सामान्यकाळातील २७ वा सप्ताह
शनिवार ८ ऑक्टोबर २०२२
“पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत."
संत सर्जिअस आणि बाक्खस
- रक्तसाक्षी (इ.स. ३०३)
सर्जिअस आणि बाक्खस हे सिरिअन युद्धात आघाडीवर लढणारे रोमन सैन्याधिकारी होते. सर्जिअस हा सैन्यात भरती करणारा अधिकारी होता. तर बाक्खस त्याचा सहाय्यक अधिकारी होता. हे दोघे अधिकारी मॅक्सिमिअन राजाचे आवडते. अधिकारी होते. परंतु एके दिवशी राजा ज्युपिटरच्या मंदिरात गेला असताना त्याच्या लक्षात आले की हे दोघे अधिकारी कधीही ज्युपिटरच्या मंदिरात यज्ञबळी अर्पण करण्यासाठी येत नाहीत. तेव्हा त्याने त्या दोघांना यज्ञबळी मध्ये सहभाग घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यांच्यावर विविध प्रकारे दडपण आणले परंतु हे दोघे राजाच्या कोणत्याही दडपणाला व आमिषाला बळी पडले नाहीत. उलट त्यांनी मोठ्या धैर्याने ख्रिस्ती विश्वास प्रकट केला.
हे पाहून राजा रागाने लालबुंद झाला. त्याने त्या दोघांच्या अंगावरून अधिकारपदाचे कपडे आणि पदके खेचून काढली. स्त्रियांची वस्त्रे नेसवून रस्त्यावरून त्यांची धिंड काढण्यात आली. परंतु अशा प्रकारच्या अपमानाला आणि धमक्यांना त्यांनी अजिबात भीक घातली नाही. उलट हा अपमान आणि मानहानी त्यांनी आनंदाने सहन केली.
पुढे राजाने त्यांना मेसोपोटेम्या येथील रोसेफा ह्या ठिकाणी नेले. तेथे त्यांना जबर फटके मारण्यात आले. ते फटके इतके विलक्षण यातनादायी होते की संत बाक्खस तेथेच मरण पावला. त्याचे शरीर हायवेवर फेकून देण्यात आले. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून त्याचे संरक्षण व्हावे म्हणून गिधाडांनी त्याच्या शरीराभोवती (कृपेचे) कोंडाळे केले. सर्जिअसच्या यातना तर शब्दातीत आहेत. अणकुचीदार जाड खिळे असलेल्या वाहणा घालायला लावून त्याला दूरवरचे अंतर चालणे भाग पाडण्यात आले. ते खिळे त्याच्या तळपायातून आरपार गेले. रक्तबंबाळ अवस्थेत तो काही अंतर चालला नंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
इ. स. ४३१ मध्ये हायरापॉलिसचे महापौर अलेक्झांडर ह्यांनी संत सर्जिअसच्या
थडग्यात बांधलेल्या मंदिराचे नूतनीकरण केले आणि ते मंदिर त्या संताला अर्पण केले. सहाव्या शतकाच्या मध्यंतरी ह्या मंदिराच्या सर्व भिंती चांदीने मढविण्यात आल्या. पूर्वेकडील देशात रोसेफाचे हे चर्च त्या काळात सुप्रसिद्ध गणले जात होते. विझन्टाईन सैन्यासाठी सर्जिअस व बाक्खस हे संत स्वर्गीय आदर्श आणि संरक्षक दूत बनले. पूर्वेकडील देशाला यापूर्वी थिओडोर डेमेट्रीयस, प्रोको पायस आणि जॉर्जसारखे आदर्श होतेच. त्यात आता या दोहोंची भर पडली.
. आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा पाया पवित्र शास्त्रातील देवाच्या वचनांवर उभारलेला आहे. देवाची वचने संकटात ! धीर देतात, बहकलेल्यास सन्मार्गावर आणतात, अंधारात प्रकाश देतात, प्रेम, दया, क्षमा व परोपकार करण्यास प्रेरणा देतात. देवाची वचने ज्ञान, शहाणपण व विवेक शिकवतात. देवाच्या वचनात सामर्थ्य व कृपा आहे. देवाच्या वचनात तारण आहे.
आपणा प्रत्येकाला पवित्र शास्त्र वाचन करण्यास व देवाचा शब्द ग्रहण करुन त्याप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा लाभावी म्हणून प्रार्थना करू या.
✝️
पहिले वाचन : गलतीकरांस पत्र ३:२२-२९
वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही सर्व विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात."
शास्त्राने सर्वांना पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे पहाऱ्यात ठेवले होते. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही, तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्याद्वारे देवाचे पुत्र आहात, कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी आणि हेल्लेणी, गुलाम आणि स्वतंत्र, पुरुष आणि स्त्री, हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एक आहा आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर आब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारा वारस आहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १०५:२-७
प्रतिसाद :प्रतिसाद परमेश्वर आपला करार सर्वकाळ आठवतो.
१.) त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा,
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा,
परमेश्वराला शरण जाऊ पहाणारांचे मन आनंदित होवो.
२) परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा,
त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
त्याने केलेली अद्भुतकृत्ये, त्याचे चमत्कार
आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो,
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो,
तो परमेश्वर आमचा देव आहे:
साऱ्या जगावर त्याची सत्ता चालते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ११:२७-२८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्या उदराने तुझा भार वाहिला ते धन्य, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात ते अधिक धन्य होत. "
येशू ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, "ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य." परंतु तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आम्ही प्रत्येक परिस्थितीत, दररोज घेत | असलेल्या निर्णयात आपण एकतर देवाची आज्ञा पाळू शकतो. आपल्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्याच्यावर अवलंबून राहू शकतो किंवा आपण स्वतःवर अवलंबून राहू शकतो. परमेश्वरावर जीवनातील अगदी लहान सहान निर्णयात देखील विश्वास ठेवणे, हीच आज्ञाधारक पणाची एक सोपी कृती आहे. सोप्या भाषेत, आज्ञाधारकपणा म्हणजे परमेश्वराचा संदेश ऐकणे व त्यानुसार कार्य करणे. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या अधिकारास व त्याच्या सामर्थ्यास पूर्ण शरण जातो आणि आपले निर्णय व आपले कार्य त्याच्या वचनानुसार करतो. तेव्हा त्याचे सामर्थ्य आपल्याठायी प्रकट होते. पवित्र मरिया आज्ञाधारकपणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपल्या आज्ञाधारकपणामुळे मरिया परमेश्वराच्या तारण योजनेत सहभागी झाली व त्यामुळे परमेश्वराची तारण योजना पूर्ण झाली. मरियेच्या आज्ञाधारक पणामुळे तारण जगात आले. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या इच्छा आपल्या जीवनात प्रमाण मानण्यासाठी त्याच्याकडे आज्ञाधारक पणाचे दान मागूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, सार्वकालिक जीवन देणाऱ्या अमर वचनांची गोडी आम्हास लागावी व त्याप्रमाणे आचरण करता यावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या