पवित्र जपमाळेची माता सण
हे पवित्र मारिया माते , आमचे कैवारीणी,अम्हासाठी तुझ्या पुत्रापाशी विनंती कर, आमेन .
प्रेषितांचीं कृत्यें १:१२-१४
नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरुन यरुशलेमास परत गेले. (हा डोंगर यरुशलेमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.)
प्रेषित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते, त्या ठिकाणी गेले. ही माडीवरची खोली होती. त्या ठिकाणी हे प्रेषित होते: पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, याकोब (अल्फीचा पुत्र), शिमोन (झिलोटम्हणून माहित असलेला) आणि यहूदा (याकोबाचा पुत्र).
हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते. ते एकाच उद्देशाने सतत प्रार्थना करीत होते. काही स्त्रिया, मरीया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते.
हा प्रभूचा शब्द आहे...
स्तोत्र १:४६-५५
प्रतिसाद : पाहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
१)आणि मरीया म्हणाली, “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो. कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली, होय, येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
२)कारण सर्वमसर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
३)त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले; गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे. सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे, आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
४)त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे. श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे. त्याचा सेवक जो इस्राएल याला मदत करण्यास तो आला आहे.
शुभवर्तमान
लूक १:२६-३८
अलीशिबाच्या सहाव्या महिन्यात, देवाने गब्रीएल दूताला गालीलातील नासरेथ गावी पाठविले. योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्याघराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते. गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.” परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल. याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी तो सत्ता चालवील त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही.” तेव्हा मरीया दूताला म्हणाली, “मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल?” देवदूत तिला म्हणाला, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील. आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्याला देवाचा पुत्र म्हणतील. आणि याकडे लक्ष दे: तुझी नातेवाईक अलीशिबा जरी वांझ असली तरी तीसुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे. आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे! कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.” मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या