पुनरुत्थान
तिसरा सप्तह सोमवार
१९ एप्रिल २०२१
संत लिओ नववे
पोप, वर्तनसाक्षी (१००२-१०५४)
✝️
आजच्या पहिल्या वाचनात संत स्तेफनचे सुवार्ता प्रसाराचे कार्य, आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो करीत असलेल्या अद्भूत कृत्यांचा वृतांत दिला आहे. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची आणि सुवार्तेची साक्ष देता असताना धर्मपंडितांनी त्याला विरोध केला मात्र निर्भयतेचा आत्मा लाभलेल्या स्तेफनने आपले कार्य अधिक जोमाने चालू ठेवले.
प्रभू येशू जाणीव करून देत आहे की केवळ शरीराची भूक भागविण्यासाठी कष्ट उपसू नये. शरीर क्षणभंगूर आहे, मात्र आत्मा अविनाशी आहे. आत्म्याची भूक भागविण्यासाठी प्रभू येशू आपल्याला दोन प्रकारचे अन्न देत आहे. प्रभूची वचने म्हणजेच स्वर्गीय शब्द आणि त्याचे शरीर व रक्त म्हणजेच स्वतः प्रभू येशूची सहभागिता. देवशब्द आणि प्रभू येशूला आत्मसात करण्यासाठी आपण सतत श्रम करणे गरजेचे आहे.
आपण चिंतन करीत असताना स्वतःला प्रश्न विचारू या कि, खरोखरच आम्हाला प्रभू शब्दाची व स्वर्गीय भाकरीची तहान व भूक लागली आहे का ?
✝️
“ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, हेच देवाचे काम आहे.'
पहिले वाचन प्रे. कृ. ६:८-१५
वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन
"स्तेफान ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्याच्याने तोंड देववेना."
स्तेफान कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुतकृत्य व चिन्हे करीत असे. तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर आलेक्झांड्रेयकर आणि किलिकिया आणि आशिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफानबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने आणि ज्या आत्म्याने बोलत होता त्याला त्यांच्याने तोंड देववेना. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध आणि देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले" असे म्हणण्यास पढवले आणि लोकांना, वडिलांना आणि शास्त्रांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्र स्थानाच्या आणि नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडीत नाही.” आम्ही त्याला असे बोलताना ऐकले, "हा नाझरेथकर येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.” तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९:२३-२४,२६-२७,२९-३०
प्रतिसाद : ज्यांचे आचरण शुद्ध आहे ते धन्य होत.
१) सत्ताधीश जमून माझ्याविरुद्ध मसलत करतात, तरी हा तुझा दास तुझ्या नियमांचे चिंतन करतो. तुझी शिकवण मला प्रिय आहे. ती माझी मार्गदर्शिका आहे.
२) मी केलेले सर्व तुला सांगितले, तू माझे ऐकलेस; आता तुझे नियम मला शिकव. तुझ्या आदेशाप्रमाणे कसे वागावे ते समजावून सांग. मग तुझ्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करीन.
३) मला वाममार्गापासून आव आणि तुझे धर्मशास्त्र मला शिकव. मी निष्ठेचा मार्ग निवडला आहे. तुझ्या संकेताकडे माझे लक्ष आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे.
आलेलुया!
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, परंतु सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा."
जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही आणि त्यांचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफर्णहूमास आले.
येशू त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुजी, येथे कधी आला?" येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सत्य सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न देईल त्यासाठी श्रम करा." ह्यावर ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे ?” येशूने त्यांना उत्तर दिले, “ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा, हेच देवाचे काम आहे.'
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- भाकर खाऊन तृप्त झालेल्या लोकांना पटले होते की येशू हाच जगात येणारा देवाचा संदेष्टा होय. त्यामुळे ते त्याला आपला राजा करण्याच्या विचारात होते परंतु येशू गूपचूप त्यांच्यामधून निघून गेलेला होता. आता ते त्याचा शोध घेत पुन्हा एकदा त्याच्याजवळ येतात. तेव्हा येशू त्यांना एक महत्वाचा संदेश देतो : 'नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जे अन्न देतो त्या अविनाशी अन्नासाठी झटत राहा.' हे अविनाशी अन्न मिळविण्यासाठी माणसाने देवाची कर्मे करायला हवीत असे येशू म्हणतो. त्यासाठी देवाने पाठविलेल्या त्याच्या एकुलत्या पुत्रावर त्यांनी विश्वास ठेवावा असेही मार्गदर्शन येशू त्यांना करतो. पुष्कळ वेळा माणूस नाशवंत गोष्टींच्या मागे धावत सुटतो. त्या गोष्टी मिळूनही तो समाधानी होत नाही. कारण संत अगस्तीनने म्हटल्याप्रमाणे, 'आपली हृदये परमेश्ररासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत. ती त्याच्याठायी विसावा पावल्याशिवाय कधीही शांत होणार नाहीत.' माझ्या जीवनाचा प्रवास अपूर्णतेकडून अपूर्णतेकडे सुरू आहे की मी परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, पूर्ण विश्वासाने तुझी वचने स्वीकारावीत आणि तुझ्या स्वर्गीय अन्नाची आम्हाला ओढ लागावी म्हणून आम्हाला कृपादान दे, आमेन.
0 टिप्पण्या