ब्लेस ह्या संताचे जीवन जुन्या दंतकथांवर आधारित आहे. धर्मयुद्धाच्या काळात पाश्चात्य ख्रिस्तसभेत ह्या संताविषयीच्या दंतकथा प्रसिद्ध झाल्या होत्या.
व्यवसायाने तो वैद्य असावा. एक उमदे सद्गुणी व्यक्तिमत्त्व त्याला लाभलेले असल्यामुळे तुर्कस्थानातील आर्मेनियाच्या सेवास्ते शहराचे बिशप म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती. ह्याच शहरात तो जन्मला होता.. कॉन्स्टन्टाईन राजाच्या जाहिरनाम्यानंतर देखील लिसिनियस ह्या राजाच्या सहकाऱ्याने मात्र ख्रिस्ती लोकांचा छळ चालूच ठेवला. त्यातच ब्लेस ह्यांना अटक करण्यात आली. कातडे कमावण्याच्या व्यवसाय करणाऱ्या माणसाच्या सूरीने त्याची चामडी सोलून काढण्यात आली आणि तो ख्रिस्ताला नाकारीतच नाही हे पाहून त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
• एकदा एका मुलाच्या घशात मासळीचा काटा अडकला होता. त्यामुळे तो मुलगा तडफडून मरण्याची शक्यता होती. त्या मुलाला बिशप ब्लेस ह्यांनी वाचवले. त्यावेळेपासून घशाच्या विकारांपासून मुक्ती मिळावी म्हणून संत ब्लेस ह्यांचा धावा केला जातो. दोन मेणबत्त्यांचा क्रूस करून तो भाविकांच्या गळ्यावर ठेवत धर्मगुरू त्यांना संत ब्लेसचा आशीर्वाद देतात.
मध्ययुगीन काळात तो इतका प्रसिद्धीस आलेला होता की एकट्या रोम शहरात ३० ख्रिस्तमंदिरांना संत ब्लेसचे नाव देण्यात आलेले आहे. लोकर कमावणारे,मेण गोळा करणारे, बांधकाम करणारे आणि वैद्य इत्यादींच्या १४ पवित्र सहाय्यक व आश्रयदात्या संतांपैकी तो एक मानला जातो.
‘प्रेषित’ म्हणजे निवड करुन देवराज्य घोषविण्यास पाठविलेला निरोप्या किंवा दूत. प्रभू येशू ख्रिस्ताने देव राज्याचा विस्तार करण्यासाठी व सुवार्ता घोषविण्यासाठी प्रेषितांची निवड केली व त्यांना जोडीजोडीने पाठविले. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना देवराज्याविषयी वेळोवेळी प्रशिक्षण दिले.
प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेल्या आपल्या प्रेषितांना विशेषरितीने अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला. सुवार्ता घोषविण्याच्या सेवा कार्याबरोबरच आजारी, व्यंग आणि भूतग्रस्तांस आरोग्यदान व मुक्ती मिळवून देण्याची कृपादाने दिली. . सेवाकार्य करणाऱ्याने फक्त काठी आणि पायात वाहण घालणे गरजेचे आहे. ह्याचाच अर्थ स्वार्थ त्याग करून सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून राहणे गरजेचे आहे. प्रेषितांनी स्वार्थत्याग करुन प्रभू येशूच्या आज्ञेप्रमाणे कार्य करायला सुरुवात केली. त्यांच्याजवळ अन्न, वस्त्र, निवारा व पैसा असे काहीच नव्हते. श्रद्धेने आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलेल्या प्रेषित कार्यावर प्रभूचा भरपूर आशिर्वाद त्यांना मिळाला. प्रेषितांद्वारे परमेश्वराने अनेक अद्भूत कृत्ये घडवून आणली.
प्रभू येशूने त्याचे देवराज्य घोषविण्यासाठी आपल्या प्रत्येकाला आज बोलवित आहे. आपल्या सर्वांनी प्रभूच्या प्रेमाची दयेची व कृपेची साक्ष इतरांना द्यावी म्हणून आपल्या प्रत्येकाला प्रभू आज बोलावित आहे. आपण तयार आहात का?
✝️
पहिले वाचन १ राजे २:१-४, १०-१२
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी जगाच्या रहाटीप्रमाणे ह्या जगातून जाणार. तर
शलमोन, हिंमत धर, मर्दुमकी दाखव."
दावीदचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन यास ताकीद देऊन म्हटले, “मी जगाच्या रहाटीप्रमाणे ह्या जगातून जाणार. तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव. तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय, आणि निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात आणि जिकडे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती होईल आणि जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील आणि माझ्यासमोर सत्याने आणि जिवेभावे चालेल तर इस्राएलच्या गादीवरील तुझ्या राजघराण्याचा कधीही अंत होणार नाही. हे माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील."
नंतर दावीद मरण पावला आणि त्यां दावीदपुरात मूठमाती दिली. दावीदने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात आणि तेहतीस वर्षे येरुशलेमात राज्य केले. मग शलमोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला; त्याने आपल्या राज्यास चांगली बळकटी आणली.
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान मार्क ६ : ७-१३
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू बारा जणांस बाहेर पाठवू लागला.'
येशूने बारा जणांस आपल्या जवळ बोलावले व तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की, “वाटेसाठी काठीवाचून दुसरे काही घेऊ नका, भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका, वहाणा घालून चाला, दोन अंगरखे घालू नका. तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत, तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका." ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्यांनी घोषणा केली, पुष्कळ भुते काढली आणि अनेक रोग्यांना तेल लावून बरे केले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशूला ठाऊक होते की, तो आपले पुढील मिशनकार्य आपल्या शिष्यांमार्फत करणार होता. तो हयात असताना शिष्यांची तयारी म्हणूनतो दोघे-दोघे म्हणून पाठवितो. तो पाठवत असताना आपल्या शिष्यांना जणू सांगत आहे. मिशन कार्यासाठी चिंता करू नका. संबंधित असंख्य पक्षी आणि प्राणी आहेत. परमेश्वर त्या सर्वांची काळजी घेतो. तुम्ही त्यापेक्षा मौल्यवान आहात. तो तुमची नक्कीच काळजी घेईल. जर कोणी येशूचा शिष्य होऊ पाहतो तर त्याने देवाच्या कार्यासाठी त्याग करणे गरजेचे आहे. त्यामध्येच समर्पित जीवन जगू शकतो. त्यामध्येच प्रभू येशू आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून देतो. येशूच्या शिष्यांनी ऐहिक जीवनाचा त्याग केला आणि त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले. आपल्याला कौटुंबिक, धार्मिक जीवनात येशूच्या कार्यासाठी सामर्थ्य हवे असेल तर त्याग करायला आपण शिकले पाहिजे. आज आपण येशूचे कार्य करण्यासाठी त्याग करायला तयार आहोत का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमची श्रद्धा बळकर कर व तुझी सुवार्ता पसरविण्यास व सेवाकार्य करण्यास आम्हाला प्रेरणा, सामर्थ्य व बळ दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या