Marathi Bible Reading | Sunday 16th October 2022 |29th Sunday In Ordinary Time |

सामान्यकाळातील २ वा  रविवार 

१६ ऑक्टोबर   २०२२


देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय?

 लढाई करणाऱ्या अमालेक व त्यांच्या लोकांचा पाडाव कसा झाला ह्याचा वृतांत आजच्या पहिल्या वाचनात दिला आहे. केवळ वीर पुरुषांनी लढाई केली नाही तर मोशेने रात्रंदिवस परमेश्वराचा धावा केला... विशेषतः मोशेने हात उंचावून प्रार्थना केली. 
प्रार्थने शिवाय कोणतेच कार्य सिद्धीस जात नसते. प्रभूवरील विश्वासाबरोबरच प्रभूची वचने, त्याची शिकवण आणि नीतिमुल्यांचे परायण व चिंतन-मनन आणि प्रार्थना करणे महत्वाचे आहे, असे संत पौल मार्गदर्शन करीत आहे.

आजच्या शुभवर्तमानात प्रार्थनेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने  अत्याग्रही विधवेचा दाखला दिला आहे. 
आपण आपली प्रार्थना, आपली मागणी व विनंती कशा प्रकारची असते ह्यावर आज चिंतन करु या.  आपला  विश्वास बळकट करण्यासाठी आपण प्रभू वचन ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रभू कडे प्रेरणा मागू या. तसेच निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रभूला शरण जाऊ या. 

✝️   
पहिले वाचन :निर्गम  १७:८-१३
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलाची सरशी होई."

अमालेक येऊन रफीदीम येथे इस्राएल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले आणि तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलची सरशी होई आणि तो आपले हात खाली करी, तेव्हा अमालेकाची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन खाली ठेवला, त्यावर मोशे बसला आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंने त्याचे हात वर उचलून धरले, त्यामुळे सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. मग यहोशवाने आपल्या तरवारीच्या धारेने अमालेकाचा आणि त्याच्या लोकांचा पाडाव केला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : १२१:१-८

प्रतिसाद :  परमेश्वराचे नाव हाच आमचा आसरा आहे.

१) मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो,
मला सहाय्य कोठून येईल ?
आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर
त्याच्या सामर्थ्यात आमचे सहाय्य आहे.

२) तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही
 तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही पाहा, 
इस्राएलच्या रक्षकाला झोप लागत नाही 
आणि डुलकीही घेत नाही.

३)परमेश्वर तुझा रक्षक आहे, 
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. 
दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची 
तुला बाधा होणार नाही.

४ )परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, 
तुझ्या जिवाचे रक्षण करील, 
परमेश्वरा तुझे येणेजाणे येथून पुढे 
सर्वकाळ सुरक्षित करील.




दुसरे वाचन  २ तिमथी  ३:१४-४:२
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
 
"देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा."

तू ज्या गोष्टी शिकलास आणि ज्यांविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे है तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रगट होण्याला आणि त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने आणि शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर..
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १८:१-८
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“देवाचे निवडलेले लोक त्याचा जे धावा करतात त्यांचा तो न्याय करील."

आपल्या शिष्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, ह्याविषयी येशूने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या आणि माझ्या प्रतिवाद्याविरूद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात ठरवले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला नेहमी त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांस सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर असा विश्वास आढळेल काय ?

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  आजची वाचने मध्यस्थीच्या प्रार्थनेवर प्रकाश टाकणारी आहेत. 

अ. परमेश्वर हे मध्यस्थीच्या प्रार्थनेचे अंतिम टोक आहे : आजच्या पहिल्या वाचनात इस्राएल आणि अमालेक ह्यांच्यात युद्ध जुंपले तेव्हा मोशेने परमेश्वराकडे मध्यस्थीची प्रार्थना केली. मोशेचे हात उंचावलेलेच राहावेत म्हणून ते अहरोन आणि हूर ह्यांनी धरन ठेवले हे परमेश्वराच्या सामर्थ्याला मानवाने केलेल्या सहकार्याचे प्रतीक आहे. परंतु मध्यस्थीच्या प्रार्थनेची मूळ प्रेरणा आणि तिचे अंतिम टोक परमेश्वर आहे. मानवाने मध्यस्थी केली म्हणून नव्हे तर परमेश्वराने ती मान्य केली म्हणून अद्भुते घडली हा इस्राएलचा अनुभव होता. 
ब. मध्यस्थीची प्रार्थना प्रभुशब्दावर आधारलेली असावी : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तीमथ्याला आठवण करून देतो की, त्याच्या ईश्वरविषयक ज्ञानाचा उगम पवित्र शास्त्रामध्ये दडलेला आहे. त्यामुळे मध्यस्थीची प्रार्थना करताना आसपासच्या परिसराच्या गरजा आणि काळाची चिन्हे ओळखणे पुरेसे नाही तर पवित्र | शास्त्रामध्ये प्रकट करण्यात आलेली परमेश्वराची योजना समजून घेणे आवश्यक असते. त्या योजनेच्या विशाल परिघात आपल्या गरजा सामावलेल्या असतात. त्यांच्याशी आपली मध्यस्थी ही सुसंगत असायला हवी. 
क. मध्यस्थीच्या प्रार्थनेतील सातत्याला टिकणारी फळे येत असतात : आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू आपल्यासमोर अत्याग्रही विधवेचा दाखला सादर करतो. दाखल्याचा दुहेरी हेतू पहिल्याच ओळीत स्पष्ट करण्यात आलेला आहे. सर्वदा प्रार्थना करणे व खचून न जाणे. मध्यस्थीच्या प्रार्थनेचे एक महत्वाचे व दीर्घकाळ टिकणारे फळ म्हणजे अंतर्यामीची शांती! तुफान वादळातही स्थिर राहून खंबीरपणे प्रार्थना करण्यासाठी आपली दृष्टी परमेश्वरावर खिळविण्याची साधना अखंडितपणे करावी लागले. 'पिकाच्या धन्याने आपल्या पिकात कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा' या प्रभूवचनाला अनुसरून त्याच्याकडे पाचारणासाठी मध्यस्थीची प्रार्थना करूया.
आत्मपरीक्षण : माझ्या आध्यात्मिक जीवनात मध्यस्थीच्या प्रार्थनेला कोणते स्थान आहे ?

प्रार्थना : तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचावी, सर्वांना तुझ्या प्रेमाचा स्पर्श व्हावा म्हणून हे प्रभो, मला तुझ्या सुवार्तेचे साधन बनव आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या