Marathi Bible Reading | 2nd week of Easter Wednesday 14th April 2021

पुनरुत्थान

दुसरा सप्ताह

बुधवार 

१४ एप्रि २०२१

✝️



   संत टायबिर्शियस, मॅक्सिमस आणि व्हेलेरियन

- रक्तसाक्षी (...)



✝️
            
 प्रभू येशू म्हणतो, 'जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो.' विश्वासाने ज्या व्यक्तीने, 'प्रभू येशू देवाचा पुत्र आहे. ह्या सत्याचा स्वीकार केला आहे तो जगातील अंधारात चाचपडत चालणार नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. जे नीतिमत्तेने जीवन जगतात, प्रभूचे वचन ग्रहण करतात, श्रद्धेने ख्रिस्तानुकरण करतात, जे क्षमाशील, प्रेमळ  व परोपकारी आहेत ते खऱ्या अर्थाने सत्याच्या प्रकाशात वाटचाल करीत असतात.

प्रभूच्या वचनावर  चिंतन करीत असताना तपासून पाहू या की, सत्याला आपल्या जीवनात कुठे स्थान आहे. ईश्वर सत्य आहे, त्याचा पुत्र तारणारा प्रभू येशू सत्य आहे. आपण ह्या सत्याचा पुरस्कार करतो का?


✝️

"देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला,

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ५:१७-२६

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन 

प्रमुख याजक आणि त्याच्याबरोबर सर्व सदूकपंथी मत्सरग्रस्त होऊन उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले, परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यांना बाहेर आणून म्हटले, "जा आणि  मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा संदेश सर्व लोकांना सांगा." हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे, प्रमुख याजक आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा आणि इस्राएल लोकांचे सबंध वडीलमंडळ एकत्र बोलावले आणि त्यांना आणायला बंदिशाळेकडे पाठविले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत, म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, "बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हांला आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हांला आत कोणी सापडले नाही." हे वर्तमान ऐकून ह्याचा परिणाम काय होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार आणि मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.' तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांस जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३४:२-९

प्रतिसाद : मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.

१)  प्रभूचे धन्यवाद मी सदासर्वदा गाईन, त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल. प्रभूविषयीचाच अभिमान माझ्या मनी वसेल. हे ऐकून दीनांना आनंद होईल.

२) माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा. त्याच्या नामाचा महिमा आपण एकमुखाने गाऊया. मी प्रभूला शरण गेलो, त्याने माझे ऐकले. माझी सगळी भीती घालवली.

३) त्याच्याकडे पाहणार्यांची मुद्रा तेजस्वी होते. त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही. मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला आणि माझी संकटे हरण केली.

४)  प्रभूचे भय बाळगणाच्यांभोवती त्याचा दूत ठाण मांडून बसतो आणि त्यांचे संरक्षण करतो. प्रभू किती चांगला आहे हे अनुभव घेऊन पाहा. त्याच्यावर भाव ठेवणारा माणूस धन्य!


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.

 आलेलुया!


शुभवर्तमान योहान  ३:१६-२१

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून देवाने आपला पुत्र जगात पाठवला."

येशूने निकदेमला म्हटले, "देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रंसग येत नाही; जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो; ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे असे सांगितल्यानंतर आता येशू निकोदेमससमोर दोन पर्याय ठेवतो. उजेड आणि अंधार! श्रद्धेचे जीवन आणि पापी जीवन ! तात्पुरते नाशवंत जीवन आणि सार्वकालिक जीवन! अशा पार्श्वभूमीवर येशूच्या तोंडून संपूर्ण नव्या करारातील सर्वात महत्त्वाचे वाक्य बाहेर पडतेः 'देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.' प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला तो जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर त्याचे तारण करण्यासाठी आला. मात्र त्यासाठी तो मानवाकडून केवळ एकाच प्रतिसादाची अपेक्षा करतो : विश्वास! हा विश्वास उरात बाळगून माणसाने पापाच्या अंधारातून नीतिमत्तेच्या प्रकाशात यावे अशी देवाची योजना आहे. देवाने माझ्यापुढे जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद ठेवले आहेत. मी नेहमी कोणत्या गोष्टीची निवड करतो?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच सत्य मार्ग व जीवन आहेस, तुझ्या सत्याच्या प्रकाशात आमचे जीवन प्रज्वलित कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या