सामान्यकाळातील २८ वा सप्ताह
गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२
तुम्ही स्वत: आंत गेला नाही व जे आंत जात होते त्यांस तुम्ही प्रतिबंध केला. "
संत एडवर्ड
राजा, वर्तनसाक्षी (१००४-१०६६)
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री - परुश्यांचा निषेध करीत आहे, शास्त्री परुश्यांनी नियमांच्या बंधनांचा धाक दाखवून सामान्यजनांवर जुलूम व अन्याय केला होता. त्यांनी स्वतःचे धर्माचरण व्यवस्थितपणे पार पाडले नाही आणि इतरांना सुद्धा पाळू दिले नाही. समाजात आजसुद्धा स्वतः ला धर्मरक्षक समजणारी माणसे स्वतःबरोबरच इतरांचे जीवन भ्रष्ट करीत असतात. पोकळ भक्तीचा आव आणून चांगले जीवन जगणाऱ्यांना बहकवित असतात. प्रभू येशू अशा सर्वांचा आज निषेध करीत आहे.
आपण आज संत पौल सांगतो त्याप्रमाणे प्रभूसमोर निर्दोष व पवित्र बनण्यासाठी प्रभू येशूची वचने व प्रीतिंच्या आज्ञा प्रामाणिकपणे आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करू या. संत पौल प्रमाणे आपण नीतिमान असावे आणि प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे म्हणून प्रयत्नशील बनू या.
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस१:१.३-१०
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन १:१.३-१०
“देवाने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्याठायी निवडून घेतले. "
इफिस येथील पवित्रजन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांस,
देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्यांच्याकडून,आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुल प्रमाणात केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९८:१, २-३ अब, ३कड-४,५-६
प्रतिसाद : परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे.
१ परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२ परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे,
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता
आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.
३ पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे
तारणकार्य पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.
४ परमेश्वराची स्तोत्रे वीणेवर गा. संगीत स्वराने गा.
कर्णा आणि शिंग वाजवून
परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा ! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ११:४७-५४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“हाबेलच्या रक्तापासून तर जखऱ्याच्या रक्तापर्यंतच्या प्रत्येक संदेष्ट्यांच्या रक्ताबद्दल ह्या पिढीला हिशेब द्यावा लागेल. "
येशू शास्त्र्यांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहा आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहीना ते जिवे मारतील आणि काहींना छळतील, ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलच्या रक्तापासून वेदी आणि पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.
तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे. म्हणून टपून राहिले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू संदेष्टे व प्रेषित ह्यांच्या जीवनाविषयी केलेले भाकित आणि ज्ञानाची किल्ली ह्याविषयी शास्त्री-परुशी ह्यांच्या बरोबर स्पष्ट व उघडपणे बोलत आहे. जुन्या करारात देव संदेष्ट्यांद्वारे त्याच्या लोकांशी बोलत असे व त्यांच्याद्वारे कार्य करून लोकांना खऱ्या देवाची ओळख करून देत असत. परंतु शास्त्री परूशी ह्यांच्या पूर्वजांनी अशा संदेष्टांचा छळ केला व त्यांना जिवे मारले. आजही देवाच्या कार्यासाठी पुढे येणाऱ्या अनेक मिशनरी फादर्स व सिस्टर्स ह्यांना जिवे मारण्यात येत आहे. कारण लोकांना खऱ्या देवाची ओळख नाही व कोणी करून द्यावी अशी त्यांची इच्छा नसते. त्यांना असलेले ज्ञान हेच खरे व अंतिम सत्य मानून इतरांना आपल्यापुढे नमवून त्यात परमानंद मानत आपण आपला आनंद कशात शोधत असतो? जगातील नश्वर गोष्टींमध्ये की, देवाच्या आपल्यासाठी असलेल्या योजनांमध्ये? आपल्या पुढच्या पिढीला देवाची ओळख करून देण्यासाठी आपण काय करतो ? दैवी पाचारणासाठी आपल्या मुलांना आपण घडवितो की जगातील प्रसिद्धीसाठी ? ह्यावर थोडावेळ विचार करण्यास व आपले देवाशी नाते । दृढ करण्यासाठी त्यांच्या वचनावर मनन चिंतन करूया.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करून इतरांच्या जीवनात तुझ्या प्रीतिचा दीप प्रज्वलित करण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या