संत फ्रान्सिस बॉर्जिया सण
लोकांनी आपल्याला कसेही वागविले तरी आपण मात्र सत्पथावरील आपला प्रवास थांबविता कामा नये.विशेषतः देवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यक तो अभ्यास करीतच राहावे.-संत फ्रान्सिस बॉर्जिया
गलतीकरांस ३:२२-२९
पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग हे पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे. हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांलाप्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही. कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि अभिवाचनाद्वारे वारस आहा.
हा प्रभूचा शब्द आहे...
स्तोत्र १०५:२-७
प्रतिसाद : परमेश्वर आपला करार सर्वकाळ आठवतो.
१)परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा.परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.
२)शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
३)तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावरराज्य करतो.
जयगोष स्तोत्रे ११९:१०५
आलेलूया,आलेलूया !
तुझे वचन माझ्या पावल्या करिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक ११:२७-२८
असे घडले की, तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!” परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
प्रभूचे हे शुभवर्तमान...
0 टिप्पण्या