सामान्यकाळातील २८ वा सप्ताह
शनिवार १५ ऑक्टोबर २०२२
"तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हास शिकवेल.”
अविलाची संत तेरेजा
- कुमारिका, धर्मपंडिता (१५१५ - १५८२)
चिंतन : जेव्हा तुम्ही पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारता तेव्हा आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडा. त्यानंतर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी प्रभ येशू ख्रिस्त विराजमान झालेला पहा. संत तेरेजा
देवाच्या ज्ञानाचा, शहाणपणाचा व प्रकटीकरणाचा आत्मा आपल्या सर्वांना लाभावा व त्याचे सामर्थ्य आपण जाणावे असा बोध संत पौल आज करीत आहे.
सांप्रत युगात आपण जीवन जगत असताना येण्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात जाणीव करून देत आहे.
आज विशेष रितीने प्रभू येशू आपल्या सर्वांना त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देताना म्हणत आहे, “अशा प्रसंगी तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हांस शिकविल."
ख्रिस्तसभा आज अविलाची संत तेरेजा हिचा सन्मान करीत आहे. संत तेरेजाच्या जीवनात तिने देवाला व प्रार्थनेला प्रथमस्थान दिले होते. संत तेरेजा म्हणते, जी प्रार्थना केवळ देवाला प्रसन्न करने, आपल्यामध्ये बदल घडवून आणने व चांगले कृत्य करण्यास प्रकृत्र करने तीच खरी प्रार्थना होय.. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगणाऱ्या संत तेरेजा मध्यस्थीने पवित्र आत्म्याठायी शुद्ध प्रेरणाहायी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस१:१५-२३
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताने सर्वांवर मस्तक असे व्हावे यासाठी परमेश्वराने त्याला मंडळीला दिले, म्हणून हीच मंडळी त्याचे शरीर होय."
तुमच्या ठायी असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्यांविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्यांच्या सामर्थ्यांचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, मालकी सांप्रत, आणि भावी युगातील कोणतेही नाम घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिले, ही मंडळी हेच त्याचे शरीर.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ८:२- ७
प्रतिसाद : आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला सत्ता दिली आहेस.
१ )हे प्रभो, आमच्या स्वामी,
साऱ्या भूतलावर तुझे नाव कितीतरी थोर आहे!
तुझ्या ऐश्वर्याची कीर्ती गगनापर्यंत पोहोचली आहे.
बालके व तान्ही बाळे तुझे गुणगान गातात.
२ )आकाश जे तुझे अंगुलीकार्य,
तू नियोजित केलेला तो चंद्र, ते तारे, हे सगळे मी पाहतो.
तू मर्त्य मानवाची आठवण करावीस,
यत्किंचित मानवजातीची तू पर्वा करावीस तू असा तो कोण ?
३) तरी पण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस.
त्याला गौरव आणि सन्मान यांनी अलंकृत केले आहेस...
आपल्या हातच्या कलाकृतींवर तू त्याला सत्ता दिली आहेस,
सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मी तुझे स्तवन करतो,
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो,
कारण ह्या गोष्टी तू बालकांना प्रकट केल्या.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:८-१२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हांस शिकवील.”
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारील; तसेच जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरूद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरूद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हांला सभा, सरकार, आणि अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : प्रभू येशू मानव होऊन ह्या जगात आला जगातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी त्याने अनुभवल्या. लोकांचे परिस्थितीनुसार बदलणारे स्वभाव त्याने जवळून पाहिले. विशेष करून शास्त्री- परुशी जे आपल्या हातात सत्ता, अधिकार ठेवतात व सामान्य जनतेला आपल्या इच्छेनुसार वागवतात. म्हणूनच जे खऱ्या देवावर विश्वास न ठेवता केवळ पैसा, अधिकार, सत्ता, प्रसिद्धी ह्यांच्या मागे जाऊन त्यालाच आपला देव मानतात अशा लोकांना प्रभू येशू निक्षून सांगत आहे की, जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. तर मग मी ख्रिस्ती | आहे व प्रभू येशू माझा देव हे मी धैर्याने इतरांना सांगतो की ? की मला इतरांची भीती वाटते ? माझ्यासाठी केवळ पैसा, प्रसिद्धी, संपत्ती हेच महत्वाचे आहे की, मी देवासाठी सुद्धा वेळ देतो? आपल्या कृती आचरणातून व देवाच्या शब्दाद्वारे प्रभू येशूला इतरांना देतो का ? की नश्वर जगातील मोहाला, सुखाला बळी पडून अन्य देवतांचा स्वीकार करून मी माझ्या देवाला नाकारले तर नाही ना ? थोडा वेळ प्रभू सहवासात बसून आपल्या अंतःकरणात प्रभू शब्दावर मनन करून आपल्या जीवनात त्याला प्रथम स्थान देऊ या.
प्रार्थना : हे पवित्र आत्म्या, ये आणि आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर,
आम्हाला सामर्थ्य बहाल कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या