Marathi Bible Reading | Monday 17th October 2022 | 29th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील २९ वा सप्ताह  

सोमवार १ ऑक्टोबर २०२२

अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, हे कोणाचे होईल ? 





अंत्युखियाचे संत इग्नेशिअस 

- धर्मपाल, महागुरू, रक्तसाक्षी (४५-१०७)


 घशांच्या विकारासाठी संत इग्नेशियसचा धावा केला जातो.

चिंतन: हिंस्र पशू हाच परमेश्वराकडे जाण्याचा माझा मार्ग असेल तर मला त्यांचे भक्ष्य बनणे खूप आवडेल. मी देवाचा गहूदाणा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र भाकरीसाठी हिंस्र पशूंच्या दातांखाली भरडले जाण्यास आनंदाने तयार आहे.-संत इग्नेशिअस

पण स्वभावतःच पापी व अपराधी आहोत, म्हणजेच जणू काय मृतात्म्यांमध्येच आपली गणना झाली होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे देवाच्या दयेने आणि देवाच्या कृपेनेच आपले तारण झालेले आहे. परमेश्वराची कृपा हे त्याचेच मुक्त असे दान आहे व ते श्रद्धेद्वारे मिळालेले आहे, आपल्या कर्मामुळे नव्हे. आपली तारणप्राप्ती देवाच्या कृपेनेच होत असते.

आपणास आज प्रभू म्हणतो, 'सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा'. खरे पाहता चरितार्थ चालविण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्यांची गरज आहे व त्यासाठी पैसा  कमाविणे गरजेचे आहे. मात्र सर्वस्वी द्रव्यालाच देव मानून त्याचा हव्यास धरणे ! हे माणसाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरु शकते. आपले जीवन क्षणभंगूर आहे, तरीसुध्दा अनेकजणांना धन संपत्तीचे आकर्षण असते. जीवनातील - बहुसंख्य वेळ लोभी माणूस धन मिळविण्यात आणि साठविण्यात खर्ची घालतो. अनेकदा साठविलेल्या धनाचा उपभोग सुध्दा अशा माणसांना घेता येत नाही, मात्र जीवनातील अशा लोभापायी आपण देवापासून दूर जातो.

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस २:१-१०

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

 "देवाने ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आणि त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले."

तुम्ही आपले अपराध आणि आपली पापे ह्यांमुळे मृत झालेला होता, त्या पापांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या तुम्हांला देवाने जिवंत केले. त्या लोकांत आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरुप असे वागलो, आपल्या देहाच्या अणि मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो आणि स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपत्र आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. (कृपेने तुमचे तारण झालेले आहे) आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले आणि त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले, ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हां आम्हांवरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या अगाध कृपेचे भांडार दाखवावे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ बाळगू नये कर्मे केल्याने हे झाले नाही; आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो, ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र : १०० : १- ५
प्रतिसाद : त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो.

१ )अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
हर्षाने परमेश्वराची सेवा करा. 
आनंदगीत गात त्याच्यापुढे या.

२ )परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. 
त्यानेच आम्हाला उत्पन्न केले,
आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा,
त्याच्या कुरणातोल कळप आहोत.

३ त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात, 
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा. 
त्याचे उपकारस्मरण करा, 
त्याच्या नावाला धन्यवाद द्या.

४ कारण परमेश्वर चांगला आहे 
त्याची दया सनातन आहे आणि 
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.



जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या 
अंतःकरणात धरून ठेवतात आणि 
धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १२:१३-२१
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल ?"

लोकसमुदायातील कोणा एकाने येशूला म्हटले, "गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा." पण तो त्याला म्हणाला, “गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले ?” आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, आता मी काय करावे? कारण माझे उत्पन्न साठवायला मला जागा नाही. मग त्याने विचार ठरवला, मी असे करीन मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. आता विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, हे कोणाचे होईल ? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही तो ह्या धनवानासारखा आहे.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : मानवी जीवन हे खूप ताण-तणाव, सुख दुःख, आजार अशा अनेक व्याधींनी व संकटांनी भरलेले आहे. पण तरीही जीवन खूप सुंदर आहे. कारण देव आपल्यावर प्रेम करतो व आपली काळजी घेतो. आपली सर्व संकटे दुःखे तोच निवारतो. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो कधीही विसरत नाही. परंतु देवापेक्षा जगातील नश्वर संपत्तीला अधिक महत्त्व दिले तर ती संपत्ती आपले जीवन होत नाही किंवा आपला जीव वाचवू शकत नाही. जीवन देणारा व जीवन घेणारा तोच एक देव आहे. म्हणून जगात संपत्ती न साठविता सार्वकालिक सुखासाठी स्वर्गात संपत्ती साठवण्यास प्रभू येशू सांगत आहे. परंतु मानवी स्वभाव व जगातील मोहाला बळ पडून आपण इतरांना मदत न करता व देवाची भीती न बाळगता केवळ आपलाच स्वार्थी विचार करून आपण देवापासून दूर जातो. आज प्रभूचरणी नम्र होऊन  आपल्या जीवनाचे परीक्षण करूया व आपल्याला |मिळालेल्या सर्व दानांचा, संपत्तीचा वापर इतरांच्या | जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी कशाप्रकारे करणार व त्याद्वारे स्वर्गात संपत्ती साठवण्यास व देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात आवश्यक ते बदल कोणते व कसे करायचे ह्यावर काही वेळ प्रभू सहवासात निवांतपणे मनन करूया.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.




सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या