Marathi Bible Reading | 2nd week of Easter Saturday 17th April 2021

पुनरुत्थान

दुसरा सप्ताह

शनिवार 

१७ एप्रि २०२१

✝️




संत अनेसिटस
- पोप, रक्तसाक्षी 


ख्रिस्त प्रभू आज आपल्या सर्वांना सांगत आहे, ‘भिऊ नका.' आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू  येशू आपले संरक्षण करावयास तयार आहे. मनातील सर्व भीती प्रभू येशूवर सोपवून त्याला सर्वस्वी शरण गेल्यास, प्रभू आपल्याला सर्व प्रकारच्या  संकटातून वाचविण्यास समर्थ आहे.
मन आणि शरीर या दोहोवर ज्या गोष्टीचा, घटनेचा किंवा विचारांचा  परिणाम होतो त्याला भय किंवा भीती म्हणतात. अनेक घटनांचा आपल्यावर  अनिष्ट परिणाम होत असतो. त्यामुळे काहीजण स्वतःवरचा, इतर माणसांवरचा आणि देवावरचा विश्वास गमावून बसतात. अशामुळे माणसांच्या ! मनात संशय आणि भीती घर करीत असते. आत्मविश्वास गमावलेल्या आणि देवापासून दूर गेलेल्या माणसांच्या जीवनात नकारात्मकता येते. अशा माणसांना अपघाताची, आजाराची, दहशतीची, चोरांची, नोकरी-व्यवसायाची, परीक्षेची तसेच मरणाची सुद्धा भीती वाटते. तर काही माणसे खायला व प्यायला सुद्धा भीतात. काही जणांना खरे बोलायला सुद्धा भीती वाटते.

आज आपण आपल्यातील सर्व प्रकारची. भीती बाजूला सारुन देवाला व प्रार्थनेला जीवनात प्रथम स्थान देऊ या. 

✝️
             
"त्यांनी येशूला समुद्रावरून चालताना पाहिले. "

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ६:१-७

वाचक :  प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन

शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, फिलीप, प्रखर, नीकानोर, तीमोन, पार्मिना आणि यहुदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. 

    मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. येरुशलेममध्ये शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :१-२,४-५,१८-१९

प्रतिसाद : प्रभो, तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे !

१ ) सात्त्विक जनहो, प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा. स्तवन करणे सरळ माणसांना शोभून दिसते. वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा, दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.

२)  प्रभूचा शब्द सत्य आहे. त्याचे सारे कार्य टिकाऊ असते. त्याला सात्त्विकता व न्याय प्रिय आहेत. प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.

३)  प्रभूचे भय बाळगणारे व त्याच्या प्रेमाचे भुकेले अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते, मृत्यूच्या दाढ़ेतून तो त्यांचे प्राण वाचवतो, दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान  ६:१६-२१

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"त्यांनी येशूला समुद्रावरून चालताना पाहिले. "

संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलिकडे कफर्णहूम येथे जाऊ लागले, एवढ्यात अंधार पडला. तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले, परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका." म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली, तेवढ्यात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्याला लागला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : येशूठायी परमेश्वराचे जे सामर्थ्य प्रकट झालेले होते त्याचे चिन्ह म्हणजे त्याने केलेले पाच प्रकारचे चमत्कार! त्यात निसर्गाशी संबंधित, दिव्यांगांशी संबंधित, आजारांशी संबंधित, अशुद्ध आत्म्याशी संबंधित आणि मरणाशी संबंधित अशा चमत्कारांचा समावेश होतो. शुभवर्तमानकार योहान त्यासाठी चिन्ह हा शब्द वापरतो. त्याने येशूची सात चिन्हे निवडून ही आपल्या शुभवर्तमानात समाविष्ट केलेली आहेत. काल आपण 'पाच हजारांना भोजन' ह्या चमत्कारावर चिंतन केले. आज आपण 'येशू पाण्यावरून चालतो' या चमत्कारावर चिंतन करू या. संध्याकाळ, काळोख, शिष्यांची धडपड, येशूची अनुपस्थिती समुद्र खवळणे, सुसाट्याचा वारा सुटणे अशा शब्दांत शुभवर्तमानकार अडचणीची परिस्थिती वर्णन करतो. अशा परिस्थितीत येशू तातडीने पाण्यावरून चालत येतो आणि आपल्या शिष्यांना धीर देतो. वादळवाऱ्यात सापडलेले त्यांचे तारू किनाऱ्याला लागते. यावरून येशूचा निसर्गावर पूर्ण ताबा असून तो देवपित्यासह सृष्टीचा निर्माता व मानवाचा तारणकर्ता आहे असे स्पष्ट होते. भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, पूर अशा निसर्गातील घडामोडींकडे मी कोणत्या दृष्टीने पाहतो ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्व प्रकारच्या भीतीपासून व अनिष्टापासून आमचे संरक्षण कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या