सामान्यकाळातील २८ वा रविवार
९ ऑक्टोबर २०२२
“ऊठ, जा, तुझ्या विश्वसाने तुला बरे केले आहे."
अलीशाच्या सांगण्यावरुन नामानने योर्देन नदीत सात वेळा बुचकळ्या मारुन स्नान केले, तेव्हा त्याचे शरीर लहान मुलांच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नामानने अविश्वास दाखविला परंतु नंतर त्याने विश्वास ठेवला व त्याला शुद्धी प्राप्त झाली. नामानाने कृतज्ञता व्यक्त करुन खऱ्या देवाची उपासना करण्याचा निर्धार केला.
दहा कुष्ठरोगी प्रभू येशूजवळ येऊन विनंती करतात, प्रभू येशूच्या ह्या वचनावर विश्वास ठेवून वाटेने जाता जाता ते सर्व कुष्ठरोगी शुद्ध झाले. पश्चातापी अंतःकरणाने प्रभूला शरण जाऊन, विश्वासाने प्रभूच्या वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्याच्या जीवनात चमत्कार घडत असतो, श्रद्धेची कसोटी घेतली जाते म्हणूनच आपली श्रद्धा व परमेश्वरावरील भक्ति दृढ असायला हवी. आपण आपल्या देवावरील श्रद्धेवर चिंतन करु या.
बरे झालेल्या दहा कुष्ठरोग्यांपैकी जो परराष्ट्रीय होता, त्याने परत येऊन येशूला धन्यवाद दिले. देव कनवाळू, दयाळू व प्रेमळ आहे, आपल्या जीवनात आपल्याला दिलेल्या असंख्य दानाबद्धल आपण कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचे आहे.
✝️
पहिले वाचन :२ राजे ५:१४-१७
वाचक : राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"नामान अलिशाकडे परत येऊन त्याने देवाचा स्वीकार केला. "
महारोगी नामानने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.
नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला आणि त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, “अखिल पृथ्वीवर इस्राएलबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे, तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा." तेव्हा तो म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सेवेला मी असतो त्याच्या जीविताची शपथ, मी काहीएक घेणार नाही.” त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, “एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला दोन खेचरांवर नेता येईल एवढी माती द्या. कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९८:१-४
प्रतिसाद : परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे.
१ )परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे,
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता
आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे
तारणकार्य पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.
दुसरे वाचन २ तिमथी २:८-१३
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“जर आपण धीराने सोसतो तर ख्रिस्ताबरोबर राज्य करू."
माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला, दावीदच्या संतानातील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सहन करत आहे. तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे, म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे.
जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहू. जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १७:११-१९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय ?"
येशू येरुशलेमकडे चालला असता शोमरोन आणि गालील ह्या प्रदेशामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठ्यामोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा." त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा." मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एकजण आपण बरे झालो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णन करीत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला. हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, दहाचे दहा शुद्ध झाले होते ना ? मग नऊ जण कोठे आहेत? ह्या एकावाचून देवाचा गौरव करण्यासाठी परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय ? मग त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वसाने तुला बरे केले आहे."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : जीवनातील समस्या ह्या परमेश्वर अनुभवासाठी उपलब्ध असलेली संधी असते हे आजच्या तिन्ही वाचनांतून स्पष्ट होते.
अ. समस्यांमुळे परमेश्वराची दया स्वीकारण्यासाठी आपली हृदये विशाल बनतात. आजच्या पहिल्या वाचनात सूरियाचा सेनापती नामान ह्याचा परमेश्वर अनुभव शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. अलिशा संदेष्टा आपल्याला स्पर्श करून बरे करील असे नामानला वाटले होते. यार्देन नदीत सात वेळा डुंबणे त्याला कमीपणाचे वाटले. मात्र प्रत्यक्ष तसे केल्यानंतर परमेश्वराची दया स्वीकारण्यासाठी नामानचे हृदय विशाल बनले.
ब. समस्या आपल्या भविष्यातील आशेची क्षितिजे रुंदावतात : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तुरुंगातील आपल्या दुःखात आनंद मानतो कारण त्याच्यात भविष्यातील गौरवाची आशा उद्दिपित झालेली होती.
क. समस्या उचित रितीने हाताळल्यास त्या परमेश्वर - मानवातील अंतर कमी करतात : शुभवर्तमानातील दहा कुष्ठरोगी विनंती करताना येशूपासून दूर उभे राहतात. बऱ्या झालेल्या त्या कुष्ठरोग्यांपैकी परतलेला शोमरोनी देवाचा महिमा वर्णीत येशूच्या चरणाशी पालथा पडतो. शोमरोनी असल्याने त्याला गिरिझीम पर्वतावर धर्मगुरूकडे जावे लागते असते परंतु 'आपण बरे झालो' हे समजताच त्याला येशूठायी वसलेल्या खऱ्या देवाची ओळख पटली. समाज बहिष्कृत करणारी समस्या हे ईश्वर - स्तुतीचे कारण बनली.
आत्मपरीक्षण : एक श्रद्धावंत म्हणून मी माझ्या समस्यांकडे कसा पाहतो ?
प्रार्थना : हे प्रभू प्रमेश्वरा, दयेने आमच्यावर कृपादृष्टी कर, आमचा विश्वास वाढव आणि आम्हाला आरोग्यदान दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या