Marathi Bible Reading | 3rd week of Easter Tuesday 20th April 2021

पुनरुत्थान

तिसरा सप्तह मंगळवार 


२० एप्रि २०२१





✝️


 'मीच जीवनाची भाकर आहे.  जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रभू येशू स्वतःच आध्यात्मिक अन्न बनून आपल्या शरीरात व जीवनात येत असतो. त्याची जीवनदायी अमृतवचने आणि त्याची प्रीतिची आज्ञा आपण आमलात आणली तर मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्या आपण सशक्त आणि सामर्थ्यवाद बनू शकतो. अतिपवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेतात प्रभू येशू स्वतः आपल्याशी एकरूप होत असतो. 

आत्मा म्हणजेच जिव आणि हा जिव देवापासून सर्वकाळासाठी जिवंत आहे. आपल्या ह्याच आत्म्याला आध्यात्मिक अन्नाची   गरज आहे. हे आध्यात्मिक अन्न प्रभू येशू आपल्याला पुरवित असतो.

प्रभू येशू आज आपल्या सर्वांना त्याच्या जीवनदायी भाकरीचे सहभागीदार| बनण्यास बोलवित आहे. केवळ शारीरिक भाकरीसाठी नव्हे तर आध्यात्मिक भाकरीची आपल्याला सर्वदा ओढ लागली म्हणून श्रद्धेने प्रभूजवळ जाऊ या.
 त्याच्या जीवनदायी भाकरीतून सेवन करू या आणि आपले जीवन फलदायी  बनवूया.

✝️
             
“मीच जीवनाची भाकर आहे


पहिले वाचन  प्रे.  कृ.  ७:५१-८:१

वाचक : प्रे. कृ. या पुस्तकातून घेतलेले वाचन

"हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर."

स्तेफन लोकांना, वडीलधाऱ्या माणसांना आणि शास्त्र्यांना म्हणाला, "अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची आणि कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता. जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरुषांच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले आणि आता त्याला धरून देणारे आणि जिवे मारणारे तुम्ही निघाला आहा. अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही."

त्याचे हे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंत:करणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज आणि देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसला आहे.” तेव्हा ते मोठ्याने ओरडून आणि कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले. तेव्हा साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायांजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर." मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको." असे बोलून तो कायमचा झोपी गेला. शौलला तर त्याचा वध मान्य होता.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३१:३-४, ६-८,१७.२१

प्रतिसाद : हे प्रभो, मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.

१ ) हे प्रभो, माझा आश्रयदाता पहाड हो, माझा बचाव करणारा दुर्ग हो, आणि माझे रक्षण कर, कारण तूच माझा आश्रयदाता, पहाड आणि दुर्ग आहेस. तुझ्या नावाच्या महिम्यासाठी मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो.  

२)  मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे प्रभू, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उद्धार केला आहेस. माझा तर प्रभूवर भाव आहे. तुझ्या वात्सल्यामुळे मला आनंदी आनंद होईल...

३) या तुझ्या दासाला तुझ्या तेजस्वी मुद्रेचे दर्शन घडव आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. मानवी कारस्थानांपासून तू त्यांना तुझ्या समक्षतेच्या आड लपवून सुरक्षित ठेवतोस.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात. 

आलेलुया!

शुभवर्तमान योहान ६:३०-३५

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
लोकसमुदाय येशूला म्हणाला, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणांवर विश्वास ठेवावा ? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्रा खाल्ला. असे लिहिले आहे की, “त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खावयाला दिली." ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचित सत्य सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय." म्हणून ते त्याला म्हणाले, "प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या."
येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत यहुदी लोकांव्यतिरिक्त हेल्लेणी किंवा ग्रीक भाषिक लोकांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा सहभोजनात अडथळे निर्माण होऊ लागले. प्रेषितांनी देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करणे हे योग्य न वाटल्यामुळे पेत्राच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सात नीतिमान पुरुष निवडण्यात आले. ते डीकन म्हणून ओळखले जातात. संत स्टीफन हा त्यांच्यापैकीच एक डीकन होता. तोही इतरांप्रमाणे पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने परिपूर्ण होता. त्याने केवळ पंक्तिसेवा करण्यात समाधान मानले नाही. 'मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर जगेल' ह्या शास्त्र वचनानुसार तोही धैर्याने प्रभूचे वचन सांगू लागला. त्याला प्रचंड विरोध झाला. शेवटी दगडमार करून यहुद्यांनी त्याला ठार केले. • मरतेसमयी त्याची नजर स्वर्गाकडे लागलेली होती आणि ओठांवर शब्द होते : 'बापा, क्षमा कर...' त्याच वेळी शौलाच्या अंतःकरणात परिवर्तनाची ठिणगी पडली. स्टीफनच्या रक्तामध्ये शौलाच्या श्रद्धेचे व परिवर्तनाचे बीज दडलेले होते. इतरांना अधिक समृद्ध आध्यात्मिक जीवन जगता यावे म्हणून मी कोणता त्याग करायला तयार आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, साक्रमेंतातील भाकरीतून तुला स्वीकारून तृप्त होण्यास व आध्यात्मिक जीवन बळकट करण्यास प्रेरणा दे, आमेन.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या