(Anthony Mary Claret)24th October 2020

संत अँथोनी क्लारेट ह्यांच्या सण

सामान्य काळातील

एकोणतिसावा सप्ताह

  शनिवार   

२४ ऑक्टोबर २०२०

"जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमचा नाश होईल "

"आपण सगळीकडे मिशनरी पाठवू शकत नसल्या कारणाने निदान चांगली पुस्तके तरी सर्वत्र पाठवावीत कारण चांगली पुस्तके ही मिशनऱ्याप्रमाणे चांगले प्रेषितकार्य करू शकतात."

-संत अँथोनी क्लारेट

पहिले वाचन : इफिस ४: ७-१६

वाचक :  पौलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

आपणांपैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिणामाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे .ह्यास्तव तो म्हणतो,

"त्याने उच्चस्थानी आरोहण केले

तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले

आणि मानवांना देणग्या दिल्या ."

त्याने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि शिक्षक, असे नेमून दिले . ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांस सेवेच्या कार्याकरिता आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध व्हावे देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या आणि तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मयदिप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले; ह्यासाठी की आपण ह्यापुढे बालकांसारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणा-या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वा-याने हेलकावणारे आणि फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे . त्याच्यापासून पुरवठा करणा-या प्रत्येक सांध्याच्याद्वारे संबंध शरीराची जुळवणूक आणि जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपआपल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते .


हा प्रभूचा शब्द आहे.


सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १२२:१-५

प्रतिसाद : आपण परमेश्वरच्या घराकडे जाऊ. 


१)आपण परमेश्वरच्या घराकडे जाऊ.

असे ते मला म्हणाले , तेव्हा मला आनंद झाला. 

हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.

 

२)हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेत 

इसरायलला लावून दिलेल्या निर्बधाप्रमाणे

तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,

परमेश्वराच्या नामाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून  येतात,

कारण तेथे न्यायासने, दविदच्या घराण्याची राजसने मांडिली आहेत. 


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

ज्यांची माझ्यावर प्रीती असेल तोच माझे वाचन पाळील,

माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि 

आम्ही त्याच्याकडे येऊ. 

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १३: १ - ९

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .

त्याच वेळी तेथे असलेल्या काही जणांनी येशूला, ज्या गालीलकरांचे रक्‍त पिलातने त्यांच्या यज्ञांत मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले . मग त्याने त्यांस उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांनी असे दु:ख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो,नव्हते  तरी पण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वाचा त्यांच्यासारखा नाश होईल. किवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते येरूशलेमात राहणा-या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नव्हते . पण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल . ” 

त्याने एक दाखला सांगितला: “कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळयात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळयाला म्हटले, पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिराच्या झाडावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी?” तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, “महाराज, आणखी एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे . ”

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
पश्चात्ताप करा नाहीतर तुमचा सर्वनाश अटळ आहे असे आजचे शुभवर्तमान आपणास सुचित करते. आपल्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी परमेश्‍वर आपल्याला भरपूर संधी उपलब्ध करून देत असतो या आशयाचा एक दाखला येशू आज आपल्याला सांगतो. तीन वर्षे झाली तरी अंजिराच्या झाडाला फळ येत नाही म्हणून ते तोडून टाकावे असा हुकूम धनी माळयास करतो. पण माळी हा दयाळू असतो. ह्या अंजिराच्या झाडाला अजून एक संधी द्या अशी आर्त विनंती माळी धन्यास करतो. आपला देवही दयाळू आहे. पश्‍चात्ताप करणा-यांना तो आपल्या वेंगेत कवटाळतो, त्यांच्यावर प्रेम करतो. परमेश्वराचे प्रेम आपणा प्रत्येकाला अनुभवयाचे आहे, पण त्यासाठी आपण पश्चात्ताप करतो का?. आपण आपल्या आचरणावर चिंतन व परीक्षण करून घडलेल्या सर्व पापाबद्दल पश्चाताप करावा व चांगले पाप निवेदन करण्यास आपल्याला प्रेरणा लाभावी,म्हणून प्रार्थना करूया. 

प्रार्थना - हे प्रभू येशू सफलतेने जीवन जगण्यास आम्ही सर्वदा जागृत असावे व पश्चाताप करून नूतनीकरण करावे म्हणून आम्हाला कृपा दे,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या