Marathi Bible Reading | Feast of St. Agatha | Friday 5th February 2021

सामान्य काळ 

शुक्रवार  

५ फेब्रुवारी  २०२१


संत आगाथाचा सण 
(रक्तसाक्षी)
मरतेसमयी आगाथाच्या  तोंडून पुढील शब्द निघाले :

हे प्रभो, माझ्या निर्माणकर्त्या, तू अगदी पाळण्यापासून माझे संरक्षण करीत आलेला आहेस. माझ्याकडून तू ऐहिक सुखाची ओढ काढून घेतलीस आणि त्याऐवजी मला सहनशीलतेची देणगी दिली. आता माझा आत्मा स्वीकार."

संत आगथाने आपले सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्ताला वाहिले. कौमार्याची शुद्धता तिने त्याला अर्पण केली आणि त्यात टिकून राहण्यासाठी तिने त्याच्याकडे संरक्षण मागितले आणि आजवरही ख्रिस्ताने तिचा देह कोवळा लुसलुशीत आणि ताजा टवटवीत ठेवलेला आहे. जेव्हा जेव्हा माऊंट एला येथे उद्रेक होतात तेव्हा कॅटानियाचे श्रद्धावंत ख्रिस्ती लोक तिचा अविनाशी देह दर्शनासाठी बाहेर काढतात. संत पीटरच्या स्पर्शाने पूर्ववत झालेली तिची त्वचा वेगळ्याच तेजाने झळाळते. तेव्हा तिचा देह खरोखर पवित्र आत्म्याचे मंदिर असावे असे जाणवल्यावाचून राहत नाही.

चिंतन : “हे येशू ख्रिस्ता, सर्वांच्या प्रभो, तू माझ्या हृदयाकडे पहा, तुला माझ्या सर्व इच्छा आकांक्षा ठाऊक आहेत. जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे. तू माझा मेंढपाळ, मी तुझे कोकरू आहे. मला दुष्ट शक्तीवर विजय मिळविण्यास सहाय्य व सत्पात्र कर" -संत आगथाची प्रार्थना.

✝️

"बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.” 

✝️

पहिले वाचन :इब्री लोकांस पत्र १३:१-८ 

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

बंधुप्रेम टिकून राहो. अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण ते करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहा असे समजून त्यांची आठवण करा; आपणही शरीरधारी आहो म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्व आदरणीय असावे आणि अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी आणि व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वत: म्हटले आहे, "मी तुला सोडून जाणार नाही आणी तुला टाकणार नाही." म्हणूनच आपण धैर्याने म्हणतो,
प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?"
जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  २७:१,३,५,८-९

प्रतिसाद :  परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे सहाय्य आहे.

१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे सहाय्य आहे, मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू?

२) सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही, माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन.

३) कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील. मला तो आपल्या डेऱ्यात गुप्त स्थळी ठेवील, तो मला उंच खडकावर सुरक्षित ठेवील.

४) हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे; तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर लोटू नको; तू माझे सहाय्य होत आला आहेस.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे परमेश्वरा, तुझ्या नियमानुसार चालण्यास मला शिकव आणि ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.

आलेलूया !


शुभवर्तमान :मार्क ६:१४-२९

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

        हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, "बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.” कोणी म्हणत, "हा एलिया आहे," कोणी म्हणत, "हा संदेष्टा, म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे." परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, "ज्या योहानचा मी शिरच्छेद केला, तोच उठला आहे." आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया, तिच्याबरोबर लग्न केले होते म्हणून योहान त्याला म्हणत असे, "तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे शास्त्र नाही.' ह्याकरिता हेरोदने स्वत: माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते व हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना; कारण योहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके, तेव्हा फार गोधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक सोयीस्कर दिवस आला. तेव्हा हेरोदने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार आणि गालिलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली आणि हेरोदियाच्या मुलीने स्वत: आत जाऊन आणि नाच करून हेरोदला आणि त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूष केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही हवे ते माझ्याजवळ माग, मी ते तुला देईन. माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन,"असे तो शपथ वाहून तिला म्हणाला, तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, "मी काय मागू?" ती म्हणाली, "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचे शीर." तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, "माझी अशी इच्छा आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे." तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि दिलेल्या वचनामुळे आणि भोजनास बसलेल्या लोकांपुढे त्याला तिला नाही म्हणता आले नाही. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायाला पाठवून योहानचे शीर आणावयाची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले आणि मुलीने ते आपल्या आईला दिले. हे कळल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यानी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले. 

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात आपल्याला दोन परस्पर विरोधी स्वभावाची माणसे भेटतात. बाप्तिस्मा करणारा योहान आणि राजा हेरोद अंतीपास. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने हेरोद राजाला चुकीच्या वर्तणुकीबद्दल सक्त ताकीद दिली. बप्तिस्मा करणाऱ्या योहानाला आपले देवाबरोबरचे नातेसंबंध महत्वाचे वाटले, तर राजा हेरोदाला लोकांच्या मनातील स्वयंप्रतिमा महत्वाची वाटली. हे शुभवर्तमान आपल्याला आपल्या जीवनावर चिंतन करुन, आपण आपले काम करीत असताना कशाला प्राधान्य देतो, यावर विचार करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. आपल्यासाठी देवाबरोबरचे आपले नातेसंबंध महत्वाचे आहेत की, जनमानसातील आपली पत -प्रतिष्ठा महत्वाची आहे ? लोकांना खूश करण्यापेक्षा, बाप्तिस्मा करणाऱ्या योहाना प्रमाणे आपण देवाला आवडते तसे जीवन जगण्याचा मनापासून प्रयत्न करुया.

प्रार्थना : -: हे प्रभू येशू, तूच आमचे सर्वस्व आहेस. तुला आम्ही शरण आलो आहोत, आमचा स्वीकार कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या