Marathi Bible Reading | 4th Sunday in Ordinary Time | 30th January 2022 |

सामान्यकाळातील चौथा  रविवार  

 दि. ३० जानेवारी  २०२२

✝️ 

“मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. 


✝️


कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.

यिर्मयाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे निर्भयपणे इस्त्राएली जनतेला पश्चात्तापाचा संदेश दिला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या  अभिषिक्त होण्याची व कार्याची जाणीव सभास्थानांतील लोकांना करुन दिली. निर्भयपणे प्रभू येशूने सांगितले की, 'दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे.अन्यायग्रस्तांची सुटका  करण्यासाठी तो आला आहे, मात्र नासरेथ ह्या त्याच्या स्वतःच्या गावी त्याचा अव्हेर करण्यात आला. त्यावेळी प्रभू येशूने एलीया व अलीशा संदेष्ट्यांविषयी घडलेल्या घटना लोकांना सांगितल्या मात्र सभास्थानांतील लोक जास्तच संतापले. प्रभू येशू देवपुत्र होता व त्याला घडणाऱ्या सर्व घटनांची जाणीव होती. म्हणूनच त्याने म्हटले आहे, 'कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.'प्रभू येशूने आपल्या सर्वांनासुद्धा पाचारणाची हाक दिलेली आहे.  निर्भयपणे देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी आपल्याला प्रभू येशू आवाहन  करीत आहे. प्रभू येशू आपल्याबरोबर आहे तर आपणाला कसली भिती ? संत  पौल सल्ला देऊन आज सांगत आहे की, विश्वासाने आणि प्रेमाने आपण प्रभू येशूची सुवार्ता लोकांना सांगावी. त्यासाठी संत पौल म्हणतो, 'उत्कृष्ठ  कृपादानांची उत्कंठा बाळगा.' 

✝️   

पहिले वाचन यिर्मया १:४-५,१७-१९
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

“मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे." 

परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असेः “मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू जन्मण्यापूर्वी मी तुला उदरातून पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. 
तू तर आपली कंबर कस. ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नको, घाबरलास तर मी तुला त्याच्यापुढे घाबरवीन. पाहा, आज या सगळ्या देशांविरुद्ध यहुदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक आणि देशातील लोक त्यांच्याविरूद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो. ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ७१:१-६,१५,१७
प्रतिसाद :  माझे ओठ तुझ्या सहाय्याचे वर्णन करतील.
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; 
तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; 
माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर.

२) मला नेहमी थारा मिळावा म्हणून 
माझ्यासाठी निवासाचा खडक हो; 
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस
 तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस. 
हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर.

३) हे प्रभो, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस, 
माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. 
जन्मापासून तूच माझा आधार आहेस,
मातेच्या उदरातून जन्मल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस. 

४) माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे 
आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.
हे देवा, माझ्या तरुणपणापासून 
तू मला शिकवत आला आहेस 
आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.


दुसरे वाचन  १करिंथकरास १२:३१-१३:१३
वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

“विश्वास, आशा आणि प्रीती ही अक्षय आहेत; परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.'

श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हांला दाखवतो. मी माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, परंतु माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी फक्त वाजणारी थाळी किंवा झणझणणारा झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे आणि सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी व्यर्थ आहे. मी आपले धन अन्नदानार्थ दिले आणि मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
संक्षप्ति रूपासाठी ( १३:४-१३) कंसातील पाठ वापरता येतील.

(प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, बढाई मारीत नाही. ती फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही. प्रीती स्वार्थ पाहत नाही. ती चिडत नाही. अपकार स्मरत नाही, ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबधी आनंद मानते. प्रीती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.प्रीती कधी अंतर देत नाही, संदेश असले तरी ते संपतील; भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशत: कळते आणि अंशतः संदेश देता येतो; पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण प्रत्यक्ष पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही अक्षय आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.)
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक ४:२१-३०

वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“एलिया आणि अलिशाप्रमाणे येशू फक्त यहुद्यांसाठी पाठवला नव्हता.'

