Marathi Bible Reading | Tuesday 18th October 2022 | 29th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील २९ वा सप्ताह  

मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२

“पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.  




 संत लूक

शुभवर्तमानकार (८५) सूरिया प्रांताची राजधानी असलेल्या अंत्युखिया येथे लुकस नावाचा एक तरुण राहात होता. तो पेशाने वैद्य होता. आपल्या दुसऱ्या प्रेषितीय दौऱ्यावर असताना पौलने या वैद्याची औषधोपचरानिमित्ते भेट घेतली. संत पौलचे जीवन आणि देवावरील त्याची अढळ श्रद्धा ह्याचा लूकवर खूप प्रभाव पडला. त्याने तात्काळ ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि संत पौलचे शिष्यत्व पत्करले. परराष्ट्रीयांना देवाची सुवार्ता सांगण्यासाठी तो आता संत पौल ह्याच्याबरोबर हिंडू फिरू लागला. अथेन्स, थेस्सलनिका आणि करिंथ येथे पौल देवाच्या राज्याची शिकवण लोकांना देत होता आणि इफिस ह्या ठिकाणी तो ३ वर्षे राहिला. या सर्व काळात लूक ह्याने फिलिप्पै येथे प्रेषितकार्याचा भार सांभाळला.

पुढे लूक संत पौलबरोबर येरुशलेम येथे परतला आणि कैसेरिया येथे पौल बंदिवान म्हणून जीवन जगत असताना त्याने वारंवार त्याची भेट घेतली. कदाचित ह्याच वेळेत त्याने प्रदीर्घ असे येशूचे संत लूककृत शुभवर्तमान लिहिले असावे. पुढे ह्या शुभवर्तमानाला बायबलपंडित संत जेरोम व संत जॉन क्रिझोस्टोम ह्यांनी संत पौलकृत शुभवर्तमान असे यथार्थपणे संबोधिलेले आढळते. संत लूक ह्यांना पौलकडूनच आपले लिखित साहित्य निर्माण करण्याची प्रेरणा झालेली मानले जाते. पौलची प्रवचने आणि सुवार्ता प्रसार ह्यांना लूक आपल्या गोष्टी- वेल्हाळ शैलीत शब्दबद्ध केले.

संत मत्तयकृत अरेमाईक भाषेतील शुभवर्तमान ह्या अगोदरच लोकांमध्ये पसरलेले होते. शिवाय संत लूकला संत मार्कच्या शुभवर्तमानाचा आधार होताच.ख्रिस्ती नैतिकता, दारिद्र्य आणि प्रसन्नता अशा ख्रिस्ती मूल्यांचा पुरस्कार या शुभवर्तमानात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देवदूताचा मरियेला निरोप, मरिया अलीशिबा भेट, येशूचा जन्म आणि त्याचे बालपण ह्याचं सुंदर व जिवंत चित्रण लूकने आपल्या शुभवर्तमानात केले आहे. ह्या सर्व गोष्टी संत लूक मोठ्या कष्टाने त्या काळात उपलब्ध असलेल्या साक्षीदारांकडून गोळा केल्या. त्यापैकी एक साक्षीदार पवित्र मरिया असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संत लूकचे शुभवर्तमान पवित्र मरियेवर भर देते. त्याला पवित्र मरियेचे शुभवर्तमान असेही संबोधले जाते.

उच्च आणि अस्खलित ग्रीक भाषेत येशूचे चरित्र चितारणारा संत लूक नक्कीच उच्च शिक्षित मनुष्य असला पाहिजे. येशूच्या जीवनातील घडलेल्या घटना त्याने तात्कालिक ऐतिहासिक घडामोडीच्या साच्यामध्ये चपखलपणे बसविल्या आहेत. सुशिक्षित ग्रीकांना येशूची सुवार्ता सांगताना त्याने वापरलेल्या विविध संज्ञाद्वारे त्याने एकच सत्य लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला. देवाची दया आणि क्षमा ही विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी खुली आहे. मग ती व्यक्ती यहूदी असो की परधर्मीय असो. त्यामुळेच चांगला शोमरोनी आणि उधळ्या पुत्राचा दाखला असे उतारे केवळ संत लूकच्या शुभवर्तमानात आढळतात.

