Marathi Bible Reading | Fifth Sunday In Ordinary Time | 7th Feb 2021

सामान्य काळ 

पाचवा रविवार

७ फेब्रुवारी  २०२१


प्रार्थनेला कृतीचा जोड असावी लागते. तसेच कृती सफल झाल्यावर देवाला धन्यवाद देणे सुद्धा गरजेचे आहे. देवाच्या कृपेशिवाय आणि त्याच्या सहभागितेविना कोणतीच गोष्ट घडत नाही.
 आपण तीन घटनांचा विचार करु या. प्रथम लोकांनी सर्व दुखणाइतांस व भूतग्रस्तांस येशूकडे आणले. प्रभू येशूच्या सामर्थ्यावर ज्यांचा दृढविश्वास आहे, ते गरजवंतांना प्रभू येशूच्या कृपा छत्राखाली घेऊन येत असतात. आपणसुद्धा  लोकांना प्रभू येशू जवळ आणू या . 
 दुसरी घटना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांना बरे केले. आजाऱ्यांना  मुक्ती दिली, भूतग्रस्तास बरे केले, अंधाना दृष्टी दिली. प्रभू  येशूच्या कृपेचा, दयेचा व आरोग्य मुक्तीचा अनुभव आपल्याला आला आहे  तोच   अनुभव आपण इतरांनासांगू या. 
. तिसरी घटना म्हणजे प्रभू येशूने आपले कार्य केल्यावर एकांत  स्थळी जाऊन प्रार्थना केली. अर्थातच देवाला धन्यवाद दिले. आपण प्रार्थनेद्वारे, । उपासने द्वारे किंवा उपवासात असताना देवाचा सहवास अनुभव घेऊन  आपल्याला लाभलेल्या प्रत्येक कृपादाना बद्दल आपण देवाला धन्यवाद देऊ या. 
✝️


 "नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ

माणसांना येशूने बरे केले आणि अनेक भुते

काढली;

✝️

पहिले वाचन :इयोब ७:१-४.६-७

वाचक : इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन 

                   इयोबने बोलण्यास सुरुवात केली, तो म्हणाला, “ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेवली आहे ना ? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात नाही ? आपल्याला सावलीत कधी बसावयाला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो, मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो, त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालवावयाचे आहेत, कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आल्या आहेत. मी पडलो असता म्हणतो, 'मी केव्हा उठेन ?' रात्र केव्हा निघून जाईल? दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझे दिवस विणकऱ्याच्या छोट्यापेक्षा त्वरित जातात, ते निराशेने निघून जातात. "माझा प्राण केवळ वायू आहे, माझ्या डोळ्यांना पुन: कल्याण दिसावयाचे नाही, हे लक्षात आणा."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र १४७ :१-६

प्रतिसाद :परमेश्वराचे स्तवन करा, (कारण तो भग्नहृदयी जनांना बरे करतो.)

१) आलेलुया!

परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे: मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे योग्यच आहे.

२) परमेश्वर येरुशलेम पुन्हा बांधून वसवतो, इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो, भग्न हृदयी जनांना तो बरे करतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो, तो ताऱ्यांची गणती करतो, तो त्या सर्वांना नावे देतो.

३) आमचा प्रभू थोर आणि महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे. परमेश्वर लीनांना आधार देतो, तो दुर्जनांना धुळीस मिळवतो.


दुसरे वाचन:करिंथकरास पहिले पत्र ९:१६-१९.२२-२३

वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

           मी जरी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरविण्याचे कारण नाही. मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल ! मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल आणि आपण होऊन केले नाही तरी माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. तर मग वेतन काय? मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावावा म्हणून मी सुवार्ता फुकट सांगावी.

मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे, मी सर्व प्रकारे अनेकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता, हा आमचे अंतश्चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.

आलेलूया !


शुभवर्तमान :मार्क १:२९-३९

वाचक :    मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू सभास्थानातून निघाल्यावर याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रेया ह्याच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लगेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून उठवले आणि तिचा ताप निघाला व ती त्यांची सेवा करू लागली.

त्या सायंकाळी, सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी लोकांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भुते काढली; त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.

मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले. तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, "सर्व लोक आपला शोध करत आहेत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "मला आसपासच्या गावात उपदेश करिता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे." मग तो संबध गालिलात त्यांच्या सभास्थानांतून उपदेश करीत व भुते काढीत फिरला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : परमेश्वराने माणसाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेले आहे. मानवी जीवन जगत असताना आपल्या अंतरंगी असलेल्या ईश्वरी अंशाचा विसर माणसाने कधीही पडू द्यायचा नसतो. त्या दृष्टीने आजची तिन्ही वाचने आपल्यासमोर चार विचार सादर करतातः 
१) संकटसमयी परमेश्वराचे स्मरण करावेः इयोब ह्या नीतिमान पुरूषावर भयंकर संकट आले होते एकीकडे प्रचंड असे दुःख तर दुसरीकडे मित्रांचे बोचरे शब्द. एक मानव ह्या नात्याने इयोबदेखील अंतर्यामी अस्वस्थ झाला परंतु त्याने परमेश्वराविरुद्ध चकार शब्दही काढला नाही. ज्या देवाने दिले व ज्याने नेले त्याचे नाव धन्य असेच तो म्हणत राहिला. देवाकडून केवळ सुखच घेऊ नये तर दुःखही घ्यावे अशी भूमिका त्याने घेतली. 
२) सुवार्तेसाठी सर्वकाही करावेः संत पॉल ह्याला प्रभू येशूची सुवार्ता पसरविताना नानाविध अनुभव आले. सर्व प्रकारच्या लोकांशी त्याचा संपर्क आला. मात्र पौल वेळोवेळी आपल्या अंर्तमनात डोकावून पाहायचा. त्यामुळे अंतर्धामी वसणाऱ्या ख्रिस्ताकडून त्याला सतत प्रेरणा व शक्ती मिळत गेली. तो सर्वांसाठी सर्व काही करण्यास तयार झाला. 
३) परमेश्वरासाठी इतरांपर्यंत पोहोचावेः सर्वकाही आपण परमेश्वरासाठीच करीत आहोत ही भावना का एकदा अंतःकरणात प्रज्वलित झाली की उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून केवळ परमेश्वरासाठी आपण इतरांपर्यंत पोहोचू लागतो. शुभवर्तमानामध्ये येशू केवळ पेत्राच्या सासूला बरे करून थांबला नाही. सूर्यास्ताच्या वेळी त्याच्याकडे आलेल्या सर्वांना त्याने रोगमुक्त केले. ४) परमेश्वराच्या सहवासात रमावेः संपूर्ण दिवसभर कामकाज करुनदेखील येशू रात्रीच्या वेळी प्रार्थनेत रमायचा. भल्या पहाटे तो लवकर उठून एकांतात जायचा. आपल्या सर्वकार्याचे प्रेरणास्थान आपला पिता आहे ही गोष्ट तो कधीच विसरला नाही.

आत्मपरीक्षणः संकटकाळी आपली ख्रिस्ती अस्मिता कशी जोपासायची ते वसईचा सुपुत्र संत गोन्सालो गार्सियाकडून शिकता येते. माझ्या अंतर्यामी वसत असलेल्या देवाचा विसर मला कधी पडतो? त्याची सतत जाणीव ठेवण्यासाठी मला काय करता येईल?

प्रार्थना : -: हे प्रभू येशू, आम्हाला तुझा गुणकारी स्पर्श कर, व आम्हाला सर्व बंधनातून मुक्त कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या