येशू सभास्थानातील सर्व लोकांना सांगू लागला, "हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला." तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, “हा योसेफचा पुत्र ना?" त्याने त्यांस म्हटले, "खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल, हे वैद्या, तू स्वत:लाच बरे कर; कफर्णहूमला ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.” पुढे तो म्हणाला, “मी तुम्हांला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला ख़रे ते सांगतो की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात दुष्काळ पडला होता, त्या काळी इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या; तरी त्यातील एकीच्याहीकडे एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्यांच्या काळी इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही; तर सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला." हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले, त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: मनुष्य ज्या रंगाचा चष्मा घालत असतो त्याच रंगाची झाक सर्व वस्तूंवर व दृश्यांवर पडत असते. माणसाच्या मनात एकदा का एखाद्या गोष्टीविषयी वा व्यक्तीविषयी पूर्वग्रह उत्पन्न झाला की, त्याचा परिणाम त्याला जाणवायला लागतो. ती गोष्ट किंवा व्यक्ती जशी आहे तशी पाहणे कठीण जाऊ लागते. आजची वाचने आपल्याला पूर्वग्रहापलीकडे जाण्यास प्रेरीत करतात. 
१. पूर्वग्रहामुळे परमेश्वराचा संदेश घोषविण्यात अडथळे उत्पन्न होतातः आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया ह्याच्या पाचारणाची कथा सांगण्यात आलेली आहे. आपण केवळ बालक आहोत अशी सबब तो पुढे करतो. कारण बालकांकडे पाहण्याचा इस्राएली लोकांचा दृष्टीकोण पूर्वग्रहदूषित होता. शिवाय लोकांना आपली सगळी पार्श्वभूमी ठाऊक असल्यामुळे ते आपला संदेश स्वीकारतील की नाही, याविषयी त्याच्या मनात शंका निर्माण होत होती. अशावेळी त्याने आपली सारी भिस्त लोकांऐवजी परमेश्वरावर टाकावी असे खुद्द परमेश्वर त्याला सांगतो. 
२. पूर्वग्रहामुळे परमेश्वराचा संदेश स्वीकारण्यात अडथळे उत्पन्न होतात : येशू लहानाचा मोठा नाझरेथात झाला होता. नाझरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय ? असे सर्वसामान्य लोकांना वाटत होते. नाझरेथ गाव गालील प्रांतातील असल्यामुळे 'ख्रिस्त गालीलातून येतो का? असा सवाल शास्त्री-परूशी विचारत होते. शिवाय येशू सुताराचा पुत्र आहे हेही नाझरेथच्या लोकांना ठाऊक होते. त्यामुळे जरी त्याच्या मुखातून बाहेर पडणारी कृपावचने ऐकून लोकांना आश्चर्य वाटले तरी ते त्याचा संदेश स्वीकारू शकले नाहीत. अशावेळी परराष्ट्रीयांना येशूच्या सेवेचा लाभ कसा होणार आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी येशू त्यांना सारफथची विधवा व सूरियाचा सेनापती नामान ह्यांच्या श्रद्धेचे उदाहरण देतो. 
३. प्रेम हा पूर्वग्रहांवर मात करण्याचा सर्वात उत्तम मार्ग होय : आजच्या दुसऱ्या वाचनात आध्यात्मिक दानांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या प्रीती ह्या दानाचे एकूण १३ सद्गुण / वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. संत अगस्तीन म्हणतात, "प्रेम करा आणि मग तुम्हाला वाटेल ते करा”. म्हणजेच प्रेमाने केलेले कोणतेही कार्य ईश्वरप्रेरित असते. ते सर्व पूर्वग्रहांपलीकडे घेऊन जाणारे असते. 
आत्मपरीक्षण: माझ्या जीवनात कोणकोणत्या गोष्टींविषयी, ठिकाणांविषयी व व्यक्तीविषयी पूर्वग्रह आहेत ? त्यावर मला कशी मात करता येईल ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास आणि निर्भयपणे व विश्वासाने तुझी  सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या