Marathi Bible Reading | Saturday 29th January 2022 | 3rd Week in Ordinary Time

सामान्यकाळातील तिसरा  सप्ताह

शनिवार  दि. २९ जानेवारी  २०

✝️ 
 "तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही ?"




संत कॉन्स्टॅन्शियस 
पेरुजियाचे पहिले महागुरू, रक्तसाक्षी (१८०)  

✝️

हे जीवन क्षणभंगूर असेल तरी माणसे अन्याय, अत्याचार व अराजकता ह्यांचे संवर्धन करतात. दावीद सारख्या महान राजानेसुद्धा अन्याय, अत्याचार व पाप केले. असे आजच्या पहिल्या वाचनात म्हटले आहे. नाथानासमोर दावीदाची मान शरमेने खाली गेली. दावीद राजाच्या जीवनात महाभयंकर वादळ आले मात्र त्याची देवावरील श्रद्धा ढळली नाही.

आजच्या शुभवर्तमानातील वादळाची घटना प्रभू येशू शिष्यांच्या बरोबर असताना घडली. वादळा मुळे आपण सर्वजण समुद्रात बुडून जाऊ अशी भिती शिष्यांना वाटली. अशावेळी प्रभू येशू झोपी गेला होता.  येशूने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला शांत केले.  प्रभू येशू स्वतः बरोबर असताना जीवनात भिती  बाळगण्याचे कारण नाही. आपला प्रभूवरील विश्वास बळकट असायला हवा. आपल्या सर्वांच्या जीवनात अनेक प्रकारची वादळे निर्माण होत असतात. परंतु  त्या वादळामध्ये आपण न डगमगता परिस्थितीला सामोरे जाऊन प्रभूवरील आपली श्रद्धा मजबूत करायची आहे. प्रभू म्हणतो, 'घाबरु नकोस, तुझा बचाव करण्यास व तुला सोडविण्यास मी तुझ्या बरोबर आहे. ' 

✝️   

पहिले वाचन २ शमुवेलच्या  १२:१-७,१०-१७
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“मी परमेश्वराविरुद्ध अपराध केला आहे."

परमेश्वराने नाथानला दावीदकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “एका नगरात दोन मनुष्य राहत होते, त्यातला एक श्रीमंत आणि दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत मनुष्याची मेंढरे आणि गुरे विपुल होती, पण त्या गरिबापाशी एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या मुलांबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या पेल्यातून पाणी पीत असे आणि त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडामेंढरातून अथवा गाईबैलांतून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले." हे ऐकून त्या मनुष्यावर दावीदचा कोप भडकला आणि तो नाथानला म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे; ज्याने हे कृत्य केले त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने त्या मेंढीच्या चौपट बदला दिला पाहिजे. नाथान दावीदला म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. आता अरिष्ट तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती ह्याची पत्नी आपली बायको म्हणून घरात आणली आहेस. परमेश्वर म्हणतो, 'पहा, मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन; तुझ्या स्त्रिया तुझ्यादेखत तुझ्या शेजाऱ्यांस देईन, तो ह्या सूर्यादेखत त्यांची अब्रू घेईल. तू ते काम गुप्तपणे केले, पण मी हे सर्व इस्राएलदेखत, ह्या सूर्यादेखत करीन. दावीद नाथानला म्हणाला, “मी परमेश्वराविरुद्ध अपराध केला आहे. नाथान दावीदला म्हणाला, “परमेश्वराने तुझा अपराध दूर केला आहे, तू मरावयाचा नाहीस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंस उपहास करावयास निमित्त दिले आहे, यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरेल." असे खडसावून नाथान आपल्या घरी गेला. उरियाच्या पत्नीला जो मुलगा दावीदपासून झाला त्याच्यावर परमेश्वराने दुखणे आणले आणि तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची कळकळीने विनवणी करू लागला. त्याने उपास केला आणि तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची वयोवृद्ध माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली; तो उठला नाही आणि त्याने त्यांच्याबरोबर भोजन केले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५२:१२-१७
प्रतिसाद :  हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर.

१) हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर, 
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. 
तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस. 
आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.

२) तुझ्या सहाय्याचा आनंद मला पुन्हा मिळू दे 
आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, 
म्हणजे मी अपराध्यांस तुझे मार्ग शिकवीन 
आणि पापीजन फिरून तुझ्याकडे वळतील.

३) माझ्या सहाय्यकर्त्या देवा, तू मला मुक्त कर..
 म्हणजे माझी जीभ तुझ्या चांगुलपणाचा गजर करील.
हे प्रभो, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
देवपित्याने स्वतः होऊन सत्य वचनाद्वारे आपल्याला जन्माला घातले, कारण सर्व मानवजातीत आपणच जणू देवाच्या मळ्यातील पहिली फळे व्हावीत, अशी त्याची इच्छा होती.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क  ४ : ३५-४१

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "हा आहे तरी कोण ? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात."

संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "आपण पलीकडे जाऊ या," तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर, येशू मचव्यात होता ते तसाच त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ सुटले आणि लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. येशू तर होडीच्या मागच्या बाजूला उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, "गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही ?" तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, "उगा राहा! शांत हो!" मग वारा थांबला आणि अगदी निवांत झाले. नंतर येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही ?" तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण ? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात.'

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: रात्रीच्या वेळी अचानक वीजेचा प्रवाह खंडित होतो आणि घरात दाट अंधार पसरतो. अशावेळी आपण "सगळं संपलं” असे म्हणून निराशेचा निःश्वास सोडत नाही कारण आपल्याला माहीत आसते की वीज पुरवठा करणाऱ्या जागी माणसे आहेत ती कामाला लागतील व वीज पुरवठा करतील. आणि आपले घर पूर्ववत प्रकाशित होईल, आणि शेवटी तसेच घडते. प्रेषित ज्या बोटीत होते ती बोट वादळात सापडते व त्यामुळे प्रेषित घाबरून जातात. त्यावेळी येशू प्रेषितांच्याच बोटीत झोपलेला होता. परंतु तो झोपलेला असतानाही त्याच्या अवतीभोवती वादळ सुरू आहे आणि प्रेषित घाबरलेले आहेत. ह्याची त्याला पूर्ण जाणीव होती. परंतु जाणून बुजून तो प्रेषितांच्या हाकेची वाट पाहात होता. शेवटी येशूच आपल्याला ह्या संकटातून वाचवील ह्या श्रद्धेने प्रेषित येशूला साद घालतात आणि येशू शिकवितो की आपल्या जीवनात उसळून येणाऱ्या दुःखाच्या आणि संकटाच्या लाटा व त्यामुळे आपण अनुभवत असलेली भीती दूर करण्याची शक्ती येशूमध्ये आहे आणि आपण विश्वासाने त्याला साद घालतो तेव्हा तो खात्रीने आपल्या मदतीला धावून येतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, जीवनातील कठीण प्रसंगी जीवनाची नौका वादळात सापडली असता तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास मला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या