यशयाला देवाचे दर्शन झाल्यावर देवाची हाक त्याने ऐकली, व यशयाला आपल्या अपात्रतेची जाणीव झाली. तरीसुध्दा देवाने त्याला आश्वासनपूर्वक वरदान दिले आणि यशया देवाचा संदेष्टा बनण्यास तयार झाला. संत पौल म्हणत आहे, ‘प्रेषित म्हणावयास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळींचा छळ केला, तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे.'
प्रभू येशूने शिमोन पेत्राला आपला पहिला शिष्य होण्यास पाचारण केलेले आपण पाहतो. मासेमारी करणाऱ्या शिमोनाला प्रभू येशू समुद्रात मासे पकडण्यासाठी जाळी टाकताना मार्गदर्शन करतो. प्रभू येशूचे सामर्थ्य पाहून पेत्र आपली अपात्रता जाहीर करतो, येशूच्या कृपेचे वरदान मिळताच जो येशूला अनुसरतो. देवाची निवड व देवाची योजना हि आपल्या विचार पलीकडची आहे. परमेश्वराला माणसाची अंतर्बाह्य ओळख असते. त्यानुसारच तो मानवाला घडवतो.
पाचारण हे परमेश्वराकडूनच असते. केवळ प्रतिसाद माणसाने द्यायचा असतो. परमेश्वर माणसाचे शिक्षण, व्यवसाय किंवा त्याचे शहाणपण व बुद्धिमत्ता पारखत नाही तर त्याचे अंतःकरण पारखतो. प्रभू येशू आपल्या सर्वांना बोलावित आहे. आपला प्रतिसाद देऊ या .
✝️
पहिले वाचन यशया ६: १-८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हा मी आहे! मला पाठव."
उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते, त्या प्रत्येकाला सहासहा पंखे होते, दोहोंनी तो आपली तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी आणि दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, "पवित्र, पवित्र, पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय!” घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले आणि मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, “हाय हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहातो आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला, तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, "पाहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?" तेव्हा मी म्हणालो, "हा मी आहे! मला पाठव."
हा प्रभूचा शब्द आहे.
शुभवर्तमान लूक ५ :१-११
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सर्व सोडून देऊन ते येशूचे अनुयायी झाले."
लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता, त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायाला शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, "मचवा खोल पाण्यात हाकार, आणि मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा." शिमोनने त्याला उत्तर दिले, "गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही सापडले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली, तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणाविले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, "प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते; तसेच शिमोनचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, “भिऊ नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: पवित्र व्यक्तींच्या उपस्थितीचे भावतरंग आसपासच्या व्यक्तींच्या जीवनात उमटत राहतात. ज्यांना त्यांच्या पावित्र्याचा अनुभव येतो ते देखील मंत्रमुग्ध व अंतर्मुख होऊन जातात आणि त्यांच्याही नकळत त्यांचे अवघे जीवन पालटून जाते. आजच्या तिन्ही वाचनात असेच काहिसे घडत असल्याचे दिसून येते.
१. आश्चर्याची भावना : जेव्हा यशया संदेष्टा मंदिरात देवाचे वैभवशाली तेज पाहतो तेव्हा तो देहभान हरपून जातो. खुद्द प्रभूने आपल्याला दृष्टान्त दिला असे मानणारा संत पौल भारावलेल्या मनःस्थितीत लेखन करताना दिसतो. तर रात्रभर कष्ट करून काहीही न मिळाल्याने हतबल झालेले आणि आता येशूच्या सांगण्यावरून जाळी फाटेपर्यंत मासळी मिळविणारे पेत्र आणि त्याचे भागीदार आश्चर्यचकीत व विस्मित होतात. ह्या सर्वांचे कारण म्हणजे पवित्र व्यक्तीच्या उपस्थितीत आपल्याला अद्भूत असा अनोखा अनुभव येत असतो.
२. अपात्रतेची भावना : आपण अशुद्ध ओठांचा मनुष्य असून अशुद्ध ओठांच्या लोकांत आपण राहतो. अशी अपात्रतेची कबुली यशया देतो. परमेश्वर मात्र एका सेराफिम (देवदूत)च्या द्वारे इंगळीचा स्पर्श त्याच्या ओठांना करून त्याचा दोष दूर करतो संत पौल स्वतःला प्रेषितांमध्ये कनिष्ठ असल्याचे मान्य करतो. संत पीटरदेखील आपण पापी असल्याचे कबुली देत प्रभूला आपणापासून दूर जाण्याची विनंती करतो. मात्र ही अपात्रतेची भावना न्यूनगंडासारखी नसते तर ती पवित्र व्यक्तीच्या उच्चतम प्रतिष्ठेची साक्ष देणारी असते.
३. समर्पणाची भावना परमेश्वराची योजना समजताच यशया म्हणतो, “हा मी आहे, मला पाठव.” संत पौल तर पूर्णपणे देवाच्या कृपेवर विसंबून राहण्याचा निर्धार करतो. तर पेत्र आणि त्याचे सोबती सर्वकाही सोडून देऊन येशूला अनुसरतात. अशी समर्पणाची भावना अनुभवण्यासाठी आपल्या सध्याच्या जीवनशैलीपेक्षा काहीतरी उदात्त, उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे आपल्याला खुणावणारे असावे लागते. यशया, पौल व पैत्र ह्यांना अशा मौल्यवान ठेवीचा शोध लागला तेव्हा ते देवाला पूर्णपणे शरण जाऊ शकले.
आत्मपरीक्षण : मला पवित्र व्यक्तीच्या सहवासाचा थोडाफार वैयक्तिक अनुभव आलेला आहे का ? संत, मदर तेरेजा, पोप महोदय, येशूच्या पाच पवित्र जखमा धारण करणारे पवित्र स्त्री-पुरुष, पवित्र भूमी, पवित्र तीर्थस्थळे, साक्रामेंताची पेटी ह्या वातावरणाचा माझ्या जीवनावर कोणता प्रभाव दिसून येतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यास व तुझे प्रामाणिक अनुयायी बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या