Marathi Bible Reading | Saint Godfrey | 8th November 2020

सामान्य काळातील 
बत्तिसावा सप्ताह
 
संत गॉडफ्री ह्यांचा सण (वर्तंनसाक्षी) 

रविवार 

८ नोव्हेंबर २०२० 

"तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस आणि ती घटका ठाऊक नाही." 

"जो मनुष्य तेजोमय ज्ञानाने भरलेला असतो. तो त्या प्रकाशात राहून आपल्या जीवनावर चिंतन करीत असतो. त्याला आपल्या भावी जीवनाबद्दल आस्था असते म्हणून सर्वदा जागृत राहून जीवन जगणे त्याला सोपे जाते. प्रभू आपल्या सर्वांच्या भेटीस पुन्हा येणार आहे. त्याला समोरा समोर पाहण्यास व भेटण्यास आपण तयारी करूया. जीवनात सर्वदा जागृत व दक्ष राहून प्रभूला अपेक्षित जीवन जगण्यासाठी प्रभूचे सामर्थ्य व कृपा मागूया."

पहिले वाचन : प्रज्ञाग्रंथ ६:१२-१६

वाचक : प्रज्ञाग्रंथ यातून घेतलेले वाचन.

ज्ञान तेजोमय आणि अक्षय आहे. त्याची आवड धरणाऱ्यांना हे सहज लाभते. त्यांचा शोध घेणाऱ्यांना ते सापडते, त्याची अपेक्षा करणाऱ्यांना ते स्वत:ची जाणीव करून देण्याची घाई करते. त्याचा ध्यास घेण्यासाठी जो सकाळी लवकर उठतो, त्याला कोणतीही अडचण भासणार नाही. कारण ते त्याला आपल्या दाराशी बसलेले सापडेल. त्याच्यावर आपला विचार केंद्रीत करणे हीच पूर्ण समज आहे. त्याच्याबाबत दक्ष असणारा लवकरच साऱ्या चिंतांमधून मुक्त होईल. कारण ज्ञान त्याला अनुरूप असणाऱ्यांचा शोध घेते आणि त्याच्या मार्गावर ते स्वत:ला मोहकपणे सादर करते. प्रत्येक चिंतनामध्ये ते त्याला लाभते.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ६३:२-८

प्रतिसाद : हे देवा, तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला आहे.


१)हे देवा, तू माझा देव आहेस,मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, रुक्ष आणि निर्जल प्रदेशात माझा जीव  तुझ्यासाठी तहानलेला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


२)अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुझे स्तवन करतील.


३)मी जिवंत आहे तोपर्यंत तुला धन्यवाद देईन, तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. मज्जेने आणि मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल. आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.


4)मी रात्री आपल्या अंथरूणावर पडून तुझे स्मरण करतो आणि प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करत असतो, कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.


दुसरे वाचन : थेस्सलनिकाकरांस ४:१३ १८

वाचक :   पौलचे थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन :

(बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशु मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.)

प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की, प्रभुचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.म्हणून ह्या वाचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

जागृत आणि सिद्ध राहा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेला मनुष्याचा पुत्र येईल. आलेलुया!

आलेलूया !


शुभवर्तमान 

मत्तय २५: १-१३

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

"पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला." 

येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितलाः “स्वर्गाचेराज्य दहा कुमारीसारखे होईल, त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला आणि सर्वांस डुलक्या आल्या आणि झोप लागली. तेव्हा मध्यरात्री हाक आली की, पाहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपआपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही दया, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की, कदाचित आम्हांला आणि तुम्हाला पुरणार नाही, तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वत:करिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला, तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नाला गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभो, प्रभो आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हांला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हांला तो दिवस आणि ती घटका ठाऊक नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 


चिंतन :
प्रज्ञांथात स्पष्ट केले आहे की, ज्ञान तेजोमय आणि अक्षय आहे. हे ज्ञान शोधणाऱ्याला सापडते. जो त्याचा ध्यास घेऊन लवकर उठतो. त्याला अडचण येणार नाही. याचा अर्थ देवाच्या शब्दाचे सतत निरंतर चिंतन केल्याने आपणास जणू खजिना सापडलेला आहे असे पहिल्या वाचनात सांगितले आहे. जीवन जगत असता दैवी ज्ञान व जागतिक ज्ञान ह्यातील फरक समजणे आवश्यक आहे. दैवी ज्ञान शाश्वत चिरकाळ आहे. जागतिक ज्ञान क्षणभंगूर आहे तरी जगातील सर्व काही आपण संपन्न करतो त्याद्वारे जर प्रभूचा गौरव होत असेल, समाज उभारला जात असेल तरच आपण प्रभूच्या वचनाचे रखवालदार बनतो. दैवी ज्ञानाच्या प्रकाशात राहतो.

प्रार्थना - हे प्रभू येशू तुला भेटण्यास मी सर्वदा तयार असावे म्हणून मला ज्ञान व शहाणपण दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या