सामान्यकाळातील तिसरा सप्ताह
गुरुवार दि. २७ जानेवारी २०२२
✝️
“ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.”
संत आंजेला मेरिसी
- कुमारिका (१४७४-१५४०)
चिंतन: “जबरदस्तीने काहीही मिळविण्याचा प्रयत्न करू नका. देवाने प्रत्येकाला स्वतंत्र इच्छाशक्ती आणि विवेक स्वातंत्र्य दिलेले आहे. आपली आज्ञा पाळावी म्हणून तो कोणालाही जबरदस्ती करीत नाही.” संत आंजेला मेरिसी
परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करुन अनेक दाने दिलेली आहेत. परमेश्वर मुक्तपणे आणि उघडपणे देत असतो. परमेश्वर काहींच राखून ठेवित नाही. परमेश्वर जगातील प्रकाश आहे म्हणूनच त्याच्याठायी गुप्त असे काहीच नाही. त्याचे अस्तित्व व सार्वभौमत्व अढळ आहे.
आज प्रभू येशू आपल्याला आवाहनपूर्वक सांगत आहे की, आपल्याला प्राप्त झालेल्या वरदानांचा आणि देणग्यांचा वापर आपल्या जीवनासाठी व इतरांच्या भल्यासाठी करायचा असतो. आपण दुसऱ्यांसाठी तारणाचे साधन व प्रेरक बनावेत म्हणूनच प्रभू येशू आज म्हणत आहे,' दीवा प्रकाश देण्यासाठी आहे, तो झाकलेला नसावा. अनेकदा आपण आपल्या देणग्या स्वार्थासाठीच वापरतो. गरजवंत आणि ज्यांना आपल्या साहाय्याची अपेक्षा आहे त्यांना आपण दुर्लक्षितो.संपत्तीचा मोह आणि भौतिक गोष्टींचा लोभ यांमुळे आपले अंतःकरण कठीण होत असते. म्हणूनच देवाने दिलेले दान आपण इतरांना दिल्यास देव त्याच्या अनेकपटीने आपल्याला आशीर्वादित करणार आहे.
मोकळ्या मनाने व उदारपणे आपल्याला दानधर्म करता यावा आणि प्रभूचे वचन आत्मसात करुन आचरणात आणता यावे म्हणून प्रभूकडे प्रेरणा व कृपा मागूया.
पहिले वाचन २ शमुवेलच्या ७:१८-१९,२४-२९
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे प्रभो देवा, मी कोण आणि माझे घराणे ते काय ?"
दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, "हे प्रभो देवा, मी कोण आहे आणि माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणावे ? हे प्रभो परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ शुल्लक गोष्ट आहे, तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बऱ्याच काळाचे सांगून ठेवले आहे, प्रभो परमेश्वरा, तू हे सर्व मानवी व्यवहारासारखे केले आहे.
इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केली. हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास, तर आता हे प्रभो परमेश्वरा, आपला सेवक आणि त्याचे घराणे ह्याविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर. 'सेनाधीश परमेश्वर इस्राएलवर सत्ताधीश आहे' असे म्हणून लोकांनी तुझ्या नावाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्याचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे. कारण, हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्राएलच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितले, 'मी तुझे घराणे स्थापीन.' म्हणून ही विनंती करावयाची हिंमत तुझ्या सेवकाला झाली. आता हे प्रभो परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तुझी वचने सत्य आहेत आणि तू आपल्या सेवकाचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहेस. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला असा आशीर्वाद दे की, ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कारण हे प्रभो परमेश्वरा, तू हे म्हटले आहे; तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभीष्ट होवो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३२:१-५,११-१४
प्रतिसाद : प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. लूक १:३२
१) हे परमेश्वरा, दावीदचे आणि
त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर.
त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली,
याकोबच्या समर्थ देवाला नवस केला.
२) “मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही,
आपल्या अंथरुणावर पडणार नाही.
मी आपल्या डोळ्यांवर झोप,
आणि आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही;
परमेश्वरासाठी स्थान, आणि
याकोबच्या समर्थ देवासाठी
निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन."
३) परमेश्वराने दावीदजवळ शपथ वाहिली आहे,
तो माघार घेणार नाही. ती शपथ अशी.
“तुझ्या पोटचे फळ, तुझा पुत्र ह्याला
मी तुझ्या राजासनावर बसवीन."
४)“जर तुझी मुले माझा करार आणि
मी त्यांना शिकवलेले नियम सत्याने पाळतील,
तर त्यांचीही मुले पिढ्यानुपिढ्या
तुझ्या राजासनावर सदैव बसतील."
५) परमेश्वराने सियोनची निवड केली आहे,
आपल्या निवासासाठी त्याला
सियोन आवडले आहे:
"हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे,
येथे मी राहण्याचे निवडले आहे."
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देवाचे वचन स्वीकारा, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारा आणि वास्तविक ते असेच आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ४ : २१-२५
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ४:२१-२५
“दिवा दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. कोणाला ऐकावयास कान आहेत तर तो ऐको." पुन्हा तो त्यांना म्हणाला, "तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्यामापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू शिकवीत असताना येशूच्या समोर जो माणसांचा जमाव असायचा त्या जमावात काही माणसे खुल्या मनाने येशूचे शब्द ऐकण्यासाठी आलेली नसायची. येशूच्या शिकवणीला विरोध करायचा हा त्यांच्या उपस्थित राहाण्याचा एकमेव उद्देश होता. म्हणून त्या माणसांना कान असूनही, म्हणजे ऐकण्याची कुवत असून ही येशूचे शब्द कितीही त्यांच्या फायद्याचे असले तरी ते शब्द त्या माणसांच्या अंतःकरणात पोहोचत नव्हते. ती माणसे बहिरेपणाचे ढोंग करीत असत. त्यामुळेच येशू त्यांना उद्देशून म्हणतो, “ज्याला कान असतील त्याने ऐकावे” येशूचे शब्द फक्त त्या माणसांच्याच नव्हे तर जी माणसे त्यांच्या चांगल्यासाठी सांगितलेल्या गोष्टींकडे कानाडोळा करतात त्या सर्वांच्या जीवन शैलीवर घणाघाती प्रहार होता. न ऐकल्याचा आभास निर्माण करणाऱ्या माणसांना दिलेला प्रकाश त्यांच्यासाठी अंधारच राहातो. त्यामुळेच येशू त्यांना म्हणतो की, शेवटी काहीही झाकलेले राहाणार नाही म्हणजेच कधी ना कधी तुमच्या ढोंगीपणाचे बिंग फुटल्याशिवाय राहाणार नाही. पण तोपर्यंत उशीर झालेला असणार. तोपर्यंत "उशीर झालेला असणार” ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खुद्द येशूने निवडलेल्या यहुदाचे आहे. दुसऱ्या प्रेषितांना येशूने जे मार्गदर्शन केले तेच मार्गदर्शन यहुदालाही मिळाले, पण जे मार्गदर्शन इतर प्रेषितांना मानसन्मानाकडे पोहोचविण्यास कारणीभूत ठरले त्याच मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे यहुदासाठी ते एक शोकांतिका बनले.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्हाला दिलेल्या वरदानांचा वापर तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या