Marathi Bible Reading | Monday 31stJanuary 2022 | 4th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील चौथा सप्ताह

सोमवार   

 दि. ३१ जानेवारी  २०२२

✝️ 
 “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग." 


संत जॉन बॉस्को
वर्तनसाक्षी (१८१५- १८८८)  

✝️

अगदी बालपणापासून आपल्या प्रभूने आणि पवित्र मरियेने जॉन ह्याला तरुण युवकांना वाईट मार्गापासून दूर ठेवण्यास आणि प्रामाणिक जीवन जगण्यास

प्रवृत्त करण्याची प्रेरणा दिली होती. उत्तर इटलीतील एका गरीब शेतमजूराच्या घरी जन्मलेला जॉन पिएडमोंट ह्या खेड्यात आणि आपल्या गुरूदीक्षेनंतर तुरीन शहरात वेगवेगळ्या मार्गाने परंतु अतिशय प्रेमाने व दयाळूपणे तरूण मुलांशी मैत्री करीत असे व त्यांचा विश्वास संपादन करीत असे. हात चलाखीपणा, जादूचे प्रयोग, दोरीवरून चालणे, व्हायोलिन वाजविणे, गाणी गाणे, गोष्टी सांगणे, छोटे छोटे नाट्यगृह उभारणे, नाटके बसविणे, विविध खेळ इ. द्वारे त्याने बऱ्याच युवकांचा विश्वास संपादन केला.मात्र हे सर्व करीत असताना आपली ख्रिस्ती शिकवणही तो त्या जमावाच्या गळी उतरवित असे. एखादया खेळाची सुरूवात प्रार्थनेने करणे, एखादा प्रयोग संपल्यावर रोझरीची प्रार्थना करणे, मध्येच सकाळी फादरांनी दिलेल्या प्रवचनाचा अर्थ सांगणे अशा रितीने तो युवकांमध्ये आध्यात्मिक गोष्टींची गोडी निर्माण करी.
अशा प्रकारे १८४५ सालापर्यंत त्याच्याभोवती जगणाऱ्या युवकांची संख्या ८०० च्याही पुढे गेली होती. अशा मुलांना हिवाळ्यात एकत्र करण्यासाठी त्याच्याकडे जागासुद्धा नव्हती. हातपाय गारठून टाकणाऱ्या त्या थंडीत फ्रा. जॉन ह्यांची काय गडबडघाई होत असे त्याची कल्पनाच न केलेली बरी. त्यावेळी त्याच्या आईने त्याला केलेली मदत खूप मोलाची होती. परंतु पुढे पुढे तीही अपूरी पडू लागली.
हळूहळू फा. जॉनच्या कार्याला प्रसिद्धी मिळत गेली. त्याला बरेच सहकारी
वा सहाय्यक येऊन मिळाले. त्यांच्या मदतीने त्याने नियमितपणे रात्र शाळेचे आयोजन केले आणि संत फ्रान्सिस डि सेल्स व पवित्र मरिया, ख्रिस्तीजनांची सहाय्या ह्या दोघांच्या आश्रयाखाली तुरीन येथे त्याने सलेशिअन (डॉन बॉस्को) संघाची स्थापना केली.

आपल्या संघामध्ये तांत्रिक कार्यशाळा, वसतिगृह इ. इमारती त्याने उभ्या केल्या. त्याचे युवक आता तिथेच राहून आपल्या धर्माविषयी वाचन करीत, लेखनही करीत. दररोजची मिस्सा आणि वारंवार कुमसार/ पापनिवेदन ह्यांची आध्यात्मिक बैठक त्यांच्या युवकांच्या जीवनाला लाभलेली होती. शारीरिक आत्मक्लेश आपल्या आध्यात्मिकतेतून त्याने पूर्णपणे वगळलेले होते. देवाने दिलेल्या शरीराचा व शक्तीचा पूर्ण वापर त्याचे राज्य या भूतलावर आणण्यासाठी करायचा एवढा एकच ध्यास फा. जॉन ह्यांना लागलेला होता.दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखण्याची एक देणगी फा. जॉन ह्यांना लाभलेली होती. तसेच फा. जॉन ह्यांच्या रुपाने आपल्यामध्ये एक संत राहात आहे ह्याची जाणीव त्याच्या युवकांना झालेली होती. लोकांचा त्याच्यावर एवढा जबरदस्त विश्वास होता की, एकदा त्याने त्यांना शहरातील तुरूंगामधून ३०० कैद्यांना एक दिवसाच्या सहलीसाठी नेले होते. एखादा कैदी पळून जाईल की काय अशी भीतीही अधिकाऱ्यांना वाटली नाही म्हणूनच त्यांना ह्या कैदयांबरोबर सुरक्षा पोलीस यंत्रणा दिलेली नव्हती. फा. जॉननी त्यांना सुरक्षितपणे परत आणले.आपल्या कार्याचा फायदा तरूणींना देखील व्हावा यासाठी त्यांनी “डॉटर्स ऑफ अवर लेडी हेल्पर्स ऑफ ख्रिश्चन्स” ही संस्था स्थापन केली. सलेशिअन संस्थेचा विस्तार होतच राहिला. संस्थापक फा. जॉन ह्यांच्या मृत्यूवेळी २००० संस्था आणि २,५०० धर्मगुरू सलेशियन संघामध्ये कार्यरत होते.
संत जॉन बॉस्को ३१ जानेवारी १८८८ साली मरण पावले आणि १९३४ साली संत पदाला पोहोचले.

चिंतन : तुमच्याने होईल तेवढे करा, उरलेले देवावर व पवित्र मरियेवर सोपवा. -संत जॉन बॉस्को  

आपले जीवन हे आपले असे नाहींच ते परमेश्वराने त्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दिलेले जणू उसने दान आहे. म्हणूनच दु:खी, कष्टी, असहाय्य व संकटग्रस्त अशा सर्वांच्या मदतीला धावून जाणे आपले परमकर्तव्य आहे. ख्रिस्तसभा आज संत जॉन बॉस्कोचा सन्मान करीत आहेत. आपल्या मधूर वाणीने आणि कर्तव्य बुध्दीने संत जॉन ह्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेची साक्ष जगाला दिली. त्याची आदर्शमय जीवन विशेषत: तरुणांना प्रेरणादायी आहे. 

✝️   

पहिले वाचन २ शमुवेलच्या  १५:१३-१४,३०:-१६:५-१३
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"चला, आपण पळून जाऊ, नाहीतर अवशालोमच्या हातातून आपली सुटका नाही."

एका निरोप्याने येऊन दावीदला सांगितले, "इस्राएल लोकांची मने अबशालोमकडे वळली आहेत." हे ऐकून दावीद येरुशलेममधल्या आपल्या सर्व सेवकांस म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमच्या हातातून कोणी सुटावयाचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपणांस पकडून आपल्यावर अरिष्ट आणील आणि शहरावर तरवार चालवील." दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला. तो रडतरडत वर चढून गेला. आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला. त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडतरडत वर चढून गेली.
दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पाहा, शौलच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला, त्याचे नाव शिमी असून त्याच्या वडिलांचे नाव गेरा असे होते. तो शिव्याशाप देत आला. तो दावीदवर आणि सर्व राजसेवकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्याडाव्या बाजूस होते. शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी मनुष्या, अधमा, नीघ चालता हो! ज्या शौलच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पाहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस, यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस.
सरूवेचा पुत्र अबिशय राजास म्हणाला, “ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजास शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्यास हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवतो.” राजा म्हणाला, “सरूवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करावयाचे आहे ? तो शिव्याशाप देत आहे. 'दावीदला शिव्याशाप दे' असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास 'तू हे का करतोस' असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे?" दावीदने अबिशय आणि आपले सर्व सेवक यांस सांगितले,
“पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यावयास पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करीत आहे यात काय नवल! त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या; कारण परमेश्वरानेच त्याला सागितले असेल. मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि या शिव्याशापांऐवजी मला चांगला मोबदला देईल." नंतर दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४:२-८
प्रतिसाद :   हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार.

१) हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत! 
माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत. 
“ह्याला देवाच्या ठायी तारण नाही.' 
असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत.

२)  तरी हे परमेश्वरा, 
तू माझ्याभोवती कवच आहेस,
 तू माझा गौरव आहेस, 
माझे डोके वर करणारा आहेस. 
तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो.
मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो,

३) मी अंग टाकले आणि झोपी गेलो. 
मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे. 
लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, 
मी त्यांस भिणार नाही.
हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ५ : १-२०

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  "हे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ."

येशू आणि त्याचे शिष्य समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरस्तानातून निघून त्याला भेटला. तो कबरस्तानात राहत असे आणि त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्याला पुष्कळवेळा बेड्यांनी आणि साखळदंडांनी बाधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी, रात्रंदिवस, कबरस्तानामध्ये आणि डोंगरांमध्ये राहून ओरडत असे आणि दगडांधोंड्यांनी आपले अंग ठेचून काढत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला, त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस." कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ." येशूने त्याला विचारले "तुझे नाव काय?" त्याने उत्तर दिले, "माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहो" आम्हांला ह्या देशातून घालवू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली, “आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला लावून दे." मग त्याने त्यांना परवानगी दिली, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले, तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तड़क धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि पाण्यात गुदमरून मेला.

डुकरे राखणारे पळाले आणि त्यांनी गावात आणि शेतांमळ्यात हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्याकरिता लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी, भूतग्रस्ताला काय झाले ते आणि डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, त्याला म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग." तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करु लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: शुभवर्तमानातील अशुद्ध आत्म्याने पछाडलेला माणूस नाना तऱ्हेच्या अनैतिक गोष्टींच्या भोवऱ्यात सापडलेल्या अनेक प्रकारच्या दुर्गुणांच्या घाणीत सापडलेल्या माणसांचे प्रतीक आहे. धनदौलतीची हाव, ती हाव भागविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये अभाव, कामगारांच्या हक्काचे न्याय्यबुद्धीने कामगारांना देण्याऐवजी ते स्वतःसाठी ठेवून लग्न सोहळे, मित्रांसोबतच्या मैफिली, उठल्या सुटल्या दुरवरचे खर्चिक दौरे ह्यात पैशांची उधळपट्टी करणे, खोटे कागदपत्र तयार करून बेसावध गरिबांच्या जमिनी हडपणे, लग्नाच्या जीवनात अनैतिक मार्गाचा अवलंब करणे, एकमेकांचा विश्वासघात करणे. हे सर्व मानवजातीच्या मानगुटीवर बसलेले किंवा बसू इच्छिणारे अशुद्ध आत्मे आहेत. ह्या |आत्म्यांना येशूची शिकवण अडचणीची वाटते, प्रसंगी त्यांना त्या शिकवणीची चीड येते आणि त्या शिकवणीच्या घंटेचा आवाज आपल्या कानावर पडू नये म्हणून चर्चला जाण्याचे टाळणे, कौटुंबिक प्रार्थनेत सहभागी व्हायला लागू नये म्हणून प्रार्थनेच्या वेळी गैरहजर राहाण्यासाठी खोटी कारणे शोधणे, अशा वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर अशी माणसे करतात. परंतु त्यांची ही प्रवृत्ती नेहमीच आत्मघातकी ठरते. आत्मतारणाचा एकच मार्ग माणसापुढे असतो तो म्हणजे सर्व तऱ्हेच्या अशुद्ध आत्म्यांना वश करण्याचे सामर्थ्य ज्या येशूमध्ये आहे त्या येशूच्या शिकवणीशी एकनिष्ठ राहाणे होय.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या जीवनाचा ताबा घे, आमच्यामध्ये जे अशुद्ध आहे ते घालवून टाक व आम्हाला तुझे विश्वासु अनुयायी बनव, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या