भारतात आल्यावर लवकरच फा. जॉन दिब्रिटो मदुरा मिशनचे सुपिरिअर झाले आणि तो सगळा विशाल प्रांत त्यांनी पायाखाली घातला. पायी-पायी चालत त्यांनी तिथे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. ज्यांनी त्यांच्याबरोबर कार्य केले ते त्यांचे सहकारी आपल्या पत्रात त्यांच्या धैर्याविषयी आणि भक्तीभावनेविषयी भरभरून स्तुती करताना आढळतात. त्याच्या विरक्तवृत्तीने आणि वैराग्यामुळेच त्याच्या श्रमाला पुढे परिवर्तनाचे अमाप पीक आले.
चौदा वर्षे त्यांनी प्रवचने करण्यात लोकांचे परिवर्तन करण्यात, त्यांना स्नामसंस्कार देण्यात घालविली. हे सर्व करीत असताना त्याला अनंत यातना सहन कराव्या लागल्या. असंख्य वेळा मानहानी व अपयश ह्यांना तोंड द्यावे लागले. त्यात त्याचा छळही खूप होत असे. सरतेशेवटी त्याला पकडण्यात आले आणि भारताबाहेर हाकलून देण्यात आले.
परंतु पोर्तुगालमध्ये तो जबरदस्तीने वा सक्तीने आलेला असल्यामुळे त्याला भारतीय लोकांची आठवण होई. भारतीय भूमीवर त्याचे विलक्षण प्रेम होते. सर्व प्रकारच्या अडचणींवर व अडथळ्यांवर मात करून फा. जॉन पुन्हा एकदा भारतात परतले. परंतु आता त्याच्या नशिंबी प्रेषितकार्य नव्हते तर त्याच्या ताटात वाढलेला होता छळ, हाल, अपमान...
जॉन दिब्रिटो ह्यांना संत योहान बाप्तिस्तसारखेच मरण आले. एका राजाने आपल्या राजदरबारात एक रखेली ठेवली होती. जॉनने त्या स्त्रीला तिच्या पापी जीवनाची जाणीव करून दिली आणि नवजीवनाची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले. ह्या सल्ल्यामुळे ती स्त्री भयंकर संतापली. तिने राजाचे कान फुंकले. तात्काळ जॉनला गजाआड करण्यात आले. तिथे त्याचा अमानुष छळ करण्यात आला आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
तुरुंगातील छळ सोसत असताना त्याने आपल्या धर्माधिकाऱ्यांना लिहिले होते, "मी मृत्यूची वाट पाहात आहे. अगदी सहनशीलतेने मरणाची वाट पाहात आहे. सध्या मृत्यू हाच माझ्या प्रार्थनेचा विषय आहे. माझ्या सर्व श्रमांचा आणि दुःखसहनाचा कळस ज्या मृत्यूने गाठला जाणार आहे त्याला वेंग मारण्यास मी आसुसलेलो आहे.”
४ फेब्रुवारी १६९३ रोजी जेव्हा त्याच्या शिरच्छेदाची बातमी लिस्बन येथे पोहोचली तेव्हा राजा पेद्रो ह्याने आभारस्तवनाचा प्रार्थनाविधी आयोजित केला. त्या प्रार्थनाविधीमध्ये रक्तसाक्षी संत जॉन दिब्रिटो ह्याची आई देखील उपस्थित होती. तिने शोक व्यक्त करणारी नव्हे तर उत्सव व सोहळ्याची वस्त्रे धारण केली होती. जॉन दिब्रिटो ह्याला १९४७ साली संतांच्या मालिकेत सन्मानीत करण्यात आले.
चिंतन : देवाने दिलेल्या पाचारणाला होकार न दिल्याने आपण स्वत:हून देवाच्या क्रोधाला वाट मोकळी करून देतो. संत जॉन दिब्रिटो
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू गव्हाच्या दाण्याची उपमा देऊन समर्पित जीवन जगणाऱ्यांसाठी मोलाचा संदेश देत आहे. आत्मत्याग आणि समर्पणाशिवाय ख्रिस्ती जीवन पूर्णत्वास जाऊ शकत नाही. वदस्तंभाशिवाय तर ते फलदायी बनत नाही. ख्रिस्तसभा आज संत जॉन दिब्रिटो ह्या मिशनरी संताचा| स्मृतिदिन साजरा करीत आहे. प्रभू येशू म्हणतो, 'गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तरच पुष्कळ पीक देतो' त्याप्रमाणे संत जॉन दिब्रिटो ह्यांना सुर्वाता प्रसार करताना अनेक प्रकारचा विरोध सहन करावा लागला. अनेक संकटांना व छळाला सामोरे जात असताना निधर्मी लोकांकडून त्यांना ठार मारण्यात आले. प्रभू येशूचे शिष्यत्व आत्मत्याग व सेवा ह्यामध्ये पूर्णत्वास येते. गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेल्यावर त्याला नवीन अंकुर फुटतो, त्याप्रमाणे संत जॉनने सुरु केलेले सुवार्ता प्रसाराचे कार्य नव्या जोमाने अंखडितपणे चालू राहिले.
आपल्या प्रत्येकाला त्याग आणि सेवा ह्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी ख्रिस्तसभा आवाहन करीत आहे. संत जॉन दिब्रिटो ह्यांच्या जीवनाद्वारे प्रेरणा घेऊन आणि संत पौलाचा आदर्श समोर ठेवून आपण ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यास वचनबद्ध होऊ या.
✝️
पहिले वाचन १ कोरिंथ ९:१९-२३
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"मी सर्वांना सर्व काही झालो आहे."
मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहूदी लोक मिळवण्यासाठी मी यहूदी लोकांना यहुद्यांसारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता, त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो.दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान योहान १२ :२०-३२
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर पुष्कळ पीक देतो."
सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते, त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.
आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू ? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मीह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली, दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जीवनात सत्याची साथ द्यायची असेल तर किंमत मोजावी लागत असते. आपल्या ख्रिस्ती जीवनात अनेक उदाहरणे आहेत. सत्याची साथ देणाऱ्यांना आपल्या आयुष्याची किंमत मोजावी लागली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ८४वर्षाचे वयस्कर फा. स्टॅन स्वामी मरण पावले. ते आदिवासी लोकांच्या हक्कासाठी सत्याची लढाई लढत होते. राजकीय सत्ताधिकाऱ्याने त्यांना चुकीच्या खटल्याखाली तुरुंगात डांबले व ते आजारी असतानासुद्धा त्यांना जामीन न देत तुरुंगातच ठेवले गेले. त्यांची तब्येत खालावत गेली आणि कोविडच्या संक्रमणाने त्यांचा मृत्यू झाला. -आजच्या शुभवर्तमानात हेरोदासारखी कपटी माणसे आपल्या समाजात आजसुद्धा पाहायला मिळतात. योहानाच्या व येशूच्या जीवनात जे घडले तेच. फा. स्टॅन स्वामीच्या बाबतीत घडले. यदाकदाचित आपल्यावर ही परिस्थिती उद्भवली तर सत्याची साक्ष देण्यासाठी आपण येशूचे अनुयायी म्हणून तयार आहोत का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यास व तुझी आज्ञा पाळून तुला अनुसरण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या