Marathi Bible Reading | Saturday 5th February 2022 | 4th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील चौथा सप्ताह

शनिवार 

 दि. ५ फेब्रुवारी  २०२२

✝️ 
  "येशूला त्यांचा कळवळा आला"

संत आगथा 
- कुमारिका, रक्तसाक्षी (२५१)

✝️



इटलीतील कँटानिया नामक गावातील एका श्रीमंत घराण्यात आगथा हिचा जन्म झाला. अगदी बालवयातच तिने स्वतःस देवाला वाहून घेतले. आमरणकौमार्याचे व्रत तिने स्वीकारले. राजदरबारात सल्लागारांच्या पंक्तीत बसणारा क्विटेन नावाचा प्रतिष्ठीत पुरुष आगथाच्या सौंदर्यावर इतका मोहित झाला की, त्याने तिला सरळ लग्नाची मागणीच घातली. परंतु आगथाने स्पष्टपणे त्याला आपला नकार कळविला. हा आपला अपमान आहे असे वाटल्याने त्याने घडलेल्या घटनेचा सूड उगवायचा असे मनाशी ठरविले.
आपल्या वासना शमविण्यासाठी ख्रिस्ती लोकांविरोधी असलेल्या कायद्यान्वये क्विन्टेन ह्याने आगथा हिला राजासमोर उभे केले. तसेच तिला वेश्यागृहात पाठविण्यात यावे असा धूर्त, सल्लासुद्धा राजाला दिला. तिथे तिला मरणप्राय यातनांना तोंड द्यावे लागले. परंतु ती मुळीच मागे हटली नाही. एकदा नांगराला हात घातलाय ना! मग आता मागे का सरायचे?
एक महिनाभर ती हे सर्व अन्याय, छळ सहन करीत होती. क्विन्टेन ह्याने तिला वेगवेगळ्या मार्गांनी धमक्या देण्याचे सत्र सुरू केले. ह्या धमक्यांना तिने काडीमात्र किंमत दिली नाही. उलट अधिक उत्साहाने आणि मोठ्या धैर्याने “येशू ख्रिस्त हाच आपला मुक्तीदाता आणि प्रकाश आहे” असे जाहीर केले. तिला फटके मारण्यात आले. टोकदार अशा तीक्ष्ण धातूंच्या सळया तापवून तिच्या शरीरावरून विशेषतः स्तनांवर फिरविण्यात आल्या. ह्या सर्व डागण्या ती खूप सहनशीलतेने सहन करीत होती. शेवटी त्याने तिला तुरुंगात डांबले. तिला अन्नपाणी वा औषधही पुरविले जाऊ नये असा आदेश दिला.
परंतु देवाने तिची आवश्यक ती काळजी घेतली. तुरूंगात असताना एका दृष्टातांत तिला संत पीटर ह्याने दर्शन दिले आणि तिच्या सर्व जखमा बऱ्या  केल्या. तिचे शरीर लहान बाळासारखे पूर्ववत झाले. हे पाहून क्विन्टेन आश्चर्यचकित झाला. परंतु त्याचे मनपरिवर्तन मात्र झाले नाही. उलट त्याच्यातील बीभत्सपणा आणि कामवासना आणखी जागृत झाली. आगथाला पुन्हा एकदा राजासमोर हजर करण्यात आले. परंतु दुसऱ्यांदा तिने येशू ख्रिस्तावरील आपला विश्वास आणि आमरण कौमार्य व्रत निर्भयपणे जाहीर केले.
आता मात्र क्विन्टेन अक्षरश: पेटून उठला. सगळा जळफळाट त्याने आगधाला आणखी भयंकर यातना देऊन व्यक्त केला. जळत्या निखाऱ्यात फुटलेल्या भांड्याचे तुकडे मिसळून त्यावरून आगथाचा नग्न देह त्याने फरफटून नेण्याचा आदेश दिला. त्यावेळी एक भूकंप झाला आणि क्विन्टेन घाबरून पळून गेला. त्याच्या दुसऱ्याच रात्री आगथाने अखेरचा श्वास घेतला. तो दिवस होता ५ फेब्रुवारी २५१. मरतेसमयी तिच्या तोंडून पुढील शब्द निघाले :
"हे प्रभो, माझ्या निर्माणकर्त्या, तू अगदी पाळण्यापासून माझे संरक्षण करीत आलेला आहेस. माझ्याकडून तू ऐहिक सुखाची ओढ काढून घेतलीस आणि त्याऐवजी मला सहनशीलतेची देणगी दिलीस. आता माझा आत्मा स्वीकार."
संत आगधाने आपले सर्वस्व प्रभू येशू ख्रिस्ताला वाहिले. कौमार्याची शुद्धता तिने त्याला अर्पण केली आणि त्यात टिकून राहण्यासाठी तिने त्याच्याकडे संरक्षण मागितले आणि आजवरही ख्रिस्ताने तिचा देह कोवळा लुसलुशीत आणि ताजा टवटवीत ठेवलेला आहे. जेव्हा जेव्हा माऊंट एना येथे उद्रेक होतात तेव्हा कॅटानियाचे श्रद्धावंत ख्रिस्ती लोक तिचा अविनाशी देह दर्शनासाठी बाहेर काढतात. संत पीटरच्या स्पर्शाने पूर्ववत झालेली तिची त्वचा वेगळ्याच तेजाने झळाळते. तेव्हा तिचा देह खरोखर पवित्र आत्म्याचे मंदिर असावे असे जाणवल्यावाचून राहत नाही.