पुढे पौल रोम येथील तुरुंगात असताना संत लूक त्याच्याबरोबर होता. (कलस्सै ४: १४) त्याचवेळी त्याने ख्रिस्तसभेचा सांप्रत इतिहास लिहिला असावा. हा इतिहास प्रेषितांची कृत्ये या नावाने नव्या करारात समाविष्ट करण्यात आलेला आहे. संत पौलचा शिरच्छेद झाल्यानंतर संत लूक दल्मातिया (युगोस्लाव्हिया) येथे गेला आणि ग्रीसमध्ये त्याला रक्तसाक्षीत्वाचे मरण आले.

संत लूक हा वैद्य, कलाकार, मटण विकणारे, काचेचा व्यवसाय करणारे आणि लिपीक ह्यांचा आश्रयदाता संत मानला जातो.

संत लूकने आपल्या सर्व कला गुणांचा योग्य तो वापर करुन प्रभू येशूच्या देवराज्याची सुवार्ता पसरविली. आपण संत लूककडून प्रेरणा घेऊन ख्रिस्ताचे | सच्चे अनुयायी बनण्याचा प्रयत्न करु या. संत लूक हा वैध, कलाकार, काचेचा व्यावसाय करणारे व लिपीक ह्यांचा आश्रयदाता संत मानला जातो. 

✝️   

पहिले वाचन : २तिमथी ४:१०-१७

वाचन :पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"लूक मात्र माझ्याजवळ आहे."

देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीका येथे गेला. क्रेस्केस गलतीया येथे आणि ती दालमतिया येथे गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिस येथे पाठवले आहे. माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. त्याच्याविषयी तूही जपून राहा कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबानीच्या वेळेस माझ्या बाजूचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते. ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र : १४५ : १०- १३,१७-१८
प्रतिसाद : हे प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात.

१)  हे परमेश्वरा,
तुझे सर्व प्राणीमात्र स्तुती गातात,
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
 ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात.

२)ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे 
वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस जाहीर करतात.
 तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे, 
तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.

३)परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, 
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात, 
त्या सर्वांना तो समीप आहे.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे, 
ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १०:१-९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. "

प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे, पाहा. पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो,' असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.'
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : प्रभू त्याचे कार्य व योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला अनेक मार्गांनी बोलावत असतो. व तो प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्यास सामर्थ्य व स्वातंत्र्य देतो. आज आपण 'पाचारण' ह्यावर मनन चिंतन करूया. पाचारण हे देवाचे वरदान आहे. देवाच्या कार्यासाठी म्हणजे धर्मगुरू किंवा धर्मभगिनी होऊन आपले जीवन प्रभू येशूला अर्पण करून त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करण्यास तो अनेकांना पाचारण करतो. परंतु आजच्या घडीला बदलत्या काळानुसार माणसाच्या विचारात व श्रद्धेत बदल होत आहेत. जागतिकीकरण आणि यांत्रिकीकरण ह्यामध्ये आपण इतके गुरफटून गेलो आहोत की, देवावरील श्रद्धा, विश्वास, प्रेम, भक्ती ह्या पेक्षा आपले करीयर कसे जास्तीत जास्त उज्वल करता येईल व अधिक पैसा, प्रसिद्धी, संपत्ती हेच महत्त्वाचे ध्येय बनत आहे. देवाच्या पाचारणाविषयी बोलणे किंवा त्या विषयावर काही ऐकणे हे सुद्धा आपल्याला आवडत नसेल तर आपण देवाच्या कार्यासाठी पुढे कसे येणार ? अनेकदा मुलांचे पालक त्यांच्या मुलांना देवाच्या कार्यासाठी पाठिंबा देतात तर मुले नाकारतात तर कित्येक वेळा मुलांची तयारी असते असे परंतु पालक त्यांना पाठवत नाहीत. अशा परिस्थितीत प्रभूच्या मळ्यात कामकरी कोठून येणार ? केवळ प्रार्थना करणे पुरेसे आहे का ? की त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे ? आपण प्रभूवर खरे प्रेम करतो तर त्याच्या मळ्यात कार्य करण्यास मी धैर्याने पुढे येण्यास तयार आहे का? आपल्या घरात कोणाची इच्छा असेल तर आपण त्यांना कसे प्रोत्साहन देणार? थोडावेळ प्रभू सहवासात बसून आपल्या अंतःकरणात प्रभू शब्दावर मनन चिंतन करू या.

प्रार्थना : तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास हे प्रभू, आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.




सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या