परमेश्‍वरापासून आशीर्वाद मिळेल .

आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल .

त्याला शरण जाणारे हेच लोक होत,

हे याकोबच्या देवा,

तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले ते हेच .


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात .

मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात .

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १२: ५४ - ५९

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .

येशू लोकसमुदायास म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, पावसाची सर येत आहे आणि तसे घडते; दक्षिणेचा वारा तेव्हा कडाक्याची उष्णता होईल,असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते, आहो ढोंग्यांनो, तुम्हास पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो,तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही?

"आणखी, जे यथार्थ आहे ते तुम्ही का ठरवत नाही? ती आपल्या वादयाबरोबर न्यायाधिशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि शिपाई  तुला तुरुंगात टाकील.मी तुला सांगतो, पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस."

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या आणि शांती व ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी झटत जा असा संदेश संत पौल तुरूंगातून इफिसकरांस देतो . कारण आपण सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत आणि ज्या ठिकाणी ऐक्य आणि शांती नांदते तेथे खिस्ताचे वास्तव्य नेहमीच असते. आजच्या शुभवर्तमानात येशू लोकसमुदांस विचारतो की, वातावरणातील बदलत्या चिन्हाद्वारे तुम्हाला जर ऊन पावसाचा अंदाज बांधता येतो तर मग जग बदलत चालले आहे त्यावरून तुम्ही सद्य परिस्थितीचा अर्थ का लावीत नाही? जगात भांडण, तिरस्कार, लुटमार या गोष्टी सर्रासपणे वाढत आहेत त्याविषयी कुणी काही विचार का करत नाही? येशू देत असलेली शांती दिवसेन दिवस नाहिशी होत चालली आहे तसेच आत्म्याद्वारे घडून आलेले ऐक्य लोप पावत चालले आहे. ती शांती आणि ऐक्य आपण पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय का?

प्रार्थना - हे प्रभू येशू जे यथार्थ ते जाण्याचं व प्रीतीचे आणि सहभागीतेचे जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे ,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या