चिंतन : “हे येशू ख्रिस्ता, सर्वांच्या प्रभो, तू माझ्या हृदयाकडे पहा, तुला माझ्या सर्व इच्छा आकांक्षा ठाऊक आहेत. जे काही माझे आहे ते सर्व तुझेच आहे. तू माझा मेंढपाळ, मी तुझे कोकरू आहे. मला दुष्ट शक्तीवर विजय मिळविण्यास सहाय्य व सत्पात्र कर" संत आगथाची प्रार्थना.



प्रभू येशू आपल्या शिष्यांसोबत अविरतपणे देव राज्याची सुवार्ता घोषवित फिरत होता. काही शिष्यांना येशूने कामागिरीवर पाठविले होते. अशा  परिस्थितीत विसावा घेण्यासाठी सर्वजण जमले असता सर्वांनी आपआपल्या कार्याचा आढावा प्रभूयेशू समोर सादर केला.  प्रभू येशूने सर्व शिष्याना रानात एकांनी जाऊन विसावा घेण्यास  सांगितले. विसावा घेतल्यामुळे पुन्हा नव्याने कार्य करण्यास शक्ति व प्रेरणा मिळते.

 येशू विसावा घेण्यास गेला असता लोक आधीच त्याठिकाणी पोहोचले होते. येशूच्या मागे चालणाऱ्यांनी आशेचा दीप पाहिला, करूणेचा व मोयेचा स्पर्श अनुभवला. त्यांना जणू मार्गदर्शक व खरा नेता सापडला. प्रभूने त्यांची आर्तता जाणली आणि 'येशूला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे  होते.' जीवनाचा मार्ग सुकर बनावा यासाठी प्रबोधन व मार्गदर्शनाची गरज असते. प्रभूयेशू तर गुरुंचा गुरु आणि देवपुत्र तारणारा आहे. तो करूणा सागर आहे. सर्वदा आपली काळजी वाहणारा मेंढपाळ आहे.

योग्य वेळी विसावा घेऊन जीवनाचे नुतनीकरण करू या. अविरतपणे प्रभूची स्तुती व गौरव करण्यासाठी कृपा मागू या.



✝️   

पहिले वाचन१राजे ३:४-१३
वाचक :   राजाच्या पहिल्या  पुस्तकातून घेतलेले वाचन

“आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे."

राजा शलमोन गिबोन जेथे यज्ञ करावयास गेला, ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शलमोनने एक सहस्र होमबली अर्पिले. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन." शलमोन म्हणाला, "तुझा सेवक माझा बाप दावीद याच्यावर तुझी मोठी दया असे; तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, धर्माने आणि सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्या प्रीत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसावयास त्याला तू पुत्र दिला; वस्तुस्थिती अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य आणि अगणित आहेत. यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे म्हणजे मला बऱ्यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे ?"
शलमोनने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्याला म्हणाला, "तू दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितली; म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धीमान आणि विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही आणि पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर मी तुला देतो, धन आणि वैभव ही तुला देतो; तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्यासमान कोणी असणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ११९:९-१४
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तुझे नियम मला शिकव. 

१) तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील ?
तर तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. 
अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; 
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.

२) मी तुझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून 
मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. 
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; तुझे नियम मला शिकव 

३.) मी आपल्या मुखाने
तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयाचे निवेदन करतो.
 तुझ्या निर्बंधाचा मार्ग हीच माझी धनसंपदा, 
असे मानून मी अत्यानंद करतो.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. आलेलुया !
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ६ :३०-३४

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ६:३०-३४

"ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. "

प्रेषित येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे केले आणि जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही रानात एकान्ती चला आणि थोडा विसावा घ्या." तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवावयास देखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्ती गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले आणि पुष्कळजणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: येशूच्या जीवनात एकांतवासाला फार महत्व आहे. किंबहुना तो त्याच्या जीवनाचा आधार आहे. येशू जेव्हा जेव्हा एकांतवासात होता तेव्हा तो आपल्या पित्याशी संवाद साधत असे, प्रार्थना करत असे. जेणेकरून तो जे कार्य करत आहे ते पित्याला मान्य आहे की, नाही पडताळून पाहत असे. येशूचे सामर्थ्य ह्याच एकांतवासातून आले होते. चांगल्याची निवड, सत्यनिष्ठपणा, दयाळू आणि कनवाळूपणा ह्याच येशूच्या प्रार्थनेमधून वापरल्या होत्या. म्हणऊन तोच अनुभव आपल्या शिष्यांनासुद्धा यावा म्हणून केलेल्या कार्याची पोच घेत असताना तो शिष्यांना एकांती येण्यास विनंती करतो. पुन्हा परमेश्वराचे कार्य करण्यास ते सिद्ध, तत्पर व्हावे म्हणून तो त्यांच्याबरोबर राहतो. तो त्यांना एकटे सोडत नाही तर त्यांच्या बरोबर राहतो. आजच्या दिवशी जाणून घेऊ या की, येशू आपल्याला कधी एकटे सोडत नाही. तर तो आपल्याबरोबर सतत असतो. "मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याबरोबर राहीन.” (मत्तय (२८:२०)

प्रार्थना : हे करुणासागर प्रभू, आमच्या अंत:करणात तुझी करूणा जागृत ठेव, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या