तिसावा सप्ताह
सेंट नार्सिसस ह्यांचा सण
गुरुवार
२९ ऑक्टोबर २०२०
"मला आज, उद्या व पर्वा पुढे गेले पाहिजे"
"संत पौल म्हणतो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा, सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा"
पहिले वाचन : इफिस ६:१०-२०
वाचक : पौलाचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्यांने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमासांबरोबर नव्हे, तर सत्ताधाऱ्याबरोबर, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या कळोंखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा आणि सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागॄत राहा| ज्या सुवार्तेपायी बेडया पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे काळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे आणि जसे बोलावयास हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे म्हणून माझ्यासाठी विनवणी करा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १४४:१-२,९-१०
प्रतिसाद : परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो.
१)परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो,
तो माझ्या हातांना लढावयास शिकवतो,
माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवतो.
२)तो माझा दयानिधी, माझा दुर्ग,
माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे,
मी त्याचा आश्रय घेतो.
तो माझ्या प्रजाजनांना माझ्या अंकित करतो.
३)हे देवा, मी तुला नवे गीत गाईन,
दशतंतू वीणेवर मी तुझे गुणगान गाईन ,
तूच राजांना विजय देणारा आहेस,
तूच आपला सेवक दाविद ह्माला मुक्त करणारा आहेस.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता,
आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १३: ३१ - ३५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
काही परूशी येऊन येशूला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जिवे मारावयास पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, “त्या कोल्ह्माला जाऊन सांगा, पाहा, मी आज आणि उद्या भुते काढतो आणि रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन, तरी मला आज, उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे, कारण येरूशलेमाबाहेर संदेष्टयाचा नाश झाला असे व्हायचे नाही.
येरूशलेमा, येरूशलेमा, संदेष्टयांचा घात करणाऱ्या आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांस दगडमार करणाऱ्या ! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा तशी नव्हती. पाहा, तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हास सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित’, असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दॄष्टीस पडणार नाही.

0 टिप्पण्या