Marathi Bible Reading | 2nd week of Easter Firday 16th April 2021

पुनरुत्थान

दुसरा सप्ताह

शुक्रवार 

१६ एप्रि २०२१

✝️




संत मेरी बर्नाडे सौबेरियस
( लुर्डस )


   गुरुवार दि. ११ फेब्रु. १८५८ रोजी शेकोटीसाठी आणि सरपणासाठी लाकडाच्या सुक्या फांद्या गोळा करण्यासाठी ती गेली होती. सोबत तिची बहीण मरिया आणि जीन नावाची मैत्रिण होती. नदीकिनारी असलेल्या गुहेत मासाबेलाच्या ग्रोटोमध्ये तिला एक दृश्य दिसले. एक अतिसौंदर्यवान स्त्री तिच्या नजरेस पडली. आपल्याबरोबर असलेल्या मरिया व जीन ह्यांच्याकडे तिने ह्या स्त्रीचे वर्णन केले. शुभ्र वस्त्रे पांघरलेली स्वर्गीय तेजसंपन्न अशी सोळा सतरा वर्षांची ती स्त्री होती.तिच्या कमरेभोवती आकाशी रंगाचा निळा पट्टा होता. डोक्यावरून, पाठीवरून रुळणारी पांढरी ओढणी होती..... तिचे पाय अनवाणी होते आणि दोन्ही पायांवर प्रत्येकी एक गुलाब होते. तिच्या उजव्या हातावर सफेद मण्यांची रोझरी जपमाळ होती.... त्या रोझरीची साखळी सोनेरी रंगाची होती. ते मणी, ती साखळी आणि गुलाब एका आगळ्याच तेजाने झळकत होती.

बर्नाडेट हिने वर्णन केलेली ती स्त्री तिला एकूण सतरा वेळा दिसली. काही प्रसंगी तिने तिच्याशी संभाषणही केले. दि. १८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या दर्शनात तिने म्हटले, “मी तुला खूप आनंदी व सुखी करू इच्छिते. कदाचित या जगात तू आनंदी व सुखी होणार नाही. पुढील जीवनात तू नक्कीच सुखी समाधानी होशील.” त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी ती म्हणाली. पश्चात्ताप करा ! २७ फेब्रुवारी रोजी तिने त्या दर्शनाच्या ठिकाणी एक छोटेसे प्रार्थनामंदिर बांधले जावे अशी सूचना केली. तर २५ मार्च रोजी आपण निष्कलंक गर्भसंभव असलेली माता मरिया असल्याचे तिने बर्नाडेट हिला प्रगट केले.

३ जून रोजी बर्नाडेट हिने आपला प्रथम पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारला. तिला झालेल्या दृष्टांतावरून बराच वादंग माजला. तिची थट्टा मस्करी सुरू झाली. लुर्डस येथील ग्रोटोजवळ तिला सहज जाता येऊ नये म्हणून लुर्डसच्या  महापौरांनी त्या ग्रोटोभोवती तारेचे काटेरी कुंपण घातले. तरीही बर्नाडेटने त्याच अंतरावरून पवित्र मरियेचे दर्शन घेतले 

“आपण दु:खाचा स्वीकार प्रेमाने करायला शिकले पाहिजे. आपला प्रभू ज्यांच्यावर विशेष प्रेम करतो त्यांना काट्यांचा मुकूट प्रदान करतो. माझ्या क्रुसावरील बिछान्यात मी एखाद्या मखमली गादीवर बसलेल्या राणीपेक्षाही आनंदी आहे.” -  संत मेरी बर्नाडे सौबेरियस

✝️
             
"येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या."

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ५:३४-४२

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन

"येशूच्या नावासाठी आपण अपमानाला पात्र ठरवण्यात आलो, म्हणून ते आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले."

सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परुशी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून प्रेषितांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणी तरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानीत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलीकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला आणि त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावले. त्याचाही नाश झाला आणि जितके त्याला मानीत होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा आणि त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हांला ते नष्ट करता यायचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.” तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानाला पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले आणि दररोज मंदिरात आणि घरोघर शिकवण्याचे आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २७:१,४,१३-१४

प्रतिसाद : संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे.

१)  प्रभू माझा दीपक व उद्धारक आहे, मी कुणाला भिऊ ?
प्रभू माझ्या जिवाची संरक्षक तटबंदी आहे, मला कुणाची भिती ?

२)  मी प्रभूकडे एका गोष्टीची मागणी केली आणि तीच मिळवण्याची मी शिकस्त करीन ती म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मी प्रभू मंदिरात राहावे, प्रभूचे सुंदर ध्यान पहात राहावे आणि मंदिरात त्याचे मनन करावे.

३)  माझ्या जीवनात प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घडेल अशी मला खात्री आहे. प्रभूची प्रतीक्षा कर, हिंमत बाळग, धीर धर. प्रभूचीच प्रतीक्षा कर !


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान  ६:१-१५

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“त्याने बसलेल्यांना पाहिजे तितके वाटून दिले. "

येशू गालिलीच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलीपला म्हणाला, “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या ?" हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहो हे त्याला ठाऊक होते. फिलीपने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील प्रत्येकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांपैकी एकजण म्हणजे शिमोन पेत्रचा भाऊ आंद्रेया हा त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी आणि दोन मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?" येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. त्यावर सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतूनसुद्धा त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा." मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, "जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय!"
मग ते येऊन आपणांस राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन- मरण पुनरुत्थान रहस्याद्वारे यहुद्यांचा वल्हांडण सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. येशू स्वतः वल्हांडणाचे कोकरू बनला. तो बेखमीर (निष्कलंक) भाकर बनला. खरा द्राक्षवेल असलेल्या येशूने काना येथे पाण्याचा द्राक्षारस केलेला होता. आता खऱ्या द्राक्षवेलामधून उत्तम द्राक्षारस म्हणजे येशूचे अतिमौल्यवान रक्त कालवारीच्या क्रुसावरून घळघळा वाहिले. तोच येशू आता पुनरुत्थित होऊन प्रेषितांना प्रकट झाला. पुनरुत्थानाच्या पहिल्या आठवड्यात आपण येशूच्या विविध दर्शनांवर मननचिंतन केले. आता पुनरुत्थान काळातील उर्वरित आठवड्यांमध्ये ख्रिस्तसभा आपल्यासमोर ख्रिस्ताचे आत्मप्रकटीकरण सादर करते. त्याचाच भाग म्हणून आजच्या शुभवर्तमानात येशू पाच हजारांना भोजन देऊन त्यांना तृप्त करण्याचा चमत्कार करतो. वल्हांडण सणाला पुरुषांसह संपूर्ण कुटुंब येरुशलेम मंदिरात जायला हवे होते. मात्र सर्व जण येशूकडे आलेले आहेत. यावरून येशू हे नवीन मंदिर आहे. त्याचा सहवास हाच एक सोहळा आहे असे शुभवर्तमानकार सूचित करतो. येशू माझ्यासाठी नक्की कोण आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहभोजनात सहभागी होण्यास व तुझी सुवार्ता घोषविण्यास मला कृपा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या