Marathi Bible Reading | Tuesday 1st February 2022 | 4th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील चौथा सप्ताह

मंगळवार  

 दि. १फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो."


संत हेन्री मोर्स 
रक्तसाक्षी (... १६४५) 

✝️


.  देवाच्या सर्व योजना पूर्वनियोजित असतात, कारण तो त्याद्वारे आपले  प्रकटीकरण करीत असतो. 
आजच्या शुभवर्तमानातीलपहिली घटना बारा वर्षापासून रक्तस्त्रावाने पीडलेल्या स्त्रीची आहे. बऱ्याच वैद्याकडून उपचार घेऊन, पैसा संपवून आणि  आजार सहन करून जीवन जगणाऱ्या ह्या महिलेचा आजार बळवत चालला  होता. देवाच्या योजनेनुसार प्रभू येशू रस्त्यावरून चालला असताना तिच्या मनातीलविश्वास जागृत झाला ' प्रभू येशू जो सर्व काही जाणतो त्याने  तिच्यातीलप्रचंड विश्वास पाहिला आणि केवळ स्पर्श करून म्हटले, 'शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.' 
दुसरी घटना सभा स्थानातील अधिकारी याईराच्या मुलीची आहे. याईराचा विश्वास आणि त्याची नम्रता ह्यामुळे प्रभू येशू त्यांच्या घरी गेला आणि मृत्युशयेवर असलेल्या त्यांच्या मुलीला येशूने जिवंत ! केले. आपण ह्या दोन्ही चमत्कारांवर चिंतन करीत असताना विचार करुया की, आपण देवासमोर नतमस्तक होऊन शरण जातो का? आपला विश्वास मजबूत आहे का? आपण कळकळीने प्रार्थना करतो का ?
जीवनातीलकोणत्याही आजारात, कठीण परिस्थितीत आणि निराशजनक स्थितीत आपण खचून न जाता प्रभू येशूवर विसंबून राहू या. प्रभू येशू आज आपल्याला सांगत आहे, 'भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.
✝️   

पहिले वाचन २शमुवेलच्या१८:९-१०,१४,२४-४५,३०, १९:३
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझ्या पुत्रा अबशालोम! तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. "

अबशालोमची दावीदच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता. खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असता अबशालोमचे डोके त्या वृक्षास अडकून तो अधांतरी लटकत राहिला आणि ते खेचर त्याच्याखालून निघून गेले. हे पाहून एका मनुष्याने यवाबला सांगितले, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला." यवाबाने हाती तीन तीर घेऊन एका वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमच्या वक्षस्थळी ते भोसकले.
दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजाच्या दरम्यान बसला होता आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता; त्याने दूर नजर करून पाहिले तो एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. पहारेकऱ्याने पुकारून राजास ते सांगितले तेव्हा राजा म्हणाला, “बाजूला सरून येथे उभा राहा." तेव्हा तो बाजूला होऊन तेथे उभा राहिला.
इतक्यात कुशीही येऊन म्हणाला, "स्वामीराजाला मी खबर आणली आहे. परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे.” राजाने कुशीला विचारले, "तो तरूण अबशालोम सुखरूप आहे ना ?" कुशी म्हणाला, "माझ्या स्वामीराजांचे शत्रू आणि जे कोणी आपली हानी करावयास उठतील त्यांचे त्या तरुणासारखे होवो.” तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्गार काढले: “माझ्या पुत्रा अबशालोम! हाय रे हाय ! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोम! तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे ! अबशालोम! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”
अबशालोमसाठी राजा रडत आणि शोक करीत आहे असे यवाबच्या कानी आले. राजा आपल्या पुत्रासाठी दुःख करीत आहे, असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवसाचा तो विजय सर्व लोकांना शोकरूप झाला. युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८६:१-६
प्रतिसाद : माझ्याकडे लक्ष दे, प्रभो, मला उत्तर दे.

१) माझ्याकडे लक्ष दे, प्रभो, मला उत्तर दे, 
कारण मी दीन आणि दरिद्री आहे. 
माझ्या जिवाचे रक्षण कर. 
कारण मी तुझा भक्त आहे; 
तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या आपल्या सेवकाचे तारण कर.

२ ) प्रभो, माझ्यावर कृपा कर, 
कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. 
हे प्रभो, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर,
 कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो.

३) प्रभो, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस 
आणि तुझा धावा करणाऱ्या 
सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.
 हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, 
माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ५ : २१-४३

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    “मुली, मी तुला सांगतो ऊठ."

येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली, “माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” मग तो त्याच्याबरोबर गेला. 

तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करीत होते तेथे रक्तस्त्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून व पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते; तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. "केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” असे ती म्हणत होती, तेव्हा लागलीच तिचा रक्तस्त्राव बंद झाला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहो, असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, "माझ्या कपड्यांना कोण शिवले ?" त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, 'मला कोण शिवले?' " मग जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री, आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो." तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?" परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, मात्र विश्वास धर," त्याने पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्सी रडणारे आणि आकांत करणारे ह्यांचा गोधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मुलगी मेली नाही, झोपेत आहे." तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलीथा कुम्;” ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ” आणि लागलीच ती मुलगी ऊठून चालू लागली; कारण ती बारा वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच आश्वर्यचकीत झाले. हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खावयाला देण्यास सांगितले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशू आज आपल्याला वैयक्तिक श्रद्धेविषयी सांगत आहे. माणसाच्या जीवनांत श्रद्धेला किती महत्व आहे? आज आपण कुठल्या न कुठल्या आजाराने पीडलेले आहोत. येशू जाणीव करून देत आहे की, आपण पण जर येशूवर श्रद्धा ठेवली तर आपण सुद्धा जीवनात अलौकिक कृत्य पाहू शकतो. आपले जीवन व मरण हे सुद्धा येशूच्या हातात आहे. तो जीवनाचा दाता आहे. मरण आणि जीवन तो सांभाळून आहे. ह्या दोन चमत्काराद्वारे येशू आपल्या शिष्यांचा आपल्या मरणाअगोदर विश्वास वाढण्याचा प्रयत्न करतो. तेथे करूण कालवारीवर दुःखदायक मरण स्वीकारणार आहे. तेव्हा त्यांचा विश्वास डळमळू नये म्हणून तो आपल्या जवळच्या शिष्यांना घेऊन याईर नावाच्या अधिकाऱ्याच्या घरी जातो. तो येशू जवळ येऊन त्याच्या पाया पडला म्हणजे नतमस्तक झाला. आपण जेव्हा येशूकडे येतो तेव्हा नम्र होतो का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या जीवनात अत्यंत कठीण परिस्थितीतसुद्धा तुझ्यावरीलश्रद्धेत टिकून राहण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या