तिसावा सप्ताह
सोमवार
२६ ऑक्टोबर २०२०
"बाई, तु सर्व विकार पासून मुक्त झाली आहेस."
"देवाचे प्रेम करुणा व सामर्थ्य प्रभू येशूच्या वाणीद्वारे व स्पर्शाद्वारे ओसंडून वाहत असते त्याच्या कृपेच्या अखंडित वाहणाऱ्या झाऱ्यामध्ये आपल्याला सर्व विकार, आजार, दुष्टता व पापापासून मुक्तता मिळते व आपले तारण होत असते"
पहिले वाचन : इफिस ४:३२-५:८
वाचक : पौलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताकरवी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा . तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता आणि लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये . तसेच अमंगळपण, बाष्फळ गोष्टी आणि टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणासही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहा .
पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणा-या लोकांवर देवाचा कोप होतो, म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात . प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला .
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १२२:१-५
प्रतिसाद : देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.
१)जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही,
पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो,
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य .
२)जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्याला हंगामी फळ देते,
ज्याची पाने कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा तो आहे
आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते .
३)दुर्जन तसे नाहीत .
ते वाऱ्याने उडून जाणा-या भुशासारखे आहेत.
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो,
पण दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो .
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे,
कारण जे काही मी आपल्या पित्यापासून
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे .
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १३: १० - १७
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
सर्व : हे प्रभो, तुझा गौरव असो .
येशू शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती, ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले आणि म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस . ” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागली . येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यात काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत. तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका . ” परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो,तुम्हापेकी प्रत्येकजण आपला बैल किवा गाढव शब्बाथ दिवशी गोठयातून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहामची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते . शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?” तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला .

0 टिप्पण्या