सामान्यकाळातील २९ वा सप्ताह
शुक्रवार २१ ऑक्टोबर २०२२
“मी तुला सांगतो, पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस
संत हिलेरियन महान
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२९१-३७१)
संत पौलाने, ख्रिस्ती जीवन आचरण कसे असावे हा मार्गदर्शनपर सल्ला इफिसकरास पाठविलेल्या पत्रामध्ये दिलेला आहे. खरे पाहता देव आपल्याला सहभागीतेचे जीवन जगण्यासाठी पाचारण ' करीत असतो.
आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय आपण घेऊ शकतो, कारण कोणती गोष्ट देवाच्या दृष्टीने आपल्या हिताची आहे हे आपल्याला समजते. आपण आपल्या जीवनावर चिंतन करु या.
'जे यथार्थ म्हणजेच योग्य व चांगले आहे ते करण्यासाठी सर्वाना पवित्र आत्म्याची प्रेरणा आणि कृपा मिळावी म्हणून आज आपण एकमेकांसाठी प्रार्थना करु या. संत पौलाचा नम्रतेचा, सहनशीलतेचा व परस्पर प्रीतिचा सल्ला स्वीकारुन ऐक्याने व शांतीने जीवन जगण्यासाठी प्रेरणा घेऊ या.
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस ४:१-६
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“एकच शरीर, एकच प्रभू, एकच विश्वास, एकच स्नानसंस्कार.”
जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणाला शोभेल असे चाला, पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखायला झटत जा. तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे तसे शरीरही एकच आहे, आत्माही एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच, स्नानसंस्कार एकच, सर्वांच्यावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : २४:१-६
प्रतिसाद : प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत
१. )पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे,
जग आणि त्यात राहणारे सारे लोकही परमेश्वराचेच आहेत.
कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला,
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.
२ )परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल ?
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ?
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे,
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.
३ )त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल.
आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल.
त्याला शरण जाणारे हेच लोक होत,
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले ते हेच.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:५४-५९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, मग या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही."
येशू लोकसमुदायांना म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, पावसाची सर येत आहे आणि तसे घडते, दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांस पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही ?
आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही ? तू आपल्या वादयाबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुगांत टाकील. मी तुला सांगतो, पै न पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : निसर्गातील प्रत्येक घडामोडींचा माणसाच्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. चांगली कृत्ये केली तर निसर्ग आपल्याला त्याचे चांगले फळ देतो. वाईट कृत्ये केली तर वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून निसर्ग हा प्रामाणिक व खरा शिक्षक आहे. पूर्वी लोक जास्त शिकलेले नव्हते. पण ते निसर्गात होणाऱ्या घडामोडीचा अभ्यास करून त्यावरून पुढे घडणाऱ्या घटनांबद्दल आढाव घेत असत. आजदेखील आपल्यामध्ये अशी अनेक लोक आहेत. जे परिस्थितीचे अचूक अंदाज लावतात. ते जरी शिकलेले नसले तरी पुढे काय होणार आहे हे ते जाणून असतात. त्यांच्या ह्या अचूक अंदाजाबद्दल प्रभू येशू आपणासर्वांना एक महत्त्वाचा धडा देत आहे. तो म्हणजे, आपल्या वैऱ्याबरोबर तडजोड करणे. आपल्या शत्रूला वेळीच समजून घेणे व आपले भांडण असल्यास त्याचे वेळीस निरसन करून एकमेकांना क्षमा करावी. नाहीतर त्याचे काय परिणाम होतात हे आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे. असे असले तरी आपण आपला अहंकार, अहंपणा, गर्व, स्वार्थ अशा मानवी दुर्बलतेमुळे पुढे होणाऱ्या परिणामाची कसलीही चिंता न करता व खरे ते माझे अशी भावना न जोपासता केवळ माझे तेच खरे करण्याचा आटोकाट प्रयत्न करून आपण आपल्या स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करतो. आज प्रभूचरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया. मी कुणाचे वाईट केले आहे का? मला त्रास देणाऱ्याला व माझे वाईट करणाऱ्यांबरोबर मी कसे वागतो ? चांगले केले की, चांगलेच होणार ह्यावर माझा विश्वास आहे का? थोडा वेळ शांतपणे प्रभू सान्निध्यात घालवून आत्मपरीक्षण करू या.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, परस्परप्रीतिने सहभागितेचे व प्रेमाचे जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन. '
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या