संत लिओनार्ड , ह्यांचा सण (वर्तन साक्षी)
शनिवार
६ नोव्हेंबर २०२०
"आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे"
"लुमिझिंचे संत लिओनार्ड सहाव्या शतकातील संत. तो एक माठवाशी होता. त्याला आजारी, मंदबुद्धी, प्रसुतिवेदना सहन करणाऱ्या स्त्रियांचा आणि तुरुंगातील कैद्यांचा आश्रयदाता संत मानले जाते."
पहिले वाचन : फिलिप्पीकरांस पत्र ३:१७-४:१
वाचक : पौलाचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन.
बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले आणि आताही रडत सांगतो की, पुष्कळ जन असे वागतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसाचे वैरी आहे. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचेआमचे दैनावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. म्हणून प्रियाजनहो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद आणि मुकूट आहात. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
स्तोत्र १२२:१-५
प्रतिसाद : आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ.
१)“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ”
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरूशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
२)हे येरूशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी
चढून येतात.
३)इस्रायलला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात.
कारण तेथे न्यायासने,
दाविदच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.
जयगोष
आलेलूया,आलेलूया !
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे,
ते मनातील विचार आणि हेतू ह्मांचे परीक्षक आहे.
आलेलूया !
शुभवर्तमान
लूक १६: १-८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .
येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर, “हा तुमचे द्रव्य उडवतो,” असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण ह्मापुढे तू कारभार पाहायचा नाही.” मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करावे? कष्ट करण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्याला समजून घ्यावे म्हणून मी काय करावे या बाबत मला एक मार्ग सुचला आहे. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्मावर पन्नास मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर खंडी गहू? तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि ऐशी मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले, हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्मा युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.

0 टिप्पण्या