शुभवर्तमान मार्क ४ : २६-३४
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माणूस जमिनीत बी टाकतो. तो झोपी गेला असता ते बी वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलीच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. परमेश्वराचे राज्य असे आहे.”आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडाझुडपांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.” असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्यासमोर बोलत नसे, तथापि एकान्ती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू आजच्या शुभवर्तमानात देवाच्या राज्याविषयी बोलतो. देवाचे राज्य म्हणजे येशूच्या शिकवणीच्या अनुषंगाने निर्माण केलेले जग होय. शुभवर्तमानात वर्णन केलेला शेतकरी म्हणजे आपण सर्वजण, आपण बी पेरतो ह्याचा अर्थ देवाचे राज्य जगात पसरविण्यासाठी देवाने आपल्याला दिलेल्या आमंत्रणाला आपण दिलेला प्रतिसाद होय. आपण आपापल्या परीने आपल्या शब्दाने आणि आपल्या उदाहरणाने येशूचे विचार अवतीभवती पसरवायचे आहेत. आपल्या प्रयत्नांना कोणत्या स्वरूपात यश मिळेल, कधी फळ मिळेल हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. पण फळ निश्चित मिळेल. यश नक्की आपल्या पदरात पडेल कारण यश आणि फळ देण्याचे काम परमेश्वराचे आहे असे येशू दाखल्याद्वारे आपल्याला सांगतो. म्हणून पैशाची हाव वाईट आहे, लग्नाच्या जीवनात पावित्र्य ठेवले पाहिजे, आपल्या शत्रूंना क्षमा केली पाहिजे, खोटे बोलू नये, ढोंगीपणा टाळावा ह्या व येशूच्या इतर शिकवणीविषयी बोलताना काही माणसे आपल्याकडे उपहासाने पाहातील, प्रसंगी आपली टरही उडवतील. पण त्यामुळे घाबरून जाऊन येशूच्या शिकवणीविषयी बोलण्याचे आपण सोडून देऊ नये. येशूची शिकवण त्या त्या माणसांच्या जीवनात खमिराप्रमाणे सुप्तपणे आपले कार्य करीत राहील ह्या विषयी आपल्या मनात काडीमात्र शंका नसावी.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा शब्द जाणण्यास, आचरणात आणण्यास व कृतीद्वारे सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या