Marathi Bible Reading | Monday 10th October 2022 | 28th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २८ वा सप्ताह  

सोमवार १० ऑक्टोबर २०२२



संत फ्रान्सिस बोर्जिया

वर्तनसाक्षी (१५१०-१५७२) 

  ही दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागतो. "


 लूकच्याच शुभवर्तमानात संत योहान बाप्तिस्ताने त्याच्या दोन शिष्यांना येशूकडे पाठवून विचारपूस केली होती, 'जे येणार आहेत ते आपणच की आम्ही  दुसऱ्याची वाट पाहावी' (लूक ७:१९). तेव्हा प्रभू येशूने त्यांना सांगितले होते की, योहानाला सांगा, “आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते” (लूक ७:२२). अशा प्रकारची अनेक अद्भूत चिन्हे घडताना पाहत असताना सुद्धा कठोर अंत:करण असलेल्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. मात्र ज्या गरीब आणि साध्या माणसांनी येशूवर विश्वास ठेवला त्यांना अनेक  कृपादाने मिळाली. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, 'दुष्ट पिढी चिन्ह मागते. '  

✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  ४:२२-२४,२६-२७,३१-५:१
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

आपण दासीची मुले नाहीत, तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

शास्त्रात असे लिहिले आहे की, आब्राहामला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला आणि एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला देहस्वभावाने जन्मला आणि स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टान्तरूपे आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला, तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार, म्हणजे हागार आहे. परंतु वर असलेले येरुशलेम स्वतंत्र असून आपली माता आहे. शास्त्रात लिहिले आहे:

“अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार ! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा परित्यक्ता स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.”

म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही, तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. यास्तव स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जोखडाखाली पुन्हा सापडू नका.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र  ११३:१-७
प्रतिसाद :परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो.

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा, 
परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा.
येथून पुढे परमेश्वराचे नाव सर्वकाळ धन्यवादित असो. 

२ )सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत
परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.
परमेश्वर सर्व राष्ट्रांहून उन्नत आहे,
त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे.

३) परमेश्वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, 
जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लवून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांना धुळीतून उठवतो,
भुकेलेल्यांना उकिरड्यावरून उचलतो.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ११:२९-३२
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. "

बराच मोठा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता येशू त्यांना म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील, कारण शलमोनचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे, निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : चिन्ह, विश्वास, ज्ञान आणि क्षमा या चार खांबावर आजचे शुभवर्तमान उभे आहे. आपण अनेक वेळा परमेश्वराकडे त्याच्या अस्तित्वाचा व त्याच्या आपल्यावरील प्रेमाचा पुरावा मागतो. परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास आपण अनेक वेळा कमी पडतो. परंतु आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटना आपण लक्षपूर्वक पाहिल्या, तर आपल्याला नक्कीच परमेश्वराच्या सामर्थ्याची व त्यांच्या मानव जाती वरील प्रेमाची चिन्हे मिळतील. पण ते समजून घेण्यास आपले ज्ञान कमी पडते आणि आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी संशय घेतो. चमत्कार पाहून नमस्कार करणे म्हणजे विश्वास नव्हे. विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी विषयीचा भरवसा. परंतु आपण मात्र चिन्हावर विश्वास ठेवतो, परमेश्वरावर नाही. आपण कितीही गर्विष्ठपणे वागलो आणि कितीही अवास्तव अपेक्षा केल्या, कितीही अविश्वास दाखवला तरीही जर आपण पश्चात्ताप केला, तर परमेश्वर आपल्या क्षमा करण्यास नेहमी तयार असतो.

प्रार्थना :   हे प्रभू येशू, तुझी तारणदायी कृपा अनुभवून ती इतरांना सांगण्यास आम्हाला शक्ती दे, आमेन.
 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या