Marathi Bible Reading | St. Simon and St. Jude | 28th October 2020

                                          

सामान्य काळातील

तिसावा सप्ताह

                   संत सायमन व ज्यूड ह्यांचा सण (प्रेषित )

  बुधवार   

२८ ऑक्टोबर २०२०

"तुम्ही पवित्र जनांच्या बरोबरीचे आणि देवाच्या घरचे आहात"

"संकट समयी, दुःखात, अशक्तपणा अनेक प्रकारचा त्याग व प्रसंगी मरण सहन केले असताना सुद्धा संत गणाद्वारे ख्रिस्ताचे राज्य प्रगतीपथावर राहिले, अशा सर्व स्थितीत आपण आपला सहभाग देऊन संतांचे कार्य चालू ठेवायचे आहे"

पहिले वाचन : इफिस २:१९-२२

वाचक :  पौलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

तुम्ही आतापासून परके आणि उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहात, प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वत:ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे, त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते, प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्याद्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात .

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १९:२-५

प्रतिसाद : त्यांचा स्वर पृथ्वी वापतो. 


१)आकाश देवाचा महिमा वर्णिते,

अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते .

दिवस दिवसाशी संवाद करतो,

रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

 

२)वाचा नाही, शब्द नाही,

त्यांची वाणी ऐकू येत नाही

तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो,

त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात .


३)शय्यागृहातून वरा सारखा तो बाहेर पडतो,

तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो .

तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो .

हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासावद्दल

आम्ही तुझी स्तुती करतो .

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक ६: १२ - १६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .


येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांस बोलावले आणि त्यातून पुढील बारा जणांस निवडून त्यांस प्रेषित असे नावही दिले : शिमोन, ह्माला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थॉमस, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
गुरूबरोबर राहून शिक्षण घेणारे ते शिष्य आणि विशेष कामगिरीवर पाठवलेले ते प्रेषित. येशूने संपूर्ण रात्रभर देवाकडे प्रार्थना केली आणि उजाडल्यावर शिष्यांपैकी बारा प्रेषितांस त्याने निवडले. अशासाठी की पुढे जाऊन हेच प्रेषित येशूची सुवार्ता जगभर पसरवतील| आज ख्रिस्तसभा संत सायमन व ज्यूड ह्मांचा सण साजरा करीत आहे| येशूचे प्रेषित हे साधे भोळे  होते. पण त्यांची मेहनत, उत्साह, चिकाटी आणि विश्वास दांडगा होता. संत सायमन व ज्यूड ह्मांच्या सणाच्या दिवशी या दोन्ही संताकडून प्रेरणा घेऊया. येशूच्या सुवार्ता प्रचारात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्याग व विश्वासूपणा त्यांच्या जीवनात दिसून येतो. त्यांच्यासारखे  विश्वासूपणाचे जीवन जगण्यासाठी प्रभूकडून प्रेरणा घेऊया.

प्रार्थना - हे प्रभू परमेश्वरा तुझी संत संतगणाद्वारे आम्हाला प्रेरणा मिळते तुझे सुवार्ताकार्य करण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या