Marathi Bible Reading | 25th October 2020

सामान्य काळातील

तिसावा रविवार 

२५ ऑक्टोबर २०२०

"तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर."

"आपली शेजाऱ्यावर प्रीती असेल तरच आपण देवावर प्रीती करतो, सेच देवावर प्रीती असणारा माणूसच शेजाऱ्यावर प्रीती करतो."

पहिले वाचन : निर्गम २२: २१-२७

वाचक :  निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन.

प्रभू म्हणतो, “कोणा उपऱ्यास छळू नकोस किवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. कोणा विधवेस किवा अनाथास छळू नका . तुम्ही त्यांस कोणत्याही प्रकारे छळले आणि त्यांनी माझ्याकडे गार्‍हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्हाणे ऐकेन आणि मग माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा संहार करीन, तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील. 

तुझ्याजवळ राहाणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणी कंगाल असला आणि तू त्याला पैसे उसने दिले तर त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नको आणि त्याच्यापासून व्याज घेऊ नको. तू आपल्या शेजार्‍याचे पांघरून गहाण ठेवून घेतले असेल तर सूर्यास्त होण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे. कारण त्याचे ते एकच पांघरून असून त्याचे अंग झाकण्यास तेवढेच असणार, ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? अशा वेळी त्याने माझ्याकडे गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करूणामय आहे . ”

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ९६:१,३-५,७-१०

प्रतिसाद : हे परमेश्‍वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो .

१)हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो .

परमेश्‍वर माझा दुर्ग, माझा गड, माझा मुकतिदाता,

माझा देव, माझा खडक आहे,

त्याचा मी आश्रय घेतो .

तो माझे कवच, माझे तारणदुर्ग, माझा उंच बुरूज आहे .

स्तुतिपात्र परमेश्‍वराचा मी धावा करतो,

तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो . 

 

२) परमेश्‍वर जिवंत आहे,

त्या माझ्या मुक्तिदात्या दुर्गाला धन्यवाद असो .

तो आपल्या राजाला मोठे विजय देतो

आणि आपल्या अभिषिक्ताला वात्सल्य दाखवतो .


दुसरे वाचन : थेस्सलनीकाकरांस पत्र १ : ५ - १०

वाचक : पौलचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन.

तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे आणि प्रभूचे अनुकरण करणारे झाला, अशा प्रकारे मासेदोनिया आणि अखया ह्यातील सर्व विश्‍वास ठेवणारे ह्यांना तुम्ही आदर्श झाला. मासेदोनिया आणि अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्‍वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे, ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगावयाची आवश्यकता नाही. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत आणि सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तिपूजेपासून देवाकडे कसे वळला, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात, त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठवले आणि तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे .

हा प्रभूचा शब्द आहे.


सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली .

जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला .

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय २२: ३४ - ४०

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .

येशूने सदुक्‍यांस निरूत्तर केले असे ऐकून परूशी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्‍वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर . हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे . हिच्यासारखी दुसरी ही आहे की , तू आपल्या शेजार्‍यांवर स्वत:सारखी प्रीती कर . ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टयांचे ग्रंथ अवलंबून आहेत .

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
देवावर आणि शेजाऱ्यावर प्रीती ह्या दोन आज्ञांवर संपूर्ण नियमशास्त्र व संदेष्टयांचे ग्रंथ अवलंबून आहेत. शेजार्‍यांवर प्रीती कशी करावी हे आपण पहिल्या वाचनात आणि परमेश्वरावर प्रीती कशी करावी हे आपण दुस-या वाचनात ऐकतो. आपल्या सभोवताली राहणारी आणि वावरणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली शेजारी असते. मग ती कुणीही असो : आपले भाऊबहीण, नातेवाईक, गरीब, पीडित, दु:खी, आजारी व आपले नोकर किंवा आपल्या हाताखाली काम करणारे कर्मचारी.ह्या सर्वाना समानतेने वागवणे, त्यांना मदत करणे, त्यांचे हक्क त्यांना मिळून देणे, त्यांच्यासाठी  प्रार्थना करणे ह्या सर्व कार्याद्वारे आपण आपल्या शेजाऱ्याप्रती असलेली आपली प्रीती दर्शवितो. आपण जशी स्वतःवर  प्रीती करतो तशीच प्रीती आपण इतरांवरही केली पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा इतरांमध्ये देवाची प्रतिमा पाहू. 

प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रेमळ करुणेचा स्पर्श सर्वांना व्हावा व तुझी प्रीतीची आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून कृपा दे,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या