सामान्यकाळातील २९ वा सप्ताह
बुधवार १९ ऑक्टोबर २०२२
कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
क्रूसभक्त संत पॉल
वर्तनसाक्षी (१६९४-१७७५)
इटलीतील लोम्बार्डी येथे राजघराण्यात एका श्रीमंत व्यापाराच्या घरी पॉल फ्रान्सिस दानिएल ह्याचा जन्म झाला. सोळा भावंडांमध्ये तो सर्वात मोठा होता. अतिपवित्र साक्रामेंतासमोर तासन्तास प्रार्थना व मनन-चिंतन करण्याची आवड असलेल्या पॉलला वयाच्या २६ व्या वर्षी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिले. त्यामध्ये त्याने आपल्या दुःखसहनाच्या सन्मानार्थ एक व्रतस्थ जीवन जगणाऱ्यांची संस्था स्थापन करण्याची इच्छा प्रकट केली.इ. स. १७२० साली त्याने आपल्या संघासाठी एक नियमावली तयार केली आणि ती आपल्या बिशपांना दाखविली. बिशपांनी त्याला अनवाणी प्रवास करणाऱ्या क्रूसभक्त आणि येशूच्या दु:खसहनाशी एकरूप होऊ इच्छिणाऱ्या धर्मगुरूंचा झगा प्रदान केला. सात वर्षानंतर त्याला प्रत्यक्ष धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली. ऑर्वेटेलो नजिकच्या माऊंट आर्जेंटारिओ येथे एका मठामध्ये त्याने सांघिक जीवन जगायला सुरुवात केली. त्याला बरेच अनुयायी मिळाले. फा. पॉलना संघाचे एकदाचे सुपिरिअर जनरल निवडण्यात आले आणि तेही मरणापर्यंत.
ह्या नवीन संघामध्ये कार्यूसिअन संघाची विरक्ती आणि येशुसंघाची क्रियाशील सेवावृत्ती ह्यांचा संगम झाला होता.. दुःखसहनाशी एकरुप होऊ इच्छिणारे पॅशनिस्ट फादर्स खरोखरच धार्मिक आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते. येशूच्या दुःखसहनावर ते तासन्तास मननचिंतन करीत आणि त्याद्वारे हरवलेल्या आत्म्यांना ख्रिस्ताकडे आणीत.
संत पॉलच्या कार्यावर देव प्रसन्न झाला आणि त्याच्या हातून अनेक चमत्कार घडू लागले. पाषाणहृदयी आणि परिवर्तनाची कुठलीही आशा नसलेल्या पाप्यांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य संत पॉलला मिळाले होते. ५० वर्षे त्याने खास इंग्लंडच्या परिवर्तनासाठी प्रार्थना केली आणि तशा परिवर्तनाची शाश्वती येशूने त्याला साक्षात्काराकरवी दिली. खरं पाहता कार्डिनल न्यूमन ह्यांनी कॅथलिक चर्चमध्ये प्रवेश केला.
संत पॉल १८ ऑक्टोबर १७७५ रोजी रोम शहरात मरण पावले.
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस ३:२-१२
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताचे रहस्य आता प्रकट करून दाखवले आहे आणि तेच अभिवचन परराष्ट्रीय लोकांनाही दिले आहे.'
देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल असे मी पौल गृहीत धरून चालतो. म्हणजे प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे, ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेष्ट्यांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यसंतानांस कळवण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की, परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्याबरोबर वतनबंधू, आमच्याबरोबर एकशरीर आणि आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत.
देवाच्या सामर्थ्यांचे करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्याद्वारे मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हांला भूषणावह आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : यशया १२:२- ३, ४, ५-६
प्रतिसाद : तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल.
१) पाहा, देव माझे तारण आहे,
मी विश्वास ठेवतो, भीत नाही कारण
प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे.
तो मला तारण झाला आहे.
तेव्हा तुम्ही तारणकुपातून उल्हासाने पाणी काढाल.
२) परमेश्वराला धन्यवाद द्या,
त्याच्या नावाचा जयघोष करा.
राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा
त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा.
परमेश्वरापुढे गायन करा.
३) कारण त्याच्या कृती प्रतापमय आहेत,
हे साऱ्या जगभर जाहीर होवो.
अहो सियोननिवासी लोकहो, जयघोष करा,
गजर करा, कारण इस्राएलचा
पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:३९-४८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभो, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की, सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण ? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांस खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात ठरवून तो दास चाकरांना आणि चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. मग तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याची जागा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, व ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अपेक्षिले जाईल.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आज प्रभूचरणी नम्र होऊन आपल्या | जीवनाचे सार्थक कसे करायचे ह्यावर काही वेळ प्रभू सहवासात राहून चिंतन करू या. येशूख्रिस्त हा प्रेमळ आहे. तो आपल्या लोकांना प्रेमाने जीवनाचे सार कशात आहे हे समजावून सांगतो. आज आपणांस तो ईमानदार, विश्वासू व सदैव जागृत राहण्याचा शुभसंदेश देत आहे. जीवनात सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात परंतु देवाने दिलेल्या अनेक महान दानांचा योग्य वापर करून आपण आपले जीवन घडवू शकतो. असे असले तरी अनेकदा आपण आपल्या वाईट सवयीने आपल्याच प्रियजनांपासून दूर जातो. प्रत्येक नात्यात विश्वास, प्रामाणिक, ईमानदारपणा आणि नेहमी जागृत राहणे आवश्यक आहे. जसा चोर कधी व कोणत्या घटकेत येतो ते कोणालाही ठाऊक नसते. तसेच व्यक्ती आणि परिस्थिती कशी व केव्हा बदलेल ते सांगता येत नाही. प्रत्येक | वेळी आपणांस दिलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडून आपण देवाच्या व इतरांच्या विश्वासास पात्र ठरत असतो. देवाने मला दिलेल्या अनेक दानांचा मी कसा वापर करतो ? माझ्या कार्यातून मी इतरांच्या विश्वासास पात्र आहे का ? माझ्या आजूबाजूला घडत असलेल्या सर्व गोष्टींबाबत मी किती जागृत आहे ? थोडावेळ प्रभू सहवासात बसून आपल्या जीवनावर मनन चिंतन करूया.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, मला लाभलेल्या सर्व कृपादानांबद्दल मी तुझे आभार मानतो, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या