Marathi Bible Reading | 2nd week of Easter Tuesday 13th April 2021

पुनरुत्थान


दुसरा सप्ताह


मंगळवार 


१३ एप्रि २०२१

✝️






   संत मार्टिन पहिले 
(पोप  वर्तनसाक्षी) 


✝️
            

निकदेम हा येशूचा गुप्त शिष्य होता , येशूची शिकवण त्याला फार भावली होती . येशूकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो .  निकदेम त्याला म्हणाला, "ह्या गोष्टी कशा होऊ शकतील ?" येशूने त्याला उत्तर दिले, "तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय ? आम्हीसुद्धा निकदेम  प्रमाणे अज्ञानी वागत असतो . परंतु आध्यात्मिक नुतनीकरण करण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. 

आज प्रभू येशू म्हणत आहे, 'नव्याने जन्मल्यापासून  कोणालाहि देवराज्य पाहता येत नाही.' प्रभू येशूच्या सर्व प्रेषितांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला आणि त्यांचे संपूर्ण जीवन ख्रिस्तमय झाले. 
प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे आपले आध्यात्मिक नुतनीकरण करण्यासाठी व पवित्र आत्म्याच्या वरदानांचा स्वीकार करण्यास आपण पात्र बनावेत म्हणून  आपली श्रद्धा मजबूत करुन पवित्र आत्म्याला आपण शरण जाऊ या. कारण संत पौल म्हणतो, 'देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांति आहे. ' (रोम ८:६)

✝️

"जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ४:३२-३७

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन "एकदिलाचा व एकजिवाचा."

तेव्हा विश्वास धरणाच्यांचा समुदाय एकदिलाचा आणि एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ते विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत, मग ज्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.

कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता त्याला प्रेषित बर्णबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती, ती त्याने विकली आणि तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवले.

हा प्रभूचा शब्द आहे 


सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९३:१-२,५

प्रतिसाद : प्रभू राज्य करतो. तो ऐश्वर्याने मंडित आहे.

१)  प्रभू राज्य करतो. तो ऐश्वर्याने मंडित आहे. त्याने पराक्रमी वस्त्र धारण केले आहे. आपली कंबर कसली आहे.

२) पृथ्वी स्थिर आहे, ती ढळविता येत नाही. पुरातन काळापासून तुझे सिंहासन स्थिर आहे. तू अनादिसिद्ध आहेस.

३) तुझे निबंध शाश्वत टिकणारे आहेत. हे प्रभू, पावित्र्य हेच तुझ्या मंदिराचे चिरंतन सौंदर्य आहे.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.

 आलेलुया!


शुभवर्तमान योहान  ३:७-१५

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. "

येशू निकदेमला म्हणाला, "तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे." निकदेम त्याला म्हणाला, "ह्या गोष्टी कशा होऊ शकतील ?" येशूने त्याला उत्तर दिले, "तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय ? मी तुम्हांला खात्रीने सांगतो की, आम्हांस ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानीत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसा मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : प्रभू येशू ख्रिस्ताचे कार्य व शिकवण पाहून निकोदेमस प्रभावित झालेला होता परंतु सामाजिक व धार्मिक स्वरूपाच्या दडपणामुळे तो उघडपणे येशूचा शिष्य बनू शकत नव्हता. तितके आंतरिक सामर्थ्य त्याने कमावलेले नव्हते त्यामुळे तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे असे येशूने सांगताच तो गोंधळून गेला. येशू आध्यात्मिक नवजन्माविषयी बोलत होता तर निकोदेमस शारीरिकदृष्ट्या नवा जन्म कसा शक्य आहे? याविषयी प्रश्न उपस्थित करीत होता. त्यामुळे येशू आता त्याला पवित्र आत्म्याची ओळख करून देतो. त्यासाठी तो वारा हे चिन्ह वापरतो. शारीरिक डोळ्यांना न दिसणाऱ्या वाऱ्याचे परिणाम मात्र जाणवतात त्याप्रमाणे पवित्र आत्मा जरी दिसू शकला नाही तरी त्याची दाने व फळे सर्वांना दिसू शकतात. मी शारीरिक पातळीवर जीवन जगतो की आध्यात्मिक पातळीवर ? माझ्या जीवनात पवित्र आत्म्याद्वारे कोणकोणत्या बाबतीत मला नवा जन्म घेणे आवश्यक आहे ?

प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, ये आणि आम्हाला तुझ्या दानाने व फळाने भरून अध्यात्मिक जीवन जगण्यास मदत कर  आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या