Marathi Bible Reading | 3rd Sunday of Easter 18th April 2021

पुनरुत्थान

तिसरा रविवार 


१८ एप्रि २०२१


✝️


संत पेत्र आणि त्याच्या सहकारी प्रेषितांनी ख्रिस्त येशूने जीवन जवळून अनुभवले होते. ख्रिस्ताची वचने, चमत्कार व त्याची स्वर्गराज्याची शिकवण ह्या सर्वांचा त्यांच्यावर खोल परिणाम झालेला होता, मात्र पवित्र आत्म्याची कृपा प्राप्त होताच त्यांनी मोठ्या धैर्याने पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देण्यास सुरुवात केली. ख्रिस्ताचे दुःखसहन व क्रुसावरील मरण पूर्वनियोजितअशी देवाची योजना होती.
लोकांनी त्यांची साक्ष व संदेश ऐकला आणि ख्रिस्ताच्या नावाने । स्नानसंस्कार स्वीकारला. आज ख्रिस्तसभा ख्रिस्ताचे व त्याचा सुवार्तेचे साक्षीदार बनण्यासाठी आपल्याला आवाहन करीत आहे. तारणाची सुवार्ता इतरांना कळवावी ही जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिवर सोपवलेली आहे. तारण प्राप्त झाल्याशिवाय या जीवनात आपल्याला खरा आनंद व शांती मिळणार नाही आणि सार्वकालिक जीवनाची आशाही नाही.
आपण ख्रिस्त येशूचे साक्षीदार बनावेत म्हणून आपणाला मिळालेले देवाचे वचन व त्याची आज्ञा पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करु या.


✝️
             
येशू स्वतः त्याच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, "तुम्हांला शांती असो." 

✝️


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ३:१३-१५.१७-१९

वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले, परंतु देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले. "

पेत्र लोकांना म्हणाला, आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचा गौरव केला आहे, त्याला तुम्ही धरले आणि पिलाने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले. पवित्र आणि नीतिमान अशा त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हांला द्या अशी मागणी केली. तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारले; पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले ह्यांचे आम्ही साक्षी आहोत.

बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही, जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. परंतु आपल्या ख्रिस्ताने, दुःखसहन करावे असे जे देवाने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चात्ताप करा आणि वळा. कारण विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ४:२,४,७, ९

प्रतिसाद : हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हांवर पाड.
१ ) हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक. मला तू पेचातून मोकळे केले आहेस. माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.

२ ) ज्यांच्यावर प्रभूची प्रीती आहे. त्यांच्यासाठी तो अद्भुत कृत्ये करतो, मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो ऐकेल.

३)  "आम्हाला चांगले दिवस कोण दाखवील" असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड.

४ ) शांतपणे अंग टाकताच मी झोपी जातो कारण हे प्रभू, केवळ तूच मला सुरक्षित ठेवतोस.


दुसरे वाचन १ योहान :२ : १-५अ

वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"येशू ख्रिस्त आपल्या पापांबद्दल आणि सर्व जगाच्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. "

अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.
आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांला कळून येते की, आपण त्याला ओळखतो. "मी त्याला ओळखतो," असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्हाला शास्त्रवचने शिकव. आम्हांशी बोलून आमच्या हृदयात चेतना निर्माण कर. 

आलेलुया!

शुभवर्तमान लूक  २४:३५-४८

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“येशूख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे."

प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले.
 ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्याच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, "तुम्हांला शांती असो." पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, "तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात आणि पाय पाहा. मीच तो आहे. मला चाचपून पाहा, जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते." असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, "येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय ?" मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्यादेखत खाल्ला.
मग तो त्यांना म्हणाला, "मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली वचने हीच आहेत." मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे," तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि येरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षी आहा."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : ख्रिस्ती व्यक्तीला पुनरुत्थित प्रभूचे प्रभावी साक्षीदार बनण्यासाठी पाचारण करण्यात आलेले असते. त्यासाठी बाप्तिस्म्याच्या प्रसंगी तिच्या अंगावर सफेद वस्त्र परिधान करण्यात येते आणि हातात श्रद्धेची ज्योत असलेली मेणबत्ती देण्यात येत असते. आजची तिन्ही वाचने त्याविषयी आपल्यासमोर तीन मार्ग सुचवितात : 
१) दुःखसहनाची तयारी : पुनरुत्थित प्रभूची प्रभावी साक्ष द्यायची म्हणजे दुःखसहन करण्याची तयारी ठेवायची. आजच्या पहिल्या वाचनात पेत्र दोन गोष्टींची साक्ष देतो. प्रभू येशूला दुःखसहनाद्वारे परमेश्वराने गौरविले. परंतु यहुद्यांनी त्याला नाकारले. पेत्राला या यहुद्यांच्या अज्ञानाची कीव कराविशी वाटते. तो त्यांना पश्चात्तापाचा मार्ग सुचवितो. 
२) पश्चात्ताप व पापक्षमेची घोषणा: प्रभू येशूचे दुःखसहन व मरण हा देवाच्या योजनेचा भाग होता. त्याचे अगत्य होते) प्रेषित त्याच्या सुवार्ताप्रसार कार्याचे आणि शोकांतिकेचे साक्षीदर होते. आता तो मरणातून जिवंत झालेला होता. त्यामुळे तो आपल्या प्रेषितांवर एक महत्वाची जबाबदारी सोपवितो. सर्व राष्ट्रांत पश्चात्ताप आणि पापक्षमा घोषित करण्यात यावी. 
३) परमेश्वराच्या आज्ञांचे पालन : दुसऱ्या वाचनात संत योहान पुनरुत्थित प्रभूचे प्रभावी साक्षीदार होण्यासाठी दोन गोष्टींची गरज असल्याचे सांगतो. परमेश्वराच्या आज्ञांचे पालन आणि देवशब्दावरील विश्वास. परमेश्वराने दिलेल्या आज्ञांचे पालन न करता कोणी पुनरुत्थित प्रभूची साक्ष प्रभावीपणे देऊ शकत नाही. कारण त्याने स्वतः आज्ञाधारकपणे क्रुसावरचे मरण पत्करले आणि पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला. प्रभुशब्दावर विश्वास ठेवण्यासाठी त्याचे नित्य नेमाने वाचन व्हायला हवे. तो प्रत्यक्ष कृतीत उतरविला गेला पाहिजे. हे सर्व करीत असतानाच मनुष्य त्याच्याही नकळत प्रभूच्या पुनरुत्थानाची साक्ष देत जातो.
आत्मपरीक्षण : माझे जीवन ही पुनरुत्थित प्रभूची प्रभावी साक्ष आहे का ? दुःखाला सामोरा जाताना माझ्या मनात पुनरुत्थानाचा आशादीप उजळतो का? कोणकोणत्या बाबतीत मी अजूनही आज्ञाधारक व्हायला हवे असे मला वाटते ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या तारणाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास  आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या