सामान्यकाळातील २९ वा सप्ताह
गुरुवार २० ऑक्टोबर २०२२
“मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते!
संत बर्टिला बॉस्कार्डिन
कुमारिका (१८८८-१९२२)
मृत्यू २० ऑक्टोबर १९२२- २० ऑक्टोबर २०२२
शताब्धी दिवस व शताब्धी वर्ष
बर्टिला ही लिसो, संत तेरेझाच्या "चिमुकला राजमार्ग" ह्या संस्थेची सभासद होती. तिला असामान्य बुद्धिमत्तेची देणगी लाभलेली होती. कणखर इच्छाशक्ती, समतोल विचारसरणी आणि कुठलेही काम विश्वासूपणे पार पाडण्याची मनाची तयारी हे गुण तिला जन्मत:च मिळालेले होते.
मात्र ती वारंवार आजारी पडे. इटलीतील ब्रेडॉला इथल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात १८८८ साली तिचा जन्म झालेला होता. स्नानसंस्कारावेळी तिला अॅन फ्रान्सेस हे नाव देण्यात आले होते. तिला प्रेमाने अॅबेट ह्या नावाने संबोधिण्यात येई. तिथल्या ग्रामीण शाळेमध्ये तिचे शिक्षण झाले. ती घरकाम आवडीने करी. इतकेच नव्हे तर शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे फुरसतीच्या वेळी चाकरीही करीत असे.
स्वभावाने ती शांत व मनमिळाऊ होती. तेथील स्थानिक धर्मगुरू फा.कापोविला ह्यांनी तिच्यातील ईश्वरी हाक ओळखली तेव्हा त्यांचे प्रमुख धर्मगुरू फा. ग्रेसेल मनापासून हसले. एक प्रयत्न म्हणून त्यांनी तिला जवळच्या कॉन्व्हेंटमध्ये पाठविले, परंतु तिथे तिला घेतले गेले नाही. पुढे वयाच्या १६ व्या वर्षी ती संत डॉरथी सिस्टरांच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाली. प्रथम व्रतविधीच्या वेळी तिला बर्टिला हे नाव देण्यात आले.
जवळजवळ एक वर्षभर तिने कॉन्व्हेंटच्या स्वयंपाकघरात आणि इस्त्रीच्या खोलीत काम केले. तिला शारीरिक श्रमाची भारी हौस होती. वर्षभराने तिला ट्रेव्हिसो या ठिकाणी नर्सिंगच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आले. त्या ठिकाणी संत डॉरैथी सिस्टरांच्या मालकीचे हॉस्पीटल होते. परंतु इथे देखील तिला स्वयंपाकघराचा रस्ता दाखविण्यात आला. निराश न होता तिने ते काम आनंदाने स्वीकारले. पुढे तिला हॉस्पिटलमधील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये नेमण्यात आले.
त्यानंतर तिने आजाऱ्यांची सेवाशुश्रूषा करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. परंतु लवकरच ती स्वतःच आजारी पडली. आयुष्याची पुढील १२ वर्षे ती सतत आजारीच होती. शारीरिक वेदनांनी तळमळत असताना तिच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु ती अयशस्वी झाली व २० ऑक्टोबर १९२२ साली तिला देवाघरचे बोलावणे आले.तिच्या प्रथम वार्षिक स्मृतीदिनी ट्रेव्हिसो येथील हॉस्पीटलमध्ये प्लेग रोग फैलावला. सर्वजण तिच्या खाचेकडे धावले आणि त्यांनी तिच्याकडे मध्यस्थीची याचना केली: “सि. बर्टिला, तू चांगुलपणाचा मूर्तिमंत आदर्श आहेस, ह्या हॉस्पीटलमध्ये तू देवदूतांसमान आमची सेवा केलीस. आता तुझ्या प्रार्थनेद्वारे आम्हा रोग्यांचा बचाव कर.” ताबडतोब आजारी बरे होण्याचे चमत्कार एका पाठोपाठ एक घडू लागले. इ. स. १९५२ साली तिला आल्ताराचा मान देण्यात आला. त्यावेळी तिचे कुटुंबिय आणि विशेषतः ज्या रुग्णांची तिने सेवाशुश्रूषा केलेली होती ते रुग्णही तिथे हजर होते. पुढे पोप जॉन तेविसावे ह्यांनी १९६१ साली तिला संतांच्या मालिकेमध्ये समाविष्ट केले.
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस ३:१४-२१
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून देवाच्या पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.”
स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्यांच्या आत्म्याच्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणांमध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी, तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची लांबी, रूदी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह जाणून घ्यायला आणि बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यायला शक्तीमान व्हावे, अशाप्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.
जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यापलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे, त्याला मंडळीमध्ये आणि ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यान्पिढ्या युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ३२:१-२, ४-५, ११-१२,१८-१९
प्रतिसाद : परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
१) अहो, नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा,
प्रामाणिक स्वभावाच्या माणसांना स्तुतिगान शोभते.
वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
दशतंतू वाद्यांवर त्याचे गुणगान गा.
२ )कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे,
त्याची सर्व कृती सत्याची आहे.
त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत,
परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
३) परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते,
त्याच्या मनातील संकल्प पिढ्यान्पिढ्या कायम राहतात.
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !
४) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात
आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि
दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:४९-५३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“येशू म्हणतो, मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी नव्हे तर फूट पाडण्यासाठी आलो आहे."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला स्नानसंस्कार घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय ? मी तुम्हांस सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील पाच जणांत दोघाविरुद्ध तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सुन अशी फूट पडेल
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आज आपण आग, शांतता व फूट ह्या प्रभू येशूच्या शब्दावर मनन चिंतन करू या. प्रभू येशू सांगत आहे की, मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आले आहे. प्रभू येशूचे हे वाक्य आपल्या मनात एक प्रकारची भीती व शंका निर्माण करणारे आहे. आग ह्या शब्दातच भीती लपलेली आहे आणि प्रभू | येशू कशी काय आग लावणार ही शंका कित्येकांच्या मनात गोंधळ निर्माण करत असते. - परंतु प्रभू येशू ज्या आगी विषयी बोलत आहे ती आग म्हणजे प्रेमाची, शांतीची व सत्याची आग आहे. देव प्रेम आहे. तो शांती आहे आणि तो सत्य आहे. ह्या जगात येण्याअगोदर सर्वत्र वैर, अशांती व असत्याचेच साम्राज्य होते. प्रभू येशू मानव बनून ह्या जगात आला ते केवळ आपल्याला खरे प्रेम व शांती देण्यासाठी आणि आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे तसेच इतरांनाही त्यासाठी मार्गदर्शन करावे. प्रभू येशू आपली हीच इच्छा आज आपणापुढे प्रकट करत आहे. कारण जगात दोन प्रकारचे लोक आहेत, जे देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करतात व देवाची सर्वांना ओळख करून देतात. परंतु काही लोक इतरांना वाईट वागणूक देऊन वैर, राग, स्वार्थ ह्याद्वारे जगात अशांती व असत्याचेच साम्राज्य निर्माण करतात. त्याच्या विरोधात प्रभू येशू आपणांस फुटीरतेचा इशारा करतो. आज आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जाऊन प्रभू येशूच्या वचनावर थोडा विचार करून आपण आपल्या जीवनाचे परीक्षण करुया की, मी माझ्या कुटुंबात इतरांशी कशाप्रकारे वागतो ? कोणती आग लावतो प्रेमाची, शांतीची अथवा असत्याची ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझा तरणदायी प्रकाश आम्हाला दे व तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास बळ व प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या