Marathi Bible Reading | Friday | 30th October 2020

 सामान्य काळातील

तिसावा सप्ताह

  शुक्रवार   

३० ऑक्टोबर २०२०

"शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही"

"आपल्या प्रत्येकाला देवाच्या दयेचा व कृपेचा अनुभव यावा त्याच्या प्रीतीत आपली वाढ व्हावी आणि प्रीतीची सुवार्ता आपण पण सर्वांपर्यंत पोहोचवावी म्हणून प्रयत्नशील बनू या"

पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र १:१-११

वाचक :  पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.

फिलिप्पी येथील महागुरू आणि प्रसेवक ह्मांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणाऱ्या सर्व पवित्र जनांना ख्रिस्त येशूचे दास पौल आणि तिमथी ह्मांच्याकडून : देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्मांच्यापासून तुम्हाला कॄपा आणि शांती असो| मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे तसे करतो आणि पुन्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक विनंतीच्या वेळेस आनंदाने विनंती करतो. ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसांपर्यंत सिद्धीस नेईल अशी मला खात्री आहे आणि तुम्हा सर्वांविययी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधीच्या प्रत्युत्तरात आणि समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कॄपने भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंत:करणात तुम्हाला बाळगून आहे. माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्माविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उतराउत्तर अतिशय वाढावी| जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मल आणि निर्दोष असावे आणि देवाचा गौरव आणि स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाच्या फळांनी  तुम्ही भरून जावे. 

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र १११:१-६

प्रतिसाद : परमेश्वराची कॄत्ये थोर आहेत. 


१)परमेश्वराचे स्तवन करा,

सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत

मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन,

परमेश्वराची कॄत्ये थोर आहेत,

ज्यांस ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.

 

२)त्याची कॄती साक्षात वैभव आणि महिमा आहे,

त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.

आपल्या अद्भुत कॄत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे.

परमेश्वर दयाळू आणि कळवळु आहे. 


३)त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे,

तो आपला करार सदा आठवतो.

त्याने आपल्या लोकांस राष्ट्रे वतनादाखल देऊन,

आपल्या कॄत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्माचा पिता हा आमचे

अंत:चक्षू प्रकाशित करो म्हणजे 

त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे  निर्माण

होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी|

आलेलूया !


शुभवर्तमान 

लूक १४: १ - ६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .


येशू एका शब्बाथ दिवशी परूश्यातील कोणाएका अधिकाऱ्या याच्या घरी भोजनास गेला तेव्हा ते त्याच्या पालथीवर बसले होते आणि पाहा, जलोदर झालेला कोणीएक माणूस त्याच्यासमोर होता. येशूने शास्त्रयांस आणि परूश्यांस विचारले, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही” तेव्हा ते गप राहिले, मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले आणि जाऊ दिले. मग त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा गाढव किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. 


प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
शरीरात पाण्याचा जास्त संचय झाल्याने शरीर सुजते व फुगते त्याला जलोदर म्हणतात आणि येशू अशा माणसाला शब्बाथ दिवशी बरे करतो. देवाने निर्माण केलेल्या सॄष्टीची देखभाल करणे म्हणजे देवाचे कार्य सिद्धीस नेणे होय. मग कुठलाही दिवस असू दे. आपण मागे हटू नये. कारण देवाच्या सॄष्टीची राखण आणि मशागत आपल्यालाच करायची आहे. आपणासाठी प्रत्येक दिवस हा शब्बाथ दिवस असला पाहिजे की जेणेकरून आपण देवाचे नाव घेऊ व त्याच्या निर्मितीची राखण करू. मग तो प्राणी असो, पक्षी असो किव्वा मनुष्य असो, येशूने असा विचार केला नाही की मी आता भोजनास बसलो आहे, ह्माला स्पर्श केला तर मी अशुद्ध होईन, शिवाय आज शब्बाथ दिवस आहे, येशूने फक्त त्या माणसाच्या वेदना पाहिल्या व त्याला बरे केले. 

प्रार्थना -हे प्रभू येशू तुझ्या प्रीतीत वाढण्यास व तुझी कृपा अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे,आमेन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या