सामान्य काळ
मंगळवार
९ फेब्रुवारी २०२१
संत मिंग्वेल कोर्देरो
(वर्तनसाक्षी )
" येशूला जसा हवा तसा त्याने माझा वापर करावा म्हणून मी स्वत:ला संपूर्णत: त्याच्या हाती सोपवतो. मी लिहिलेला प्रत्येक शब्द, वाचलेले सर्व काही, माझ्या टेबलावर जे काही मी करतो आणि शाळेतील माझी सर्व कार्ये मी देवाच्या महान गौरवासाठी अर्पण करू इच्छितो." संत मिंग्वेल कोर्डेरो
परमेश्वाराचा गौरव व्हावा, परमेश्वराची स्तुती व्हावी व त्याचा सामर्थ्यशाली वैभवाचा सदासर्वदा मानवाने सन्मान करावा एवढीच परमेश्वराची अपेक्षा. म्हणून परमेश्वराने विश्व निर्माण केले व शेवटी त्याची प्रतिमा म्हणजेच मानवाला निर्माण केले. मात्र मानवाने परमेश्वराची आज्ञा मोडली. पण परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे.
शास्त्री-परूश्यांची प्रभू येशू कान उघडणी करीत आहे. खऱ्या अर्थाने नियमशास्त्र पाळणे म्हणजे देवाच्या आज्ञा पाळणे व देवाच्या वचनानुसार जीवन जगणे होय. देवाचे वचन आत्मसात करुन देवाबरोबर संवाद साधावा लागतो. आपण वरवरचा देखावा न करता अतं:करणापासून खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परमेश्वर अंतःकरण जाणणारा आहे. आपल्या अंतःकरणात कोणत्या भावना व विचार आहेत हे परमेश्वराला ठाऊक आहे. आज आपण निश्चय करू या. केवळ ओठांनी नव्हे तर अंत:करणापासून आपण देवाची आज्ञा पाळू व त्याची स्तुति करून ख्रिस्ताठायी एकरूप होण्याचा प्रयत्न करू या.
✝️
"परंतु त्यांचे अंत:करण माझ्यापासून दूर आहे; ते माझी व्यर्थ उपासना करतात."
✝️
पहिले वाचन :उत्पत्ती १:२०-२:४
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
देव बोलला, “जीवजंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत." प्रचंड जलचर, जलात गजबजणारे आणि संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला: फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.
मग देव बोलला, "प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी आणि वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू, आणि जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, "समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवधी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण निर्माण करु." देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, देव त्यांस म्हणाला : "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा." देव म्हणाला, “पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हांला देतो; ही तुमचे अत्र होतील त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यांना अवघी हिरवळ खावयासाठी देतो" आणि तसे झाले. आपण केलेले सर्व चांगले आहे असे देवाने पाहिले. सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली; हा सहावा दिवस.
याप्रमाणे आकाश आणि पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. आकाश आणि पृथ्वी यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद : स्तोत्र ८:४-९
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!
१) आकाश जे तुझे अंगुलीकार्य आणि त्यात तू नेमलेले चंद्र आणि तारे ह्यांच्याकडे पाहावे तर- मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी ? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?
२.) तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे; त्याला गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे, तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवर प्रभुत्व दिले आहे, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहे.
३) शेरडेमेंढरे, गुरेढोरे, अगदी एकूणएक जंगली जनावरे, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे प्राणी देखील तू त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेत.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
देव आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
आलेलूया !
शुभवर्तमान :मार्क ७:१-१३
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. (कारण परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि पेले, घागरी, पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रूढी ते पाळत असत.) ह्यावरून परुश्यांनी आणि शास्त्रांनी त्याला विचारले, "आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत ?" त्याने त्याला उत्तर दिले, "तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असाः
"हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात,
परंतु त्यांचे अंत:करण माझ्यापासून दूर आहे; ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकतात, ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवांची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता." आणखी तो त्यांना म्हणाला, "तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! कारण मोशेने सांगितले आहे की, 'तू आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.' पण तुम्ही म्हणता, 'जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान (म्हणजे अर्पण) केले आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही; अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात. परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे धार्मिक माणसाच्या अंतकरणातील श्रद्धेवर प्रभू आमचे लक्ष वेधीत आहे. केवळ धार्मिक रुढी नुसार वागून नियमांचे पालन करणे पुरेसे नाही. ते निव्वळ कर्मकांड ठरेल. त्यातून भक्तिमान माणसाचे जीवन पवित्र होऊ शकत नाही. हे प्रभू येशू माझ्या अंतर्मनाला स्पर्श कर. तुझ्या आज्ञेनुसार वागण्याची सुबुद्धी मला दे.
प्रार्थना : - हे प्रभू परमेश्वरा, आमच्यातील अहंकार व ढोंगीपणा बाजूला सार आणि अंत:करणापासून तुझी सेवा करण्यास प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या