मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे यहुदी कुटुंबात जन्मलेल्या प्रथम बाळाचे समर्पण देवालयात करायचे असते. त्याच बरोबर परतफेड म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे पशु किंवा पक्षाचे समर्पण घ्यायचे असते. ख्रिस्तसभा प्रभूयेशूच्या देवालयात समर्पण केल्याचा सण साजरा करीत आहे.
इस्त्राएलच्या सांत्वनाची वाट पाहणारा संदेष्टा शिमोन हा येशू बाळाच्या समर्पणाच्या वेळी हजर होता. येशूबाळाला पाहताच, तो धन्य झाला आणि देवाची स्तुति करू लागला. परराष्ट्रीयांसाठी प्रकाश आणि इस्त्राएलसाठी वैभव असे तारणाऱ्या विषयीचे प्रकटीकरण शिमोनाने केले. येशू बाळाला आशीर्वाद देऊन शिमोनाने पवित्र मरियेला तारणाची योजना प्रकट केली. हन्ना संदेष्ट्रीने येशूबाळाला पाहून देवाची स्तुति करून आभार मानले. खरे पाहता प्रभू येशू स्वतः तारणारा होता,
प्रभू येशूच्या समर्पणावर चिंतन करीत असताना आपले समर्पित जीवन कसे आहे ह्यावर विचार करू या. आपले काम, व्यवसाय, व्यवहार, पति, पत्नी, मुले, आई-वडिल अशा सर्वांना आपण देव चरणी समर्पित करूया.
✝️
पहिले वाचन मलाखी ३:१-४
वाचक :मलाखीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल."
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पाहा, करार घेऊन येणाऱ्या संदेष्ट्याची तुम्ही अपेक्षा करत आहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल ?
“कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. रुपे गाळून शुध्द करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजांस शुध्द करील. त्यांस सोन्यारुप्याप्रमाणे शुध्द करील, मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे, यहूदा आणि येरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल."
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान लूक २ : २२-४०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २:२२-४०
"माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे."
(पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे बाळ येशू व मरिया ह्यांचे शुध्दीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुशलेमला घेऊन आले. ते अशासाठी की, येशूबाळाचे प्रभूला समर्पण करावे) (म्हणजे "प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा" असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे") आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले यांचा यज्ञ करावा. तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य येरुशलेममध्ये होता, तो नीतिमान आणि भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या तारणाची वाट पाहत होता. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :
"हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे.
कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.
ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिध्द केले आहे.
ते परराष्टीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड आणि तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप आणि त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, "पाहा, पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी इस्राएलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुध्द लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे. (आणि पाहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल)"हन्ना नावाची एक प्रवक्ती होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती. ती फार वयोवृध्द झाली होती आणि कौमार्यकाल संपल्यापासून ती पतीजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौऱ्याऐशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास आणि प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे येरुशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.
नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नाझरेथ येथे परत गेले. ते बाळ वाढत वाढत बलवान होत गेले व ज्ञानाने पूर्ण होत गेले आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आज ख्रिस्तसभा येशूचे देवालयात समर्पण हा सण साजरा करीत आहे. चाळीसाव्या दिवशी न येशूला यहुदी परंपरेनुसार देवालयात समर्पण केले. आजच्या दिवशी सर्व व्रतस्थ धर्मगुरू आणि धर्मभगिनी आपल्या नुतनीकरणाचा दिवस साजरा करतात. व्रतस्थ जीवन म्हणजे समर्पित जीवन, पवित्र आणि शुद्धतेचे जीवन. देवाचे कार्य करत असताना शुद्धता फार महत्वाची आहे. देव पवित्र व शुद्ध अंतःकरण स्वीकारत असतो. जुन्या करारात आपण पाहतो, आबेलाचे अर्पण परमेश्वर स्वीकारतो कारण तो शुद्ध आणि पवित्र होता. काईनसारखा त्याच्याठायी अहंकार व कपट नव्हते. आपण सर्वजण येशूचे कार्य करीत असताना आपल्याठायी शुद्ध व पवित्र अंतःकरण हवे. नीतिमत्ता आणि भक्ती ही शिमोनामध्ये होती. म्हणून तो येशूमध्ये इस्राएलचे तारण पाहू शकला. हन्ना उपवास व प्रार्थना करत समर्पित जीवन जगत होती. देवाची, येशूची खरी सेवा करायची असेल तर नीतिमानाचे, प्रार्थनेचे जीवन जगायला हवे. तेव्हाच आपण येशूचा अनुभव आपल्या वैयक्तिक जीवनात घेऊ शकतो. येशूचा अनुभव घेण्यासाठी मी तयार आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, समर्पित जीवन जगण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपासामर्थ्य दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या