Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Feast of St Josephine Bakita | Monday 8th Feb 2021

सामान्य काळ 

सोमवार 

८ फेब्रुवारी  २०२१


संत जोसेफीन बाखीत  


देवाने जगाची व मानवाची उत्पत्ती केली. देव फक्त बोलला आणि सर्वकाही निर्माण झाले. देवाच्या वाणीत सामर्थ्य व जीवन आहे. त्याच्या स्पर्शात तर अद्भुत शक्ती आहे. 
देवाचा पुत्र प्रभू येशु ख्रिस्त हा नवी पृथ्वी व नवे आकाश निर्माण करण्यासाठी आला होता. त्याची वाणी व त्याचा स्पर्श जीवनदायी होता. 

 प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शने मुके बोलू लागतात, आंधळे पाहू शकतात, पांगळे चालू लागतात. त्याच्या पवित्र स्पर्शने सर्व प्रकारचे रोग आणि असाध्य आजार बरे होतात. त्याच्या स्पर्शाने फक्त शारीरिक आजारच नव्हे तर माणसाचे पापी जीवन पूर्णपणे बदलून जाते आणि मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचा लाभ होतो.  प्रभू येशू ख्रिस्त, ख्रिस्त शरीर संस्कारामध्ये प्रत्यक्ष हजर असतो.  आपले सर्व व्याधी दूर होऊन आपणास जीवनमुक्ती मिळते. आजच्या दिवशी स्वत:साठी प्रार्थना करीत असतांनाच आपले नातेवाईक व जे सर्वजण अनेक प्रकारच्या आजारात कष्ट सोशित आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. 
✝️

 "येशूला जितके स्पर्श करीत तितके बरे होत असत."

✝️

पहिले वाचन :उत्पत्ती १:१-१९ 

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

    प्रारंभी देवाने आकाश आणी पृथ्वी ही उत्पन्न केली. तेव्हा पृथ्वी आकारविरहीत आणि शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधःकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.

        तेव्हा देव बोलला, "प्रकाश होवो" आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला तो आवडला. देवाने प्रकाश आणि अंध:कार हे वेगवेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस आणि अंध:काराला रात्र म्हटले आणि सायंकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस. मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलास दुभागणारे होवो." असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या आणि वरच्या जलास दुभागिले आणि तसे झाले. देवाने अंतराळाला आकाश म्हटले आणि सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा दुसरा दिवस.
        मग देव बोलला, "आकाशाखाली जलांचा एके स्थळी संचय होवो आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो" आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले आणि जलांच्या संचयाला समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे तेव्हा देव बोलला, "हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो."आणि तसे झाले. हिरवळ, आपआपल्या परी बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा तिसरा दिवस.  
मग देव बोलला, "दिवस आणि रात्र हे भिन्न करण्यासाठी आकाशमंडळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशमंडळात त्या दीप होवोत." आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत आणि तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस आणि रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यांस भिन्न करावे, म्हणून देवाने आकाशमंडळात त्या ज्योती ठेवल्या, देवाने पाहिले की हे चांगले आहे. सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा चौथा दिवस.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  १०४:१-२अ,५-६,१०.१२,२४-३५क

प्रतिसाद :परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो!

१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस, तू सन्मान आणि महिमा ह्यांनी मंडित आहेस; तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस. 

२) तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादले, पर्वतांवर जले स्थिर राहिली.

३) तो खोऱ्यातून झरे काढतो, ते डोंगरांमधून वाहतात. त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात; ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात.

४) हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केली. तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे. हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.

आलेलूया !


शुभवर्तमान :मार्क ६:५३-५६
वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू आणि त्याचे शिष्य पलीकडे जाऊन गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहचले तेव्हा त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत सुटले आणि जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले तेथे तेथे ते आजाऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरात किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते आजाऱ्यांना भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजारी व नानाविध व्याधींनी ग्रस्त अशा लोकांना बरे करणारा करूणामयी ख्रिस्त शुभवर्तमानात आम्हाला भेटत आहे. या साध्याभोळ्या भाविकांबद्दल येशूच्या मनात अतीव करुणा भरलेली आहे. शहरात, शेतामळ्यात, रस्त्याच्या कडेला सर्वत्र आजारी माणसे येशूभोवती बरे होण्यासाठी गर्दी करीत आहेत. येशू त्यांना निराश करीत नाही. त्याच्या आरोग्यदायी कृपेचा स्पर्श होण्यासाठी असंख्य भाविक धडपडत आहेत. आम्हालादेखील हा आरोग्यदायी स्पर्श हवा आहे. हे प्रभू येशू आमची तुझ्यावरील श्रद्धा द्दढ कर.

प्रार्थना : हे प्रभू येशू, ख्रिस्ता, मला स्पर्श कर आणि मला शुद्ध करून नवजीवनाचे वरदान दे, आमेन.