Happy New Year to All the Readers | 1st January 2021

  


शुक्रवार 

१ जानेवारी २०२१

 प्रभूजन्मानंतरचा आठवा दिवस 

पवित्र देवमाता मरियेचा सोहळा

देवपुत्र जिच्या उदरी जन्माला आला ती पवित्र मरिया परमेश्वराठायी पवित्र, शुद्ध आणि निर्मळ होती, तिच्यावर देवाची कृपा पूर्ण स्वरुपात होती, अर्थात ती देवस्वरुप होती. म्हणूनच आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेचा देवाची माता मरिया ह्या नावाने सोहळा साजरा करीत आहे.

आज आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असताना देवमाता मरियेच्या जीवनावर चिंतन करु या.  पवित्र मरया धीर-गंभीर आहे. मात्र तिचा चेहरा तेजस्वी आणि सुंदर आहे कारण परमेश्वराच्या  तारणकर्ता योजनेत ती पूर्णपणे सहभागी व समरस झाली होती. गाब्रियल दुताचा  संदेशापासून ते कालवरीच्या टेकडीपर्यंत पवित्र मरिया देवाबरोबर एकनिष्ठ  राहिली. आजच्या शुभवर्तमानातील मेंढपाळानी दिलेला संदेश मरियेने आपल्या जीवनात घडलेल्या सर्वच घटना आपल्या अंत:करणात साठविल्या आणि त्यावर मनन-चिंतन करुन देवाची तारणदायी मार्ग तिने चोखाळला. प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे ती आपल्या सर्वाची सुद्धा माता बनली. म्हणूनच ख्रिस्तसभा  पवित्र मरियेचा देवमाता मरिया असा सन्मान करीत आहे.
✝️

मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. "

✝️


पहिले वाचन : गणना  ६:२२-२७

वाचक :    गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन ६:२२-२७

    परमेश्वर मोशेला म्हणाला, "अहरोन त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना असे म्हणा : परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो. या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांवर माझे नाम मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ६७:२-३,५,६.८

प्रतिसाद : हे देवा, आम्हांला आशीर्वाद दे.

१.  हे परमेश्वरा, आम्हांवर दया कर. आम्हांला आशीर्वाद दे. तू आपला मुखप्रकाश आम्हांवर पाड. यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, सर्व राष्ट्रांना तू सिद्ध केलेले तारण समजावे.

२.  राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतोस व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस.

३.  हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्र तुझी स्तुती करोत. देव आम्हांला आशीर्वाद देवो व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.


दुसरे वाचन

वाचक : पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ४:४-७

काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आम्हांला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहा, म्हणून देवाने अब्बा, बापा, अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत:करणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस.
 हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                                      

आलेलूया,आलेलूया !

देव प्राचीन काळी निरनिराळ्या मार्गे संदेष्ट्यांच्याद्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला परंतु ह्या अंतिम काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आम्हांबरोबर बोलला आहे.

आलेलूया !

शुभवर्तमान 

 लूक  २:१६-२१

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  २:१६-२१

    मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळही त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करीत परत गेले.

आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान...



चिंतन : इ.स.४३१ साली एफसस (तुर्कस्थान) येथे एक ख्रिस्ती धर्मपरिषद भरलेली होती. पवित्र मरिया नक्की कोण आहे या विषयावर धर्मपंडितांमध्ये व त्या वेळच्या बिशपांमध्ये चर्चा सुरू होती. चार ग्रीक शब्द त्यांच्यासमोर होते. हॉ-टॉकॉस, अँथ्रोपोटॉकॉस, खिस्तोटॉकॉस आणि थिओटॉकॉस, इथे टॉकॉस म्हणजे वाहक परंतु जेव्हा एखादी स्त्री आपल्या उदरात बाळ धारण करते तेव्हा या शब्दाचा अर्थ आई किंवा माता असा होतो. यावरून पवित्र मरिया ही केवळ आई होती, येशू ह्या मानवाची आई होती, ख्रिस्ताची आई होती की साक्षात् देवाची आई होती ? असे प्रश्न चर्चेला घेण्यात आले. शेवटी ती देवाची आई आहे हे धर्मतत्त्व संमत करण्यात आले. 'पवित्र मरिया ही देवाची आई आहे' ह्या धर्मत्त्वामध्ये येशू हा साक्षात देव आहे हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. आजच्या शुभवर्तमानातून आपल्या चिंतनासाठी एकूण तीन गोष्टी मिळतात. 
१) अंतर्मुख होणारी मरिया : मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेविल्या. परमेश्वराची माता हा सन्मान मिळविणाऱ्या मरियेचे अंतःकरण विशाल होते. देवराज्यात महत्वाची भूमिका बजावायची असेल तर त्यासाठी मन मोठे असावे लागते. 
२) आज्ञा पाळणारी मरिया : तुझ्या इच्छेप्रमाणे होवो अशा शब्दांत आपल्या योजना बाजूला सारून परमेश्वराची इच्छा प्रमाण मानणारी मरिया सामाजिक-धार्मिक रितीरिवाजांचेही प्रेमाने पालन करते. सुंता हा धार्मिक रिवाज ती पाळताना दिसते. देवाच्या आज्ञा व धार्मिक रितीरिवाज ह्यांच्यात सुसंगती असेल तर त्यांचे पालन करणे सर्वांच्या हिताचे ठरते. 
३) 'येशूची आई- मरियाः आजच्या दिवशी येशूचा नामकरणविधी साजरा झाला. खिस्तसभा दरवर्षी ३ जानेवारी रोजी 'येशूचे पवित्र नाम' हा सण साजरा करते. हे नाव ऐकणारी जगातील पहिली स्त्री म्हणजे पवित्र मरिया. आजच्या शुभवर्तमानात त्याचा पुसटसा उल्लेख करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ येशूचे दैवी रूप समजून घेताना त्याचे मानवी रूप नजरेआड होता कामा नये.
आत्मपरीक्षण : पवित्र मरिया देवमाता आहे. ह्या धर्मसत्याचा माझ्या मरियाभक्तीवर, कोणता प्रभाव दिसून येतो ? माझ्या समाजातील कोणते रितीरिवाज परमेश्वराच्या योजनेला धरून आहेत /नाहीत?

प्रार्थना :   हे पवित्र देवमाते, तुझ्या मायेच्या पंखाखाली आम्हाला आश्रय दे व तुझे अनुकरण करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आम्हासाठी तुझ्या पुत्राकडे विनंती कर, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या