Marathi Bible Reading | Friday 14th October 2022 | 28th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह  

शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२

तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.


संत कॅलिस्टस पहिले 

परमगुरू, रक्तसाक्षी (...२२२)

देव आपला रक्षणकर्ता व तारणारा आहे. देवाची आपण सर्वोत्कृष्ट निर्मिती आहोत. आपले जीवन देवासाठी  अनमोल आहे. देव आपल्या सर्वांना अंतर्बाह्य पूर्णपणे जाणतो म्हणूनच प्रभू म्हणत आहे, “भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.” देव सर्वदा आपल्याबरोबर असतो व सर्व परिस्थितीत आपले रक्षण करतो. देवाने म्हटले आहे, “मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे.” (यशया ४९:१६). 

परमेश्वर त्याच्या योजनेप्रमाणेच आपले जीवन चालणार आहे, मात्र देवावरील आपली श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती तपासून पहायला हवी.  परमेश्वराच्या धैर्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा आपल्याला मिळाला आहे. त्याच पवित्र आत्म्याठायी आपण देवाला शरण जाऊ या.

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस१:११-१४ 
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

“आम्ही ख्रिस्तावर तो येण्यापूर्वीच आशा ठेवली होती. पवित्र आत्म्याचा तुम्हांवर देखील शिक्का मारण्यात आला आहे."

आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो, ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन, म्हणजे तुमच्या तारणाविषयीची शुभवार्ता ऐकून घेतल्यांनतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हांवर त्याच्यासाठी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या, खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाची हमी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ३३:१- २, ४ - ५,१२-१३
प्रतिसाद :   ज्या लोकांना त्याने प्रजा म्हणून निवडले, ते धन्य !

१) अहो, नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा, 
सरळ मनाच्या माणसांना स्तुतिगान शोभते. 
वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.

२) कारण परमेश्वराचे वचन विश्वसनीय आहे,
त्याची सर्व कृती सत्याची आहे. 
त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत,
 परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

३ )ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, 
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता 
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य ! 
परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १२:१-७
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "तुमच्या डोक्याचे केस मोजलेले आहेत."

हजारो लोकांनी इतकी गर्दी केली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणांला परुश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी संभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही आणि जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलता ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही खाजगी खोलीत कानात सांगता ते धाब्यावर गाजवले जाईल.
माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही ? तरी त्यांपैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन : आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू आपल्याला सर्व परिस्थितीत देवावर विश्वास ठेवून त्याच्या योजनेप्रमाणे जीवन जगण्यास बोलावत आहे. आज जगात सर्वत्र असत्य, अशांती, स्वैराचार, सूड, स्वार्थ अशा अनेक पापांचा अंधकार वाढत आहे. अशा अंधारात लोक दिवसेंदिवस अधिकाधिक खूप मोठ्या प्रमाणात गुरफटले जात आहेत. परंतु प्रभू येशू आपणांस स्पष्ट पणे सांगत आहे की, जे काही तुम्ही अंधारात करतात ते सर्व प्रकाशात आणले जाईल. आपली कृत्ये जर प्रकाशाची, शांती-सलोख्याची असतील तर आपणांस कशाचीच भीती नाही कारण आपले कोणीच काही वाईट करू शकत नाही. जो देवावर विश्वास ठेवून चांगली कृत्ये करतो त्याला मरण देखील शरण येते. त्याचे शरीर नष्ट झाले तरी आत्मा कायम जिवंत राहतो. आज प्रभू चरणी नतमस्तक होऊन आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया की माझा देवावर विश्वास आहे का? माझी कृत्ये प्रकाशाची आहेत का ? देवाच्या कार्यासाठी माझ्या जिवाचा त्याग करण्यास मी तयार आहे का? आपल्या मनाचे आत्मपरीक्षण करून दैवी कृपेचा लाभ घेऊया.

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या अस्तित्वाची जाण ठेवून धैर्याने तुझी सुवार्ता घोषविण्यास मला प्रेरणा